Thursday 23 August 2012

वा! मर्दानो.. वारे वा!


जात-पात-धर्माच्या आधारावर कुणावर अन्याय, अत्याचार होत असेल तर त्याचा निषेधच करायला हवा! ज्याच्यात माणुसकी जिवंत आहे त्या प्रत्येकाच्या मनात अशा घटनांबद्दल चीड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

पण म्यानमारमध्ये घडलेल्या घटनांचा मुंबईतल्या लोकांशी काय संबंध? आसाममध्ये घडणार्‍या हिंसाचाराचा निषेधच करायचा असेल तर शांततेच्या मार्गानेच व्हायला हवा? त्यासाठी निरपराध लोकांना 'टार्गेट' करण्याचे काय कारण? मुंबईमधल्या पोलिसांच्या गाडय़ा जाळण्याचे कारण काय? टीव्ही चॅनेलवाल्यांच्या गाडय़ा पेटविणारे कोण होते? पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत ज्यांची हिंमत झाली ते लोक कोण होते? महिला पोलिसांचा विनयभंग करणारे हात कुणाचे होते? आणि विशेष म्हणजे टीव्ही कॅ मेर्‍यामध्ये स्पष्ट चेहरे दिसत असताना, वृत्तपत्रांत छापून आले असताना त्यांच्यावर सरकार कारवाई का करीत नाही?

शेतकरी हा गुंडगिरी करीत नाही. शेतकरी लाचारच आहे. स्वत:च्या हक्कासाठी सरकारकडे जातानाही अगदी भिकार्‍यासारखीच त्याची अवस्था असते. कधी कधी भिकारीसुद्धा भीक न देणार्‍याकडे तुच्छतेने पाहतात. पण शेतकरी तेही करू शकत नाही. 'जय जवान जय किसान' असा नारा लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता. त्या शेतकर्‍यांची या भारतात काय अवस्था आहे?

जहाँ न जाने किसान कितने

हर दिन भुखे सोते है

भुखे पेट हाथों में हल और

नैन में आसू होते है

यही वह पावन धरती जहाँपर

भुखा भुखसे मरा है..

पर इसकी ना कदर जिसे

वह भारत देश हमारा है।

असा हा शेतकरी स्वत:चे हक्क मागायला जातो तेव्हा त्याच्यावर गोळ्य़ा चालविल्या जातात. सरकारही मर्दपणा दाखविते. गृहमंत्रीही गोळीबार करण्याचे आदेश देऊन मोकळे होतात. पोलिसांनाही आपल्या बंदुकांचा उपयोग करण्यासाठी निमित्त मिळाल्याचे समाधान होते. तेही वरील आदेशाची वाट न पाहता बंदुका चालवितात. नंतर सरकारही अधिकार्‍यांना पाठीशी घालतात.

मग हेच मर्द सरकार यावेळी गप्प का? मुंबईमध्ये सरळसरळ महिला पोलिसांचा विनयभंग होत असताना यांच्या गोळ्य़ा कुणाकडे गहाण पडल्या होत्या? एवढी जाळपोळ होत असताना पोलीस काय करीत होते? मुख्यमंत्री झोपले होते काय? गृहमंर्त्याला कसली गुंगी चढली होती?

आसाम जळत असतानाही आमच्या देशाचे महामर्द पंतप्रधान किती शांत आहेत? परम पूजनीय सोनिया गांधी कशाच्या चौकशा करायचे आदेश देत आहेत पोलिसांना?

आपले मुख्यमंत्रीही कुणाला पाठीशी घालत आहेत मुंबईच्या बाबतीत?

आहे कशी म्हणावी देशात लोकशाही

खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले छुपे शिपाई

निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्य़ा

अन् गुंडापुढे सलामी देतात राजशाही!

काय होईल देशाचं, माहीत नाही. अतिरेकी मोकाट. गुंड मोकाट. दंगेखोर मोकाट. सामान्य माणसावर मात्र यांची दादागिरी. सारे कायदे निरपराध लोकांसाठी. तुमचा जात-पात-धर्म पाहून यांच्या बंदुका चालणार!

मागे इंदिरा गांधींच्या काळात आसाम असाच पेटला होता. पंजाबही हातातून गेला असेच वाटत होते. पण इंदिराजींनी मर्दपणा दाखविला. आसामही वाचला. पंजाबही वाचला. बांगलादेशाचीही निर्मिती इंदिरा गांधी यांनी केली. पण आजच्या नेत्यांना स्वार्थाशिवाय काहीच दिसत नाही.

माकडांच्या हाती, कोलीत दिधले

माकड बैसले, गादीवर!

आता धोक्यामध्ये आला गाव सारा

एकही देव्हारा, मुक्त नाही!

एक एक घर, वाढताहे आग

फौज मागोमाग, माकडांची?

वस्तीमध्ये मर्द, असल्यास कोणी

मशाल घेऊनी पुढे यावे!

आता जनतेनंच देशाच्या भवितव्याचा विचार करावा. असल्या दंगेखोरांच्या समोर निर्लज्जपणे लोटांगण घालणार्‍या मंर्त्यांचे खरेतर सत्कारच करायला हवेत! मानवाधिकारवाले महापुरुषही मर्दपणे कुठल्या बिळात घुसून धसले आहेत याचाही शोध घ्यायला हवा! मुंबईतील दंगल ही यांच्या दृष्टीने 'मानवते'च्या पराक्रमाची गाथा आहे की काय?

असल्या ढोंगी लोकांना नको एवढा भाव देणार्‍या मीडियानेही आता त्यांना विचारायला नको का? यांच्या शेपटय़ा धरून त्यांना बाहेर आणायला नको का?

पण विचारून तरी काय फायदा?

सरळ सरळ मीडियात फोटो दिसत आहेत. उघड उघड गुंडगिरी सुरू आहे. संपूर्ण जनमानसात संतापाची लाट असताना आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुणाच्या शेतात काय उपटत बसले आहेत माहीत नाही!

वा! महापुरुषांनो..! खरंच कमाल आहे तुमची!

मंत्रालय दिवसाढवळ्य़ा धोधो जळालं-

तुम्ही अजूनही काय निवडत आहात माहीत नाही?

आदर्श घोटाळ्य़ातल्या फाईल्स गायब झाल्यात- सहजपणे एखाद्याचं पाकीट मारावं तशी महत्त्वाची कागदपत्रं मंत्रालयातून मारलीत-

तरी तुमच्यावर परिणाम नाही.

फाईल्स मारू द्या.. कागदपत्रं मारू द्या.. काय वाट्टेल ते मारू द्या.. पण..

तुमच्या तोंडातून हूं की चूं निघणार नाही?

वा! केवढी तुमची सहनशीलता!

वा! मर्दांनो.. वारे वा!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment