Wednesday 10 October 2012

याचं सुख म्हंजे किती हो?


त्यादिसी चौकात एका बाजूले उभा असतानी माहा एक सिरीमंत दोस्त पलीकडून जातानी दिसला. त्याचं टक्कल पाहून मी चमकलो. म्हनलं कार्यकरमासाठी आपन बाहेरगावाले जात राह्यतो तवा झाली असन गडबड. मी तवाचं त्याच्या मांग त्याच्या घरी पोचलो. मले अचानक आलेलं पाहून तोही खुस झाला. त्यानं ''ये ये'' म्हनत बंगल्यात नेलं आन् घरात आवाज देल्ला तं त्याची पोरगी आली आन् माह्या हातावर लाडू ठुला. म्या दोस्ताकडं पाह्यलं तं थो टकल्यावून हात फिरवत म्हने, ''तिरुपतीले जाऊन आलो.'' आपल्याले जाले नाई भेटलं याचं मले दु:ख नाई झालं. काऊन का तो थोरामोठय़ाचाचं देव होय. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आन् आता ताजं ताजं म्हनान तं देशाचे गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे. आमचा गरिबाचा, कष्टकर्‍यायचा, साद्यासुद्या मानसाचा देव कोन्ता म्हनान तं पंढरीचा इठोबा.

अखाडीले लाखो सादेसुदे वारकरी सांजीले गाय जसी वासरासाठी पयत निंघते कोठय़ाकडं त्या वढीनं पायदळ आपल्या देवाले भेटाले निंघतेत. त्यायची आस पाह्यली तरी आपल्याले देव भेटल्याची खुसी होते. तिकडं काईतरी भेटलं म्हून नाईतं भेटावं म्हून जानारे आन् इथं निरे देवाले भेटाले येनारे भक्त. त्यायचे हात मूर्तीच्या पायाले लागले, का त्यायचा सिन कुठच्या कुठं गायब होते हे त्यायचं त्यायच्याची ध्यानात येत नाई. तो देवाले मागते काय हे तुमी कवा आयकलं का? पायावर डोस्कं टेकवतानी म्हन्ते, ''सुखी ठेवजो देवा.'' आता तुमी मले सांगा याचं सुख म्हंजे किती हो? दोन बोटाच्या चिमटीत पकडलेल्या साकरीइतकं ! मले तं वाट्टे रिवाज पडला हाय म्हून हा तसं म्हन्ते. खरं तं त्या ढकलाढकलीतयी जितकं साठोता इन तितलं तो डोयातून कायजात रूप साठून घेत असते. काऊन का एक डाव पंढरी सोडली का वर्सभर कुठची गाठभेट? हे मोठे लोकं मनात आलं का उडून इमानानं फॉरेनले जातेत. हिंडाले तसं यायले जाता येते का? इथच्या मुक्कामात डोस्कयी बाकी कटकटीतून मोकयं होते आन् मनयी सुखावते. जातानी सालभर पुरन इतकी ऊर्जा संग घेऊन जातेत हे. जतरीच्या वक्ती इतका नामजप कुठीच पाहाले नाई भेटत. अवघी पंढरी इठ्ठलनामानं दुमदुमून जाते. हिसोबापलीकडचं सुखसमाधान आन् खुसी भेटत असन तं काऊन नाई यावं त्यायनं दरसाली इथं? इठ्ठलाच्या भेटीच्या वढीनं इठ्ठलनामाच्या गजरासंग, तुकोबाच्या अभंगाच्या संगतीनं निंघालेली पावलं भेट होईपावतर थकाचं नावाच घेत नाई ना! तुमाले सांगू थकते कोन? आंग थकते का मन? आंग थकलं तं त्याले बाम लावता येते. मन थकलं तं त्याचा उतारा पंढरीचा इठोबाच अस्ते. घरादाराच्या कटकटीचा पालापाचोया या चंदरभागेच्या पान्यात सोडून तो डुबकी मारते आन् मनानं कोरा करक रीत होऊन भाहेर निंघते पुढची पोटाची लढाई लढासाठी.

वारी म्हंजे जे दरसाली ना चुकता कराची असते ते. आता माहा काई या इसयाचा अभ्यास नाई. मी सोता वारकरी नाई. पन वारीची पद्घत जसी पिढय़ानंपिढय़ा पंढरीची हाये तसी दुसरी असन तं माह्या माईतीत नाई. मले जे माईत हाय ते लिवून राह्यलो. काई घरात तीन-तीन, चार-चार पिढय़ापासून वारी हाय म्हन्तेत. आमच्या बोरीवून जवयजवय चायीस वर्सापासून एक न्यानेश्वर मित्रमंडय हाये ते वारी करतेत. पह्यले सातआठ दोस्तायनं ठरोलं का पंढरपूर वारी चालू कराची. पह्यले दोनचार वर्स ते एसटीनं जाले लागले आन् मंग ठरोलं का पेसल एसटी कराची म्हंजे जायचं. जाचं मन हाय पन एकलं जानं अवघड वाट्टे त्यायले हे सोय झाल्यानं जाले भेटन. त्या वक्ती सुरवातीले मा. परसराम पाटील शेलोडी, भास्करराव ठाकरे दुधगाव, न्यानेश्वर कावरे, गजानन पाटील, लक्ष्मनराव बडे बोरी, शामराव चौधरी, आनंदराव घुले, दिगंबरजी जाधव ब्रrी, वामनराव आरू पाटील या मंडयीनं ठरोलं. पह्यल्या साली धाकधूक होती, का इतके लोकं भेटतीन का नाई? तिथं षष्ठीला पोचाचं आन् पुनवेचा काला करून निंघाचं. एकाच जागी सार्‍यायचा मुक्काम. मी तवा बोरीले कपडय़ाच्या दुकानात असतानी माह्याकडं जानार्‍यायनं आनून देल्लेले पयसे जमा कराचं काम होतं. हे सारे इथून पंचमीले आपल्या घरासमोर आंगनात पारथना करून निंघत. तो दिस खूप खुसीत जाये. पन हे सारे निंघून गेल्यावर मातर मनात हुरहुर दाटे. मी कवा त्यायच्या संग गेलो नाई म्हून तिथचा मले काई अनुभव घेता आला नाई. आठदहा दिस ही मंडयी एका निल्ख्या खुसीत राहत. महाराष्ट्रातले मोठमोठे किरतनकाराचे परवचन निरनिराया मठात चालू असतात ते आयकाचा योग जमून येते ना!

म्या वरतं जे नाव सांगतले त्यातले माहे मोठे भाऊ आन् वामनराव आरू पाटील सोडले तं बाकीचे सारे आता वैकुंठवासी झाले हायेत. पन वारीची गाडी मातर अजूनयी चालू असून त्याची धुरा लहान बोरीचे माणिकराव कयंबे यायच्या खांद्यावर्त आली हाय. यातली ती जुनी मंडयी असतानी घडलेला एक किस्सा माह्या आठोनीत हाय. अर्थात त्यायनं सांगतलेला. त्या कंपनीतले सारे मायकरी होते एक आनंदराव घुले सोडून. ते दरसाली याचे. पन त्यायनं गयात माय काई घातली नोती. बाकीच्यायनं त्यायच्या मांग असं ठरोलं, का उद्या दोयपारी जेवनं अटपून अराम होत आला का यायले परसरामजी पाटलाम्होरं न्याचं आन् आग्रवान गयात तुयसीची माय परसराम पाटलाच्या हातानं घालाले लावाची. दुसर्‍या दिसी जसा अराम अटपत आला तसं या चारपाच जनायनं जवयजवय उचलून नेल्यावानीच यायले परसराम पाटलाच्या पुढय़ात नेऊन ठुलं. परसराम पाटील यायच्या परीस वयानं आन् मानानं मोठे. यायचा आग्रव असा, का यायच्या गयात तुयसीचं माय नाई. ते तुमच्या हातानं घाला. त्याच्यावर परसराम पाटील म्हने, ''अहो, ते काय नाही म्हन्तात का? कोनीतरी म्हनावं याची ते वाट पाहत होते. काहो आनंदराव?'' झालं 'पंढरीनाथ महाराज की जय' म्हनून माय त्यायच्या गयात.

झालं ही मंडयी पंढरपूर अटपून वापेस आले. आठेक दिसानं परसराम पाटील दुकानात येऊन बसले तं वामनराव पाटलानं येऊन सांगतलं का आनंदरावनं गयातली तुयसीचं माय काढली. ''नाही हो!'' परसराम पाटील. ''विचारून पाहा ते समोरच्या अमृतभाईच्या दुकानात बसून हायेत.'' दुकानातला रामचंद्रानं त्यायले बलावून आनलं. दोघायचा एकमेकाले नमस्कार झाला. थोडी इचारपूस झाली. मंग परसराम पाटलानं आनंदरावले इचारलं, ''तुम्ही माळ काढली काय?'' त्यावर ते म्हने, ''नाही.'' मंग पाटलानं इचारलं, ''मग तुमच्या गळ्य़ात माळ आहे का?'' ते म्हने, ''नाही.'' ''अरे, माळ काढली का म्हणतो, तरी नाही आणि गळ्य़ात आहे का विचारतो, तरी नाही. हे कसं काय?'' त्याच्यावर आनंदरावनी खुलासा केला, ''तुम्ही माझ्या गळ्य़ात माळ टाकली. मी नाही म्हटलं कां? म्हटलं सार्‍यांची इच्छा आहे टाकू द्या. दुसर्‍या दिवशी सकाळी चंद्रभागेत स्नान कराले गेलो. कमरीभर पाण्यात आलो आणि नाक दाबून आत बुचकी घेतली. जेव्हा डोक वर आलं तर पाहतो काय, की गळ्य़ातली तुळसीची माळ पाण्यावर तरंगत धारीसोबत जात आहे. मग विचार केला तिची इच्छा नाही गळ्य़ात रहायची तर जाऊ द्या. म्हणून मी तुमच्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर नाही दिले.'' असी गंमत चाले.

परसराम पाटील पुरते इठ्ठलमय झाले होते. ते रविवारी सकायीच संग शिदोरी घेऊन स्वामी चंद्रशखेरबाबाच्या समाधिमंदिरात यायचे आन् एकलेच 'इठ्ठल, इठ्ठल' ह्या नामजप सुरू कराचे. जप झाला, का संग आनलेली शिदोरी तिथं असलेल्या दोघातिघासोबत खायचे. वर्‍हाडी मानसाची एकासाठी असलेली शिदोरी घरची माऊली देतानाच दोघाची देते. हे तं इथं आनलेली शिदोरी तीनचार जनाची राह्यनारचं झाली. माहे मोठे भाऊ मंग त्यातनी सामील झाले. असं करता करता चालू झालेला नामजपाचा कार्यकरम. परसराम पाटील गेले. पन सोया वर्स झाले अखंड चालू हाये. नुसताच चालू नाई तं फुलत हाये. साठसत्तर लोकं जपाले याले लागले हाय. 'सुद्या गोठी रुजवनारा असला तं रुजते' हे या उदाहरनानं सिद्घ होते कानी?

मी वारकरी नाई. दोनेक खेपा पंढरपूरलेचं म्हून गेलो इतकंच. पन वारकरी पंथाची जे एक गोठ मनाले भिडली ते म्हंजे आपन त्यायच्या पाया पडाले गेलो का तेयी आपल्या पाया पडते. मंग तिथं वयानं लहानमोठा हा भेद नाई का जातीचा भेदभाव नाई. आपन सारे एक हावो, कोनी लहानमोठा नाई, हे शिकवनं बरचं काई शिकवून जाते.

(लेखक शंकर बडे हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment