Monday 27 August 2012

मीसकॉल आला


''ओ डाक्टरसाहेब..''
''बोला..काय होते तुमाले?''

''मले एका आंगोळावर झोपच लागत नाही'

''कशावर?''

''आंगोळावर! म्हनजे एका साइडले''

''उजव्या आंगोळावर लागते काय?''

''नाही.. जेवन्या आंगोळावर लागते''

''त्यालेच उजवा म्हंतात''

''डाव्या आंगोळावर अजिबात लागत नाही''

''मग चित्ते झोपत जा''

''चित्ता झोपलो की मान अकडते''

''मग उबळे झोपत जा''

''उबळा झोपलो की दम कोंडते''

''कशावर झोपता तुम्ही?''

''बाजीवर''

''खाली झोपत जा''

''खाली पाठ अकडते''

''मग पलंगावर झोपत जा''

''पलंगावर मी फुकटई झोपत नाही''

''काहून?''

''पलंगावर झोपलो की मले भेव लागते''

''कायचा भेव?''

''भयंकर सपन पडले, सपनात मले खावराडीवरा वाघ दिसते, तो माह्या अंगावर धाऊन येते''

''तुमची काहीतरी मानसिक बिमारी दिसते''

''मानसिकचा सवालच नाई.. आपलं सारं बरोबर हाये.. दोन टाइम जेवतो.. चार टाइम बिली पेतो''

''दिवसा झोपता काय तुम्ही।''

''दिवसा कोनाले झोप लागते हो? पोट्टे झोपू देत नाहीत, दिवसभर दांगळो करतात''

''किती वाजता झोपता?''

''सारे झोपल्यावर झोपतो''

''कुठं झोपता?''

''बायकोपाशी! म्हनजे अन् मी वसरीत झोपलो.. तरी बयाबया डोया लागत नाही''

''तुम्ही एक काम करा''

''काय करू?''

''घरात मोठा पायना बांधा अन् पायन्यात झोपत जा.. बायकोले झोके द्याले लावत जा''

''चेंढायन्या करता काय?''

''तुमची मानसिक बिमारी आहे म्हनून म्हनतो, ह्या झोपीच्या गोळ्या घ्या.. रोज रात्री एक घेत जा''

''झोपल्यावर की झोपीच्या आगुदर?''

''तुमाले टाइम सापडला तशी घ्या.. या आता..''

''हे घ्या तुमची तीस रूपये फी.. अदीक एक राह्यलं साहेब..''

''आता काय राह्यलं?''

''बायकोची कंबर दुखते.. तिले गोया द्या''

''ह्या कंबरच्या गोया लिहून देतो''

''अदीक एक राह्यलं.. पोहीले गालफुगी झाली.. तिलेबी काहीतरी औषीध द्या''

''झालं काय आता?''

''बुढय़ाचं काय झालं?''

''बुढय़ाले यादमुई झाली.. लय तरास हाय बुढय़ाले..''

''बुढय़ाले तपासाले घेऊन या''

''तशाच गोया लिहून देना.. बुढा कुठी जात नाही''

''ह्या गोळ्या लिहून देल्या''

''आता शेवटचं राह्यलं..''

''आता काय?''

''बुढीले दमा हाये..''

''तीस रूपयात घरचे सारेच पेशंट तपासून घेता काय? बुढीले घेऊन या ..चला या आता.. नेस्ट.. काय नाव तुमचं?''

''पोपटराव! मोबाईलच्या दुकानात काम करतो''

''काय त्रास आहे?''

''दोन दिवसापासून माहा पोट बिघडलं साहेब.. अलग अलग मिसकॉल येतात.. तर्‍होतर्‍हेचे रिंगटोन वाजतात''

''जेवन सुरू आहे काय?''

''जेवन सुरूच आहे.. म्हनजे इनकमींग सुरू आहे पन आऊटगोइंग बंद हाये''

''किती वाजता जेवता?''

''आपली कॅपॅसीटी जास्त नाही.. फक्त टू जीबी''

''म्हनजे?''

''सकाऊन संध्याकाई दोन-दोन पोळ्या। मंधात पाच दहा रूपयाचं व्हाऊचर मारतो''

''म्हनजे?''

''हाटेलात भजेवळे..''

''हाटेलात खाऊ नका''

''तरी मी कव्हरेज एरीयाच्या बाहीर जात नाही, म्हनजे कोनाच्या घरी खात नाही, तरी मले एसएमएस येतात''

''काय येतात?''

''खट्टे डकार येतात, मंधामंधात एफएम वाजते, म्हनजे पोट कुरकुर करते, रात्री आलार्म वाजतात, तरी मी बारा वाजेलोक व्हायब्रेटरवर असतो, म्हणजे काहीच खात नाही''

''तुमचं नेटवर्क बिघडलं, डबल सेटींग करा लागते''

''ते रिसेट होइन पन आगुदर हे मीसकॉल बंद करा''

''तुम्ही गरम पानी येत जा''

''गरम पानी पेलो की हॅंडसेट गरम होते''

''म्हनजे?''

''पोट गरम लागते, गरम पानी जास्त धकत नाही म्हनून मी थंडा रिचार्ज मारतो'' ''थंडा म्हजे काय?''

''थम्सअप.. आपलं सीमकार्ड लहान आहे, जास्त भूक लागत नाही''

''पोट साफ होते काय?''

''होतच नाही.. समजा संडासची इच्छा झाली तरी तिकून मॅसेज येते.. इस रूटकी सभी लाइने व्यस्त है।''

''कठीन काम झालं तुमचं''

''मी कावलो साहेब या बिमारीले.. बरं जेवलो की बॅलन्स कमी होते.. कालपासून किलोभर वजन कमी झालं''

''काही हरकत नाही.. ह्या गोळ्या घ्या''

''पहा साहेब.. बोलता बोलता मिसकॉल आला..''

''आता तुम्ही लवकर उठा इथून''

''पैसे देतोना..''

''पैसे राहू द्या.. आगुदर बाहीर व्हा.. चला नेस्ट..''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572

No comments:

Post a Comment