Friday 31 August 2012

करलो वोट मुठ्ठी में..


काही वर्षांपूर्वी अशा प्रकारचं घोषवाक्य घेऊन एका कंपनीने आपली मोबाईल सेवा धडाक्यात सादर केली होती. या सेवेचा शुभारंभ करताना एका मंर्त्याने असे म्हटले होते की, उद्या भारतातल्या माणसाच्या पायात एकवेळ चप्पल नसेन, पण त्याच्या हातात मोबाईल असेल. तो संबंधित कंपनीचाच असावा यासाठी विशेष प्रयत्नदेखील झाले होते. हे सारे याकरिता आठवले की, संपुआ सरकार 'हर हाथ में फोन' या नावाची योजना जाहीर करण्याच्या विचारात आहे. हा लेख लिहेपर्यंत ती घोषणा झाली नव्हती. दुसर्‍या पक्षाच्या माजी मंर्त्याच्या भविष्यवाणीला वास्तवात उतरविण्यासाठी मनमोहनसिंगांचे सरकार अशी योजना आणेल, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. आणि तीदेखील दारिद्रय़रेषेखालील जनतेसाठी, म्हणजे पायात चप्पल तर सोडा, ज्यांना दोन वेळचे खायची भ्रांत आहे अशांना मोबाईल देण्याची ही अद्भुत, अभिनव, अतिकल्पक अशी ही योजना आहे. 'बौद्धिक दिवाळखोरी' हा शब्द ऐकला होता. माझ्या वडिलांचे एक सुप्रसिद्ध उद्बोधन होते, 'जागतिक बिनडोक' तर, ह्या दोन्ही उपमा, संबोधने, इ. सार्थकी लावणारी मंडळी याच एका जन्मात बघायला मिळेल, असे वाटले नव्हते. नरदेहाचे कल्याण म्हणतात ते हेच. असे धन्य लोक बघायला आणि अशा कल्पना ऐकायला मिळणे याला भाग्यच लागते. ही अद्भुतरम्य कल्पना ऐकल्यावर माझ्या मन:पटलावर अनेक चित्र तरळू लागली. विचारांचे थैमान उठले. प्रश्नांचे काहूर माजले (काहूर, थैमान यांचा क्रम इकडला-तिकडे झाला असेल, तर समजून घ्या. माझ्या मेंदूचं सध्या संसदभवन झालेलं आहे.) सदरहू योजनेंतर्गत प्रत्येकाला 200 रुपयांचा टॉकटाईम देण्यात येणार आहे. पण मेसेज पॅकबद्दल काहीच खुलासा नाही. तेव्हा किती मेसेजचं पॅकेज राहील, हे स्पष्ट व्हावे. त्याबरोबर हँडसेट साधा राहील की, मल्टिमीडिया? कनेक्शन 2 जी राहील की 3 जी. शक्यतो 3 जी याकरिता द्यावे की, समजा भूक लागली आणि खायला काही नसेल, तर नेटवर वेगळ्य़ा डिशेशची चित्रे पाहता येतील आणि डाऊनलोड करता येतील आणि लेकरू रडलं तर समजूतही काढता येईल. 'आज मेरी गुडिया क्या देखेगी, पनीर बटर मसाला या चिकन करी?' (माझं खाद्यपदार्थातलं ज्ञान यापुढे नसल्याने कृपया हेही समजून घ्यावे) हँडसेट टचस्क्रीन राहील की साधा, कलर राहील की ब्लॅक अँड व्हाईट, डय़ुएल सिम राहील की सिंगल सिम, मेमरी कार्ड किती जीबीचे असेल, खाजगी कंपनीचा असेल की, 'भगवान से भी नहीं लगता'वाल्या नेटवर्कचा, नेटवर्क चांगलं असेल तर सरकारला अशी जाहिरातही करता येईल! आपके पेट में भलेही अन्न का दाना ना हो, लेकिन आपके फोन में नेटवर्क जरुर होगा', 'रुखी-सुखी खाएंगे मगर कनेक्ट रहेंगे', कोई भी धरम हो, कोई भी जात, भुखे पेट अब सभी करेंगे बात! कनेक्शन लाईफटाईम असेल की बॅलन्स संपल्यावर बंद पडेल?

सरकारी नोकर्‍यांमध्ये ज्याप्रमाणे जातीनिहाय सवलती असतात तशा सवलती मोबाईलधारकांना मिळतील का? अमुक एका जातीच्या माणसाला मेसेज पॅकेज मोफत, तमुक एका जातीच्या माणसाला आयफोन, अशा सोयीसवलती राहतील का?

कल्पना करूयात रिंगटोन कसे राहतील? काही अशा असतील.. मोहे सजन तोहे भुख लगी तो पुरी-कचेरी रसगुल्ला बन जाऊंगी, मैं तो रस्तेसे जा रहा था - मैं तो भेलपुरी खा रहा था.. 'जमाईराजा' या अनिल कपूर-माधुरी दीक्षित यांच्या सिनेमातलं 'बट्टाटावडा', 'चंदामामा दूरके पुए पकाये खीरके, आप खाये प्यालीमें मुन्ने को दे थाली में..'

गरिबांना मिळणार्‍या सवलतीमध्ये या योजनेंतर्गत मिळणारा मोबाईल आयकार्ड म्हणून वापरता येईल का? स्वस्त धान्याच्या दुकानात मोबाईल दाखवून अन्नधान्य मिळेल का? जीवनदायी योजनेंतर्गत मोबाईल पाहून डॉक्टर फुकटात ऑपरेशन करेल का? रजिस्टरमध्ये नावाऐवजी अमक्या-अमक्या नंबरचे ऑपरेशन झाले, अशी नोंद करतील का? रिचार्ज मारण्यासाठी 'शासकीय मोबाईल रिचार्ज केंद्र' (दारिद्रय़रेषेंतर्गत) राहील का? ज्या गरिबांकडे वीज नाही त्यांच्यासाठी विद्युत महामंडळ 'शासकीय रिचार्ज केंद्र (दारिद्रय़रेषेंतर्गत) सुरू करेल का, की त्याऐवजी सरकार सोलर मोबाईल देईल? उद्या चालून या योजनेत घोटाळा झाल्यास 'अमक्या अधिकार्‍याने लाटला गरिबांचा टॉकटाईम' असे वृत्तपत्रांतील बातम्यांचे मथळे असतील का? आणि सरतेशेवटी कुठल्याही सरकारी योजनेच्या अशाप्रकारे चिंध्या फाडू नयेत म्हणून सरकार मला लाईफटाईम कार्डसहित फुकटात मोबाईल देईल का?

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत.

'गंमतजंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

No comments:

Post a Comment