Saturday 6 October 2012

जात हवी, पण जातीयवाद नको!


जात हवी, पण जातीयवाद नको! हीच आहे ना आपली इच्छा अथवा जातिविहीन समाज निर्माण करण्यासाठी आपण कधी काय केले ?

व्यवहारात आपण आपापल्या जातींच्या व्यवहारांशी पुरेसे बांधलेले असतो. या बांधीलकीत ब्राह्मणांपासून ते ज्यांना आपण अतिशूद्र मानतो त्या जातीतलेही सर्व जण इच्छेने अथवा अनिच्छेने सहभागी झालेले असतात. असे असले तरी आम्हांला जातिविहीन समाजरचना निर्माण करायची आहे. हे वाक्य मात्र आम्ही सर्वच आणि सर्वकाल वापरतो. याचा अर्थ एवढाच, की जातीजातींपासून बनलेला समाज ही आमची वस्तुस्थिती असून ती संपवून जातिविहीन समाज निर्माण करायचा आहे. हा आमचा ध्येयवाद आहे. ध्येयवाद हा नेहमीच आदराचा विषय असतो. उदाहरणार्थ सर्वाना न्याय मिळावा असा आमचा ध्येयवाद आहे. पण व्यवहारात मात्र अनेकांवर अन्याय होत असतो. त्याचा आम्हांला खूप राग येतो. समानता हा आमचा ध्येयवाद आहे. पण व्यवहारात मात्र ज्यांचे उत्पन्न दिवसाला एक लाख रुपये आहे अशीही माणसे आहेत आणि दिवसाला ज्यांना सरासरी तीस रुपये मिळायची मारामार होते अशीही माणसे आहेत. तरीपण 'समता' या तत्त्वाबद्दल आपल्या मनात खूप आदर आहे.

आज आपणाला ज्या ज्या गोष्टींबद्दल आदर वाटतो त्या सर्व गोष्टी आपल्या स्वातंर्त्यचळवळीचे योगदान आहेत. म्हणून स्वातंर्त्यकाळात देशाला स्वातंर्त्य मिळवून देणे हेच आपल्या सर्व समाजाचे ध्येय होतं. त्यासाठी आम्ही 'चले जाव'चं आंदोलन केलं. इंग्रजांना 'छोडो भारत' असे म्हणालो. तो त्या काळात गुन्हा होता म्हणून आपल्या नेत्यांनी त्यासाठी तुरुंगात जाणं पत्करलं. तरुणांनी शाळा सोडल्या, कॉलेज सोडले आणि ते या आंदोलनात सहभागी झाले. याचा अर्थच असा, की जो ध्येयवाद आम्ही स्वीकारला त्यासाठी काही एक कार्यक्रमही आपण निर्माण केला. स्वातंर्त्यानंतर आम्हांला आर्थिक समता निर्माण करायची होती. म्हणून सगळ्य़ात जास्त आर्थिक कमाई करणारा आणि तळाचा माणूस यांच्या कमाईत दहापटीपेक्षा अधिक फरक राहू नये अशी वेतनश्रेणी निर्माण केली. आज चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि क्लास वन अधिकारी यांच्या महिन्याला मिळणार्‍या पगारात दहापटीपेक्षा अधिक अंतर नसते. हे आपण शासकीय यंत्रणेत करू शकलो. पण खासगी उद्योगांत अजूनही आपणाला करता आले नाही. अंतरिक्ष क्षेत्रात अजूनही आपणाला हे करता आलेले नाही. म्हणूनच उद्योगपती आणि मजूर यांच्या उत्पन्नातली दरी अनेक कायदे करूनसुद्धा आम्ही कमी करू शकलेलो नाही. म्हणूनच 'महागाई' वाढली. ती नियंत्रणात आणा यासाठी आम्ही कधी मोर्चे काढतो, कधी संप करतो. थोडक्यात काय, तर जी गोष्ट ध्येयवाद म्हणून आम्ही स्वीकारली ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणता ना कोणता तरी कार्यक्रम आखत असतो. जर आम्हांला जातीयवाद संपवायचा असेल तर असाच कोणता ना कोणता तरी कार्यक्रम आखावा लागत असतो. हा जातीयवाद संपविण्यासाठी आम्ही आतापर्यंत कोणता कार्यक्रम आखला, हा माझ्या मनातला प्रश्न मी आपणाला मोकळेपणानं विचारतो आहे. एकच वेळा उत्तर तेही दोन्ही बाजूंचे तुम्ही देऊ शकाल याची मला खात्री आहे.

निवडणुका जवळ आल्या आणि तिकीटवाटपाची वेळ जवळ आली की, कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? प्रामुख्याने ज्याला तिकीट देण्यात आले त्याच्याजवळ आर्थिक ऐपत किती? आणि दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे ज्या ठिकाणाहून तो उभा राहणार आहे त्या मतदारसंघात त्याच्या जातीचे लोक किती आणि अन्य जातींचे मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी त्या त्या जातीचे त्याचे समर्थक किती? प्रथम ही सुरुवात काँग्रेस पक्षाने केली. नंतर मात्र सर्वच पक्षांनी हीच वाट धरली. याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही. तरी प्रत्येक पक्षाचे लोक आम्हांला जातिविहीन समाज निर्माण करायचा आहे हे निवडणुकीच्या भाषणात सांगत असतात. जातींच्या आधारे जनगणना नको असे सांगताना आम्हांला असे वाटत असते, की अशी जनगणना केली तर जातीयवाद वाढेल. विशेष म्हणजे सगळेच राजकीय पक्ष मात्र एक छुपी राजकीय जनगणना करीत असतातच. अलीकडे उद्योगधंद्याच्या निमित्ताने तात्पुरते स्थलांतर खूप वाढले आहे. त्यामुळे परंपरागत जातीय वस्त्या संमिश्र झाल्या. त्याला भाषिक आणि प्रांतिक लोकांनी पुन्हा एकदा नव्या वस्त्यांनी सीमित केले. काँग्रेसच्या हे लक्षात आले. त्यामुळे अमराठी व परप्रांतीय उमेदवार निवडून येऊ लागले. शिवसेनेला थोडे उशिरा कळाले.; पण कळाले तेव्हा 'जय महाराष्ट्र' सुरू झाला. पण हा 'जय महाराष्ट्र'सुद्घा कुठे आगरी आहेत, कुठे त्यांची वस्ती आहे हेही लक्षात घेतले गेलेच. याचाच अर्थ निवडणुकीत जातींचा आधार घ्यायचा आणि जातिविहीन समाज निर्माण करायचा असे म्हटले तर जात जाईल कशी? मग जात मोडण्यासाठी आम्ही काय केले?

या प्रश्नाचे दुसर्‍या बाजूचे उत्तर असे, की आम्ही मंदिरप्रवेशाची चळवळ चालवली. कुणी म्हणतो आमच्या घरादारात वावरताना कोण कोणत्या जातीचा आहे असा प्रश्नच आम्ही विचारात घेत नाही. भाडेकरूलाही आम्ही कधी जात विचारत नाही. खेडय़ापाडय़ांतूनसुद्धा आता आम्ही वेगवेगळे पाणवठे असा भेदभाव बाळगत नाही. मग कुठे राहिली जात? जात फक्त राजकीय नेते छुप्या पद्धतीने आमच्यावर लादतात. वरवर ही सर्वच उत्तरे खरी वाटतात. पण थोडे गंभीरपणे आपण लक्षात घेऊ लागलो हे काही खरे नाहीहे आपल्या लक्षात येते. मंदिरप्रवेश, एक गाव एक पाणवठा, एक गाव एक मसणवटा हे कार्यक्रम जात संपवणारे नसून अस्पृश्यतेची रूढी मोडणारे आहेत. हे खरेच आहे, की या रूढीचा जातिभेद कायम ठेवण्यात खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हा जाती संपविण्याच्या दिशेने आम्हांला नेत असतो. पण अस्पृश्यता आणि जात या दोन निरनिराळ्य़ा गोष्टी आहेत हे आपण लक्षातच घेत नाही. जात ही व्यक्तिसमूहाला संघटित करणारी एक संस्था आहे तर अस्पृश्यता ही जातींनी परस्परांशी कसा व्यवहार करावा आणि एक जात दुसर्‍या जातीपासून अलग कशी ठेवावी याचे आचरण करणारी एक प्रथा आहे. एका पाणवठय़ावर पाणी भरले म्हणजे एकापेक्षा अधिक जाती एकत्रित येऊ शकतात. पण जाती मोडत नसतात. आता शहरी भागात एकच मसणवाटा असतो. पण त्यामुळे तेथे जात संपलेली असते असे मात्र नाही. मग जात कुठे पटकन आठवते? लग्न करायची वेळ आली, की ती पटकन आठवते. कुणीही कुणाची जात न विचारता आपापल्या मुलामुलींची लग्ने जुळवायची वेळ आली, की आपापल्या रक्तासंबंधी नातलगांचा शोध घेतो. एखाद्या मित्राला जात माहिती नसेल आणि त्याने वधूवर सुचवलाच तर लगेच 'नाही, ते आमचे नातलग नाहीत. आमचे आडनाव फक्त सारखे आहे' असे सांगून आपल्या जातीचे वेगळेपणच सांगत असतो. तेव्हा जात टिकवणारा गाभा म्हणजे जातीअंतर्गत लग्न. पण त्यावरही काही जण उत्तर देतात, 'आमच्या मुलाने लग्न करताना जात नाही पाहिली. आंतरजातीय लग्न केलं त्यानं.' हे सांगताना आपण जात मानत नाही. जात मोडली याचाही आनंद त्यांच्या चेहर्‍यावर असतो. पण अधिक खोलात जाऊन विचार केला, की हेही चूक आहे हे आपल्या लक्षात येते. हे कसं? तो खरेतर असतो प्रेमविवाह आणि आपण त्याला म्हणतो आंतरजातीय विवाह. कायद्यानेच विवाहातला जातीचा अडसर दूर केलेला असल्यामुळे अनेक तरुणतरुणींना प्रेमविवाह करता येणे शक्य होते. ही गोष्ट ज्यांना मान्य नसते ते आजही 'ऑनर किलिंग'चा मार्ग स्वीकारतात. अशा ऑनर किलिंगला त्यांच्या नातलगांचा मूक पाठिंबा असतो. म्हणजे 'जात' टिकविण्याचीच इच्छा असते. आंतरजातीय विवाह करण्याची तरतूद करणे ही कृती सोडल्यास गेल्या शंभर वर्षात जात मोडण्यासाठी आपण कोणता कार्यक्रम आखला? मी खूप विचार केल्यानंतरही मला असा कुठलाच कार्यक्रम आढळून आला नाही. मग जे संपविण्यासाठी आपण कोणताच कार्यक्रम आखला नाही, फक्त भाषणात बोललो एवढय़ावर समाधान मानतो ती जात संपेलच कशी? जात आणि अस्पृश्यता या जशा दोन वेगवेगळ्य़ा गोष्टी आहेत तशाच जातीय विषमता आणि जात संपविणे याही निरनिराळ्य़ा दोन गोष्टी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. जातींनी परस्परांत वैरभाव, उच्चनीचता न पाळता सौहार्दाने वागावे इतकीच आपली वाटचाल झाली आहे. समाजशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर सध्या आपण जातींची पुनर्रचना करीत या प्रक्रियेत गुंतलो आहोत आणि राजकारण आपल्या जातीच्या मुत्सद्दीपणावर आधारलेले जातीचे संघटन करीत आहे एवढेच म्हणता येते.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

No comments:

Post a Comment