Monday 29 October 2012

अनुकरणीय व्यक्तिमत्त्व : कृष्णाजी हावरे


कथा किंवा कादंबरी लेखन करीत असताना लेखक आपल्या अवतीभोवतीच्या घटना, घडामोडी, प्रसंग यांचे अतिशय सूक्ष्म पातळीवर निरीक्षण करीत असतो. वास्तववादी लेखन करताना तर मनाचेही डोळे उघडून पहावं लागतं. भोवती घडलेल्या घटना, घडामोडी आणि प्रसंग लेखकाला लिहितं करीत असतात आणि या सर्व बाबींच्या केंद्रस्थानी असतात व्यक्तिरेखा. त्यांच्या विशिष्ट वर्तन व्यवस्थेमधून ठळकपणे अधोरेखित होत असतात. प्रत्येक व्यक्तीची जशी वैशिष्टय़पूर्ण अशी शारीरिक ओळख असते तशीच त्याच्या वर्तनाचीसद्धा एक अंगभूत ओळख असते. नुकताच ना. धों. महानोर यांच्या कथेवर आधारित अजिंठा सिनेमा पाहण्यात आला. त्यात एक महत्त्वाचं वाक्य आहे.''ईश्वराला आम्ही जगातलं दु:ख नष्ट कर, असं म्हणणार नाही. त्या दु:खाला पेलण्याचं बळ आम्हाला दे, अशी ईश्वराकडे मागणी करू.'' त्यात महत्त्वाचं मानलं आहे.

समाजात सरसकट दु:ख नसतं. तशीच सरसकट एका प्रवृत्तीची माणसंसुद्धा नसतात. मात्र समाजातील काही माणसं समाजाला उपद्रव देण्याचं काम करतात, तर काही माणसं समाजाची उपद्रव मूल्यापासून, दु:खापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाच 'समाजसेवक' असं म्हटलं जातं. 'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती' असं म्हणूनच म्हटलं जातं. अशा माणसांची दु:खाच्या वेळी सगळय़ांना आठवण होते किंवा अशी व्यक्ती दुसर्‍याच्या दु:खात धावून जाते. दुसर्‍याच्या तोरणादारी आणि मरणादारी जी व्यक्ती आपले वैयक्तिक व्यापताप सोडून धावून जाते, अशी व्यक्ती समाजात आपोआपच आदराच्या केंद्रस्थानी येते, समाजमान्य ठरते. विशेष म्हणजे प्रत्येक गावखेडय़ात अशा काही व्यक्ती असतात त्यांचा समाजाला आधार वाटत असतो. जानेफळ येथील कन्या विद्यालयात शिक्षकाची नोकरी करणारे कृष्णाजी नारायणराव हावरे हे व्यक्तिमत्त्वसुद्धा उपरोक्त गुणवैशिष्टय़ाने परिपूर्ण आहे. आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, आळशी आहे, असे सगळीकडे ऐकायला मिळते. काही प्रमाणात त्या गोष्टीमध्ये सत्यांशसुद्धा असतो किंवा असू शकतो. पण अशा तरुण पिढीपुढे जर संपन्न जगण्याचे, अस्मितेचे पर्याय उपलब्ध करून दिले तर त्यातून स्वराज्य निर्माण करणारी मावळय़ांची पिढी घडू शकते, यात शंका नाही. दिवसभर आपली नोकरी सांभाळून संध्याकाळी कृष्णा हावरे जानेफळ येथे 'वीर हेल्थ क्लब' चालवतात. तरुणांनी सकाळ-संध्याकाळ या हेल्थ क्लबमध्ये यावं आणि आपलं आरोग्य घडवावं. यासाठी त्यांनी गावातील तरुण हेरून त्यांना आवाहन केलं आणि पाहता पाहता गावाचं चित्र बदललं. रिकाम्या वेळी गावगप्पा मारणारे, दुकानाच्या, पाराच्या ओटय़ावर पाय हलवत वेळ घालविणारे पोरं हेल्थ क्लबमध्ये येऊ लागले आणि स्वत:च्या आरोग्याप्रमाणेच समाजाच्या आरोग्याचीसुद्धा काळजी वाटू लागली. विधायक सामाजिक कामे करण्याच्या नशेने धुंद झाले.

या वीर हेल्थ क्लबच्या निर्मितीसाठी कृष्णा हावरे यांनी स्वत:जवळची दीड लाख रुपयांची पुंजी गुंतवली. ती केवळ समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेनेच. म्हणूनच तरुणांची जशी संख्या वाढू लागली तशीच उपकरणाचीसुद्धा संख्या वाढविण्याची गरज भासू लागली; पण त्यासाठी त्यांची तयारी आहे. स्वत: व्यायाम करून जसे निकोप व सुदृढ शरीर आणि प्रसन्न, उमदे मन त्यांना घडवता आले, तसेच इतर तरुणांनी घडावे यासाठी त्यांचा आटापिटा आहे.

सतत समाजात संपर्क राखून असल्यामुळे त्यांच्या शब्दांना आपोआपच महत्त्व आले. त्यातूनच गावपातळीवर शांतता कमिटी स्थापन केली गेली. तिचे अध्यक्षपद कृष्णा हावरे यांच्याकडे आले. गावपातळीवरील तंटामुक्ती अभियानाचे खरे काम या कमिटीने केले आहे. कारण राज्यपातळीवर तंटामुक्त गावाची संकल्पना येण्याच्या पूर्वीपासूनच म्हणजे गेल्या 15 वर्षापासून या कमिटीने गावातील अत्यंत गंभीर स्वरूपाचे वाद गावातच मिटविले आहेत. मानसिक शांती ही आध्यात्मिक शांतीतून निर्माण होते. याची जाणीव त्यांना झाल्यामुळे वेळप्रसंगी सण, उत्सवाच्या माध्यमातून गावकर्‍यांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक उपक्रम राबवून त्या माध्यमातून त्यांना अभिव्यक्तीची वाट उपलब्ध करून देण्याचे कार्य कृष्णा हावरे यांनी केले आहे.

जानेफळ या गावी 'हावरे सर' म्हणून प्रसिद्ध असलेली ही व्यक्तिरेखा खरोखर एखाद्या कादंबरीचा नायक ठरावी अशीच आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अवलोकन केल्यानंतर वाटत राहते. आपल्या वर्तनातून अनुकरणीय आणि विधायक कार्य करणारी व्यक्तीच गावाच्या आकर्षणाच्या, आस्थेच्या आणि आदराच्या केंद्रस्थानी येत असते. हावरे सरांनी आजपर्यंत केलेल्या अनेक लक्षवेधी सामाजिक कार्यामुळे तसे ठामपणे म्हणता येईल. कारण आपल्या जीवाची पर्वा न करता आजवर त्यांनी अनेकांचे जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

एक अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून माझी व कृष्णा हावरेंची ओळख तो ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असताना झाली. घरची अत्यंत अभावग्रस्त परिस्थिती, आईचा मृत्यू झाल्यामुळे पोरकेपण वाटय़ाला आलेले. अशा अवस्थेत परिश्रमपूर्वक अभ्यासक्रम पूर्ण करून कला शाखेत बारावीला भरघोस गुण कृष्णा हावरेने मिळविले. केवळ तीन गुणांनी गुणवत्ता यादीत नाव येऊ शकले नाही. त्याची खंत मनाशी बाळगून पुढील आयुष्यात शिक्षक होऊन समाजाचे ऋण फेडायचे असा चंग बांधला व आपले शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिदशेपासूनच त्यांच्यातील सर्वागीण गुणवत्ता गावाने हेरली होती. त्यामुळेच सरस्वती शिक्षण समितीच्या गुणग्राहक संचालक मंडळाने त्यांना सरस्वती कन्या विद्यालय येथे शिक्षक म्हणून रुजू करून घेतले व त्यामुळेच त्यांचे समाजसेवेचे काम उत्तरोत्तर शिखरावर गेले.

त्यांच्या पहिल्या सामाजिक कार्याची ओळख झाली ती बुरुजाशी उभी असणारी गाय पावसाळी दिवसात बुरुज अंगावर कोसळून पूर्ण दबली असताना, वरच्या ढासळत्या गढीची पर्वा न करता त्यांनी गायीचे प्राण वाचविले. त्यानंतर गावातील सर्वात खोल असलेल्या आणि तुडुंब भरलेल्या विहिरीच्या तळातून हरीश छापरवाला या मुलाला तळाशी बराच वेळ शोध घेऊन बाहेर काढले. विद्युत तारेला चिकटलेल्या तुळशीदास नाके यांच्या मुलाला 20 फुटांवरून खाली आणून तत्काळ दवाखान्यात नेऊन जीव वाचविला. बसस्थानकावरील बूट हाऊसला अवेळी आग लागली तेव्हा ती विझविण्यासाठी पुढाकार घेऊन पुढचा अनर्थ टाळला. गावात कोणत्याही घरी कितीही मोठा नाग निघाला तरी पहिल्यांदा मोबाईलवर कळविले जाते ते हावरे सरांना. अशा कितीतरी अडचणीत सापडलेल्यांना त्यांनी शारीरिक मदत तर केलीच; पण रूढी, परंपरेला बदलण्याचे काही आदर्शसुद्धा स्वत:च्या वर्तनातून समाजाची मानसिकता बदलण्यासाठी घालून दिले. जसे की, अंबिकानगरमधील गरीब कुटुंबाची झोपडी जळाल्यानंतर मित्राच्या मदतीने गावात मदतफेरी काढून त्या कुटुंबाला तीस हजार रुपयांची मदत केली. त्याचप्रमाणे समाजाचा आणि भावकीचा विरोध असूनही आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची तेरवी न करता त्या पैशातून गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांचा सत्कार घडवून आणला.

त्यांना लाभलेल्या संवेदनशीलतेमुळे त्यांच्या हातून ही सामाजिक कार्ये होतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अभिनयकौशल्य; वक्तृत्व गुण वाढीला लागावे म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते अग्रेसर असतात. असे कितीतरी वक्ते घडविण्याचे त्यांचे कार्य सुरू असते. त्यासाठी सर्जनशील पातळीवरचे लेखन करताना कथा, कविता, हास्यकविता लिहून त्यांचे सादरीकरण करण्याचे काम ते ग्रामोत्सवातून करीत असतात.

या सर्व घटनांमध्ये सर्वात चित्तथरारक आणि वेदनादायक प्रसंग जानेफळ येथील जर्मन डॅमवर अनुभवल्याचे त्यांचे मित्र सांगतात. 27 एपिल्र 2009 रोजी विष्णू गवई यांचा मुलगा किशोर हा दहावीची परीक्षा देऊन सुटय़ा घालविण्यासाठी काकांकडे आला होता. मित्रासोबत तो जर्मन डॅमवर पोहायला गेला; परंतु त्याला पक्के पोहणे येत नसल्यामुळे तो धरणाच्या पाण्यात बुडाला. त्याचे सर्व मित्र घाबरून पळून गेले. किशोरला बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. तीन-चार तास शोध घेतल्यानंतरही त्याचा थांगपत्ता लागला नाही. कृष्णा हावरे यांना बातमी समजताच त्यांनी धरणात उडी घेतली. पाणी शांत झाले. बराच वेळ झाला तरी लोकांचे आवडते हावरे सर वर न आल्याने अनेकांच्या काळजाचे ठोके चुकले; पण ते वर आले तो किशोरचा मृतदेह सोबत घेऊनच. जेव्हा किशोरचा अंत्यविधी करण्याची वेळ आली तेव्हा किशोरची आई रंजना यांनी जोपर्यंत हावरे सरांचा सत्कार होत नाही तोपर्यंत अंत्यविधी होऊ देणार नाही, असा आग्रह धरला. पण त्यांनी नम्रपणे सत्कार नाकारला. तसाच शेतावर मृत्यू पावलेल्या रोकडे यांचा मृतदेहसुद्धा त्यांनी रात्री एक वाजता खांद्यावरून आणला होता.

सहारा मित्रमंडळाच्या वतीने ग्रामसफाईपासून अनेक विधायक कामे करणार्‍या, आतापर्यंत 20 वेळा रक्तदान करणार्‍या हावरे सरांनी आज जानेफळ परिसरातील तरुणांसाठी वेगळा आदर्श घालून दिला आहे. म्हणूनच अशा आदर्शभूत व्यक्तिरेखेचा परिचय चारीमेरा होऊन त्यांचे अनुकरण करण्याची प्रेरणा अनेकांना मिळावी म्हणूनच आजचा हा लेखनप्रपंच!

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून

'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ, ता. मेहकर जि.बुलडाणा

No comments:

Post a Comment