Thursday 18 October 2012

पंख कापलेले पक्षी आणि मोकळे आकाश

आपल्या लहानपणी नव्हत्या अशा कोणकोणत्या गोष्टी आज आपल्या अवतीभोवती दिसतात? याची मी एकदा यादी करायला बसलो. एका दमात साठ-सत्तर गोष्टींची नोंद झाली. नंतर मला नांद लागला. कोण्या गावाला जाताना ऑटोरिक्षात बसलो की आठवते, अरे, लहानपणी आपण त्या गावाला चालत गेलो होतो. आता ऑटोरिक्षा आलेत. मोबाईलवर एसएमएस आला की अमुकअमुक यांचे निधन झाले. लहानपणी कोणाच्या निधनाची वार्ता कशी पोचायची? असे काहीही. पोराचे कपडे पाहिले की आपले लहानपणीचे कपडे आठवते. आपला असमंत बदललाय. कसा बदलला? कोणी बदलला?

कोण्या एका कुंभाराने गावात पहिल्यांदा चाक लावले असेल तेव्हा सगळे गाव ते पाहायला गोळा झाले असेल. एका बारक्याशा आरीवर एवढे मोठे चाक गरागरा फिरताना पाहून आश्चर्य वाटले असेल. कुंभाराने मातीचा चिखल करून एक गोळा फिरत्या चाकाच्या मध्यभागी टाकला आणि त्याला नुसता हात लावल्याबरोबर

मातीला आकार येऊ लागलेला पाहून लोकांनी तोंडात बोट घातले असेल. अगदी तशी परिस्थिती आज मोबाईलकडे पाहून आपली होते. नाही का?

मानवी इतिहासात जे काही चारदोन वळणे आली असतील, त्यापैकी गेल्या पाचपन्नास वर्षातील बदल एक मोठे वळण आहे. एवढे बदल ना आपल्या वडिलांनी पाहिले, ना आजोबा, पंजोबा वा खापर पंजोबांनी पाहिले.'पुढच्यास ठेच मागचा शाहणा' हे तत्त्व या बदलांच्या संदर्भात लागू पडत नाही. आपल्या पिढीत जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणारे बदल घडले आहेत. घडताहेत. याची जाणीव आज आपल्याला होत नाही. परंतु जेव्हा शंभर एक वर्षानंतर या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा भविष्यातील इतिहासकार म्हणतील की, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी जगात जेवढे बदल घडले तेवढे पूवी कधीच घडले नव्हते. त्यावेळेस आपण असणार नाहीत. परंतु आपली साक्ष त्या इतिहासकारांना काढावी लागेल. सुरुवातीलाच एक गोष्ट निकालात काढली पाहिजे की, हे बदल कोणत्याही सत्ताधार्‍यांमुळे झालेले नाहीत. बहुतांश बदल हे संशोधनामुळे झाले आहेत. तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. स्पष्ट सांगायचे तर हे बदल सर्वसामान्यांपर्यंत लवकर पोचू नयेत म्हणून अडथळे आणण्याचेच काम तेवढे शासनात बसलेल्यांनी केले. राज्यकर्ते नकाशा बदलू शकतात, पण संशोधक जग बदलतात. हा फरक आपण नीट लक्षात घेतला पाहिजे.

1) इलेक्ट्रॉनिक 2) गर्भनिरोधने 3) अणुबॉम्बचे सार्वत्रिकीकरण 4) शेअर बाजार 5) जेनेटिक्स या पाच मथळ्यांखाली या बदलांचे वगीकरण करता येईल. हे सर्व बदल अलीकडच्या पन्नास वर्षातील आहेत. त्यामुळे पन्नास वर्षापूवीच्या कोणत्याही महात्मा, थोर विभूती, संत, धर्मगुरू, विचारवंत वा कोणीही या परिस्थितीला सामोरे गेलेला नाही. या बदलांमुळे निर्माण झालेली परिस्थिती वा प्रश्नांची उत्तरे पन्नास वर्षापूवी लिहून ठेवलेल्या पुस्तकांत सापडण्याची शक्यता नाही. आपले आदर्श, आपले महात्मे कितीही थोर असले तरी ते त्यांच्या परिस्थितीत जगले होते. ज्या परिस्थितीचा त्यांनी कधीच सामना केला नाही त्या परिस्थितीविषयी त्यांच्याकडून उत्तरे मागणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. एवढेच नव्हे, तर आपले दायित्व नाकारण्यासारखे होईल. आता आपणच जळायचे. आपल्याच प्रकाशाचा कंदील करायचा आणि आपणच चाचपळत एकएक पाऊल पुढे टाकायचे. अशी ही वेळ आहे. असा संकल्प केला तरच या प्रश्नांची उत्तरे सापडू शकतील. नव्या परिस्थितीला सामोरे जाता येईल. शहामृगासारखे वाळूत मुंडी खुपसून इतिहासाच्या काळोखात कितीही प्रदक्षिणा घातल्या तरी वादळाशी मुकाबला करण्याचे बळ पंखांना मिळू शकणार नाही.

इलेक्ट्रॉनिकचा वापर सुरू झाल्यापासून वस्तूंचे विपुल उत्पादन होऊ लागले. अकल्पित वस्तू तयार होऊ लागल्या. उदाहरणार्थ कुंभार चाकावर भांडे तयार करायचा. तेव्हा तो त्या मातीपासून काय काय बनवू शकतो याचा अंदाज करता येत असे. तो तवा, पणती, लोटके, गाडगे, मडके, रांजण फार तर सुराही आदी बनवू शकायचा. इलेक्ट्रॉनिक आल्या नंतर कोणती वस्तू बनेल याचा अंदाज करता येईना. अजब वस्तूंची निर्मिती होऊ लागली. लेकरांची खेळणी पाहिल्या तरी याची कल्पना येऊ शकते. एका बाजूला विपुलता, मुबलकता आली. दुसर्‍या बाजूला विविधता. टीव्ही, संगणक आणि मोबाईल ह्या तीन वस्तू इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या सर्वाधिक परिणामकारक देणग्या आहेत. या तीन वस्तूंनी जगाचा चेहरामोहराच बदलून टाकलाय.

माणसांच्या अवयवांना बळ देण्याचे काम वस्तू करते. तापलेला तवा हाताला पोळू नये म्हणून आपण चिमटा वापरतो. चिमटय़ाने हाताला न पोळण्याचे बळ दिले. आपण पायाने किती चालू शकतो? सायकलीने त्यापेक्षा जास्त, चारचाकी, रेल्वे आणि विमानाने, अशी कल्पना केली तर लक्षात येईल की आपल्या पायांची शक्ती वाढत गेली. आपण डोळ्यांनी किती पाहू शकतो? समोर दिसेल तेवढेच. दूरदर्शनने डोळ्यांना अशा गोष्टीही दाखविण्याची सोय केली, ज्या डोळ्यांच्या पलीकडे घडतात. दूरदर्शनने डोळ्यांची शक्ती वाढविली. तसेच मोबाईलने कानांची शक्ती, श्रवणशक्ती वाढविली. माणसांचे कान एका विशिष्ट अंतरापेक्षा जास्त अंतरावरचे ऐकू शकत नाहीत. पहिल्यांदा फोनने ही शक्ती वाढविली. परंतु जेथे तारा जाऊ शकतात तेथेच फोन असायचा. मोबाईलने ते बंधन झुगारले. जेथे तारा नाहीत तेथून ऐकण्याची सोय करून दिली. माणसाच्या मेंदूची शक्ती वाढविणारे तंत्रज्ञान पहिल्यांदा संगणकाने उपलब्ध करून दिले. माणूस किती गोष्टी, किती काळ लक्षात ठेवू शकतो? माणसांचा मेंदू किती वेगाने प्रक्रिया करू शकतो? त्यापेक्षा अधिक वेगाचे पूरक साधन निर्माण झाले. त्यामुळे पहिल्यांदा माणसाच्या मेंदूला मदत करणारे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. दूरदर्शन, मोबाईल आणि संगणक या तीन साधनांनी मानवजात उन्नत केली.

दूरदर्शन आले तेव्हा गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष होते. त्यांनी कडेकोट रशियात पहिल्यांदा टीव्हीला मुभा दिली. काही वर्षात रशिया कोसळला. त्यावेळेस ते म्हणाले होते की,''रशियामध्ये बदल घडणारच होते. परंतु इतक्या लवकर घडतील असे मला वाटले नव्हते. दूरदर्शनमुळे ते लवकर घडले.'' संगणकांमुळे इंटरनेट आले. इंटरनेटमुळे जगातील एका कोपर्‍यात पडलेले ज्ञान किंवा माहिती जगभर पोचण्याची सोय झाली. जगभरातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले. इजिप्त देशात झालेले सत्तांतर इंटरनेटमुळे झाले, असे मानले जाते. लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणाले होते की, ''संस्कृतीचा विकास होण्यासाठी तिचा संकर होणे आवश्यक असते.'' दूरदर्शन, इंटरनेट ही माध्यमे त्याची अनुकूलता निर्माण करतात. गाव, प्रदेश, देश या मर्यादा ओलांडून मानवजात एक 'वैश्विक संस्कृती' निर्माण करण्याच्या कामाला लागली आहे.

हे सगळे बदल मोहिनी घालणारे आहेत. परंतु या बदलांना सामोरे जाण्यासाठी जी ताकद म्हणजे ऐपत लागते ती किती लोकांकडे आहे. भारतातील कोटय़वधी शेतकरी जगण्या-मरण्याची लढाई लढत आहेत. याच लढाईत अनेक जण धारातीथी पडत आहेत. त्यांची क्रयशक्ती कमजोर आहे. त्यांचा धंदा तोटय़ात आहे. तो तोटय़ात

राहावा अशीच धोरणे रबविली जात आहेत. नव्या तंत्रज्ञानाने जे अवकाश मोकळे केले, त्याची एकही मंद झुळूक त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. क्रयशक्तीच्या

अभावामुळे ते बदलत्या जगाच्या परिस्थितीशी सांधा जुळवू शकत नाहीत. संशोधकांनी जे मानवजातीला दिले ते शासनकर्ते आमच्यापर्यंत पोहचू देत नाहीत. त्याही पेक्षा जग बदलत असताना येणारे सगळे ताण मात्र या दुबळ्या लोकांना सोसावे लागत आहेत. भारतीय शेतकर्‍याची अवस्था पंख कापलेले पक्षी आणि मोकळे आकाश अशी झाली आहे.

(लेखक हे नामवंत विचारवंत व

सामाजिक कार्यकर्ते आहेत)

भ्रमणध्वनी : 9422931986

No comments:

Post a Comment