Sunday 7 October 2012

हिंडगोळी


''कुठी गेली ते हिंडगोळी?''
''काय मालूम''
''पोरीवर ध्यान ठेवत जाय.. जवान पोरगी रात्री बेराती हिंडते.. लय बेसरम झाली ते''

''ते गेली असन गरबा डान्सच्या प्रॅक्टीसले''

''डान्सर होते काय? तुहया लाडानं वाया गेली ते पोरगी.. पोरीवर मायचं ध्यान पाह्यजे.. तिकडे पोरगी एकटी हिंडते अन् तू बसतं सिरीयला पाह्यत''

''कल्ला नका करू''

''पोरगी आली नाही तरी कल्ला नका करू? कमाल झाली! आता रातचे साडेदहा वाजून राह्यले.. या टाईमले पोरीच्या जातीनं बाहीर फिरनं बरोबर आहे काय? तोंडाले दुपट्टा बांधते अन् स्कुटी घेऊन गरगर फिरते''

''देवळाजवळ गेली असन''

''मी सारी कॉलनी फिरून आलो.. तिचा कुठीच पत्ता नाही''

''कांपुटरच्या क्लासले गेली असन''

''मी तिच्या क्लासवर जाऊन आलो.. क्लास आठ वाजताच खतम झाला''

''पिंकीच्या घरी पाहा''

''मी पिंकीले फोन लाऊन बसलो, शेजारी पाह्यलं.. कुठीच तिचा ठाव ठिकाना नाही''

''भूक लागली की बरोबर घरी येते''

''पण मी म्हनतो इतक्या रातलोक फिर्‍याचं काही काम आहे काय? झाकट पडली की पोरीची जात घरी पाह्यजे, कॉलनीतल्या पोरी रातच्या फिरतात काय? त्याहिचे मायबाप जाऊ देतात काय?''

''येईनच घरी.. जाईन कुठी?''

''दुसरे लोकं नाव ठेवतात.. साहेबाची पोरगी रात्रीबेरात्री मोकाट फिरते म्हंतात''

''तुम्ही फारच टेन्शन घेता.. कोन्या पोरीसोबत गेली असन''

''पोरीसोबत गेली की पोरासोबत गेली? मले तिचे लक्षनं दुसरेच दिसून राह्यले''

''कशावरून?''

''तिचं अभ्यासात लक्ष नाही, अर्धा अर्धा घंटा मोबाईलवर बोलत राह्यते, इंटरनेटवर जे नाही ते पाह्यते.. मायनं पोरीवर ध्यान ठेवलं पाह्यजे.. गरबा डान्स कराले गेली की अदीक कुठं गेली.. आपल्याले काय ठाऊक?''

''तुम्ही विनाकारन पोरीवर शंका घेऊन राह्यले, माही पोरगी तशी नाहीच!''

''सार्‍याच मायबापाले असंच वाटत असते, अंदरचे गुन कोनं पाह्यले? आता मी पुर्‍या कॉलनीले चक्कर मारुन आलो.. पोरीचं नख दिसलं नाही, आजकालच्या पोरी तोंडाले दुपटे बांधतात अन् हरनीसारख्या गाडय़ा पिटालतात.. दुपटा बांधला की काहीच पत्ता लागत नाही.. कोन व्हय? कोनाची व्हय.. काहीच समजत नाही, दुपटा फारच फायद्याचा झाला''

''आता बडबड करू नका.. मुकाटय़ानं जेवून घ्या''

''पोरगी घरी आल्याशिवाय मले घास धकत नाही''

''दयारामले फोन लावा''

''हॅलो.. दयाराम.. झोपला काय? हा काही झोपाचा टाईम हाय''

''काय लेका?''

''काय झालं?''

''अरे आमची शिली गायब झाली.. साडेदहा वाजले तरी घरी आली नाही.. तुले दिसली काय?''

''मले नऊ वाजता दिसली होती.. मन्यासोबत हातगाडीवर फुगे खाऊन राह्यली होती''

''तुह्या तिले घरी धाडून द्या लागत होतं''

''ते म्हने मी घरीच चालली''

कायची चालली.. ते तिकडे फिरून राह्यली..''

''येईनच घरी.. कायजी करू नका.. झोपून राहा''

''काय बोलून राह्यला लेका.. पोरगी गायब झाली अन् मानसाले झोप येईन काय? ठेवतो फोन''

''काय म्हनते दयाराम?''

''मन्यासोबत दिसली म्हनते''

''कोनता मन्या?''

''आपल्याच कॉलनीतला भंटोल पोट्टा हाय.. दिवसभर चिळीमारी करते कॉलनीत''

''त्याच्यासोबत कुठं गेली?''

''मले ठाऊक असतं तर कान धरून आनली नसती काय? आता येउदे तिले.. साजरे कान उपटतो''

''तुम्ही इचार करू नका.. इचार केल्यानं तुमची बीपी वाढते''

''अकरा वाजले तरी इचारच नाही? एखांद्या रोजी हे पोरगी आपलं नाक कापीन तवा तुले समजीन. गेल्यासाली आपल्याच कॉलनीतली एक पोरगी अशीच वाया गेली, मायबापाचं लक्ष नाही.. पोरगी बारा एक वाजेलोक गरबा डान्स कराले जाये. असं करता करता शेवटच्या दिवशी एका रिकाम्या पोरासोबत हात धरून पळून गेली. अशी पोरगी निघाली तं डोकसं घ्याव काय मायबापानं? पोरीवर मायचं वजन पाह्यजे.. तुले वाटते माही पोरगी फारच गुनवान हाये.. आजकालच्या पोरी मायबापाले चाटा मारतात, तिकडे पुन्या मुंबईत रेव्ह पाटर्य़ा करतात.. रातभर नाचतात.. पोलीसानं धाड टाकली की तोंड लपोतात..''

''स्कुटीचा आवाज आला.. ते आली शिली''

''कावं भटकभवाने.. कुठं गेलती?''

''कीर्तनात''

''बापाशी खोटं बोलतं काय? हानू काय एक झापड? कुठं होतं कीर्तन?''

''राम मंदिरात''

''पाहा.. मी म्हनो किती माही पोरगी तशी नाहीच.. तुम्ही विनाकारन शंका घेऊन राह्यले''

''तु मुकी बस उसल्या तोंडाचे! तुले काही शेंडाबुळूख ठाऊक नाही, राम मंदिरात कीर्तन नव्हतं, तबलापेटीचं भजन होतं, हे पोट्टी त्या मन्यासोबत फिराले गेली होती.. मले सारा पत्ता लागला.. हे खोटी बोलून राह्यली''

''मी कायले खोटी बोलू?''

''एक देवून होदाळीत.. लय मज्जावली काय? मायबापाचं नाव गमावतं काय? लय हिंडगोळी झाली ते.. दुपट्टा बांधला की चालली वारानी.. सकायपासून सातच्या अंदर घरी दिसली पाह्यजे.. आम्ही इकडे वाट पाहू पाहू बेजार झालो.. अन् ते घुबळ बारा वाजेलोक मोकाट फिरते.. याच्यापुढे अशी रात्री बेरात्री गेली तर याद राख.. तंगडी तोडून ठेवीन.. बस झाला तुहा लाळ!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572

No comments:

Post a Comment