Thursday 2 August 2012

काळजाला त्रास होतो.. बारमाही!!


तसा हा श्रवणाचा महिना. कुठे श्रवणासारखाच रिमझिम, कुठे थेट पावसाळ्य़ासारखा गच्च मिठी मारून बसलेला.. तर कुठे कोरडा ठणठणीत! जीवघेणा! उदासवाणा!

पण श्रवण म्हटलं की हिरवळ.. फुलणं. बहरणं. भुरभुरणं आणि अचानक छेड काढून लपून बसावं. तसा सारा खटय़ाळपणा! ऊनही. पाऊसही! तापणंही-विझणंही! शहराणंही-भिजणंही!

श्रवण म्हणजे निरनिराळे रंग.. निरनिराळया छटा.. सप्तरंगी इंद्रधनुष्यचं! आपलं जगणंही तसंच..श्रवणासारखं!

सोहळा हा खास होतो. बारमाही

आगळा वनवास होतो.. बारमाही!

भेटलो का आठवेना. बोललो का आठवेना

का तुझा आभास होतो. बारमाही?

वादळाच्या सोबतीला पेरले का चांदणे तू.

काळजाला त्रास होतो. बारमाही!

या नदीला., त्या नदीला. त्या नदीला पूर येतो.

.आणि मी मधुमास होतो. बारमाही!

केवढी भन्नाट आहे. सांडण्याचा खेळ सारा.

जन्म होतो, र्‍हास होतो.बारमाही!!

खरंतर आयुष्यात खूप माणसं भेटतात. काही ओळखीची होतात. काही पाहुण्यासारखी मनात येतात. काही भाडेकरूसारखी असतात- सरळ सरळ सोय पाहून चालणारी! देवाणघेवाण करणारी! सोयीचे हिशेब सांभाळणारी!

काही माणसं तर 'एटीएम'सारखीच! चोवीस तास आनंदाची बरसात! कधीही आठवण करा.. लगेच मोरपिसासारखी मनाला छेडून जातात! अशी माणसं आयुष्यात आलीच तर त्यांना ओळखता आलं पाहिजे! जपता आलं पाहिजे! हृदयाचं कोंदण त्यांच्या हवाली करता आलं पाहिजे. मनापासून सादही देता आली पाहिजे! प्रतिसादही देता आला पाहिजे.

व्याकुळलेलं हिरं रान

एकेक फांदी, एकेक पान

नदी-नाले लावून बसले

तुझ्या शब्दाकडे कान

आतुर झाले फुलण्यासाठी

काटेगोटे बाभूळबन

निदान त्यांच्यासाठी तरी

तू फक्त 'हो' म्हण!

खरंतर आयुष्य आहेच किती इवलसं? पण तेही आपण धड जगत नाही. स्वत:चं आयुष्य जगण्यापेक्षा इतरांची छिद्र बघण्यातच वेळ का घालवतो. याचे दोष काढा, त्याचा घास आपल्याकडे ओढा, यातच आपल्याला मजा येते! सुखदु:खाच्या आपल्या कल्पनाच फसव्या! खोटय़ा! दांभिक! 'इगो' सांभाळण्यातच आपण सदैव गुंतलेले असतो. त्या नादानपणातच सुख केव्हा चिमटीतून निसटून गेलं याचा आपल्याला पताही लागत नाही. आणि जेव्हा कळायला लागतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

आयुष्य किती छोटे. चल धो धो बरसू या

दे फेकून दे लोटे. चल धो धो बरसू या!

तू सोड तुझा हेका.. अन् मीही खुला होतो

कोणीच नसे मोठे. चल धो धो बरसू या!

तू काल म्हणालीस ना, 'मी खूप सुखी आहे'

सारेच तुझे खोटे. चल धो धो बरसू या!

मन मारून जगण्याने जगणेच वजा होते

झालेत किती तोटे. चल धो धो बरसू या!

बरेचदा ढगामध्ये किती पाणी असेल याचा विचार करण्यातच आपला वेळ वाया जातो. आपल्या तळ्य़ाची खोली आपण तपासूनच बघत नाही. कमी असेल तर ती वाढवण्याचा प्रयत्नही करत नाही आणि मग माझ्याच वाटय़ाला वाळवंट का आलं? असा ओरडा करत बसतो. ज्याच्या वाटय़ाला बागा आल्यात. ज्यांचे मळे बहरलेत त्यांची मेहनत, त्यांची निष्ठा, त्यांचे समर्पण याचा कधी विचारच करत नाही.

चार भिंतीच्या आत स्वत:ला कोंडून घेणार्‍याला बाहेर बघण्याची कितीही इच्छा झाली तरी खिडकीपेक्षा मोठं आभाळ दिसणार तरी कसं? त्यासाठी बाहेरच यावं लागेल! भिंती तोडाव्या लागतील! कुंपणं तोडावी लागतील!

जसे कोवळे रंग पानातले

जसे मोकळे श्वास रानातले

तसे गाऊ या, मी म्हणालो परंतु..

तुझे वागणे संविधानातले!

म्हणून मनाच्या हाका ऐकायला हव्यात! आतल्या लाटांना मोकळं सोडायला हवं! मनाचे कायदे वेगळे! माणसाचे कायदे वेगळे! आपले कायदे वेळोवेळी बदलत असतात. बदलले जाऊ शकतात. त्यामुळे फारसा काही फरकही पडत नाही. निसर्गाचे कायदे मात्र कधीच बदलत नसतात. टाळतो म्हटलं तरी फार काळ टाळता येत नाहीत. आपण आपली छत्री उघडली म्हणजे पाऊस थांबला असे होत नाही. तो कोसळतच असतो. भिजवतच असतो.

.तेव्हा.. श्रवणामध्ये भिजायचं. की दुलई पांघरून निजायचं.

ज्याचं त्यानं ठरवावं! करा विचार!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी'

हा त्याचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment