Wednesday 8 August 2012

संवाद : एक साधणे



'याप्रसंगी उभयदेशांनी अंतर्गत संवाद वाढविण्यावर भर दिला पाहिजे असे संयुक्त निवेदनात म्हटले.' असं आपण अनेकदा वृत्तपत्रातून वाचतो किंवा रेडिओच्या बातम्यांमध्ये ऐकतो. (टीव्हीवर हल्ली साध्या बातम्यांऐवजी बातम्यांचे एपिसोड्स दाखवीत असल्यामुळे त्याचा उल्लेख टाळला आहे.) वरील वक्तव्य 'भारत-पाक'संदर्भात असलं की, एक मुजोरी करणारा अन् दुसरा कायम समजूतदारीने बोलणारा यांच्यातल्या कुरघोडीला संवाद म्हणतात का, असं आपल्या मनात येतं. हेच वाक्य अमेरिकेसंदर्भात असलं की, एक दादागिरी करणारा अन् दुसरा शेपूट घालणारा यांच्यातल्या शिवाशिवीला (वर्‍हाडीत शितनापानी) संवाद म्हणतात का, हा प्रश्न उपस्थित होईल. हाच संवाद- संवाद म्हणतात तो इजराएल अन् पॅलेस्टाइन यांच्यादरम्यान होतो तेव्हा एकमेकांच्या जीवावर उठलेल्यांनी थोडासा दम घेण्यासाठी केलेल्या 'टाईम प्लिज'ला संवाद म्हणता येईल का अशी शंका मनाला वाटून जाते. मध्यंतरी श्रीलंका सरकार अन् लिट्टे यांच्यामध्ये नार्वे सरकारच्या मध्यस्थीने संवाद सुरू होता. कालांतराने लिट्टेचा खात्मा झाला अन् संवाद (?) संपला.

तसं परंपरेनुसार नवरा-बायकोमधल्या लाथाळ्य़ांनाही संवाद म्हणायची पद्धत आहे व हा संवाद (?) साधारणत: पुढीलप्रमाणे होतो..

''अहो, तुमच्यासाठी आज भरीतच करू नं? आवडतं ना तुम्हाला?''

''मी काय म्हणते लग्नात तुम्ही हा गुलाबी शर्टच घालून जाल नं?''

''या उन्हाळ्य़ाच्या सुट्टीत मी पोरांच्या परीक्षा झाल्या की जाते अन् लगेच मेच्या शेवटीशेवटी परत येते, हो नं?''

''तुम्ही आज पाणी भरताय नं? की मी भरून ठेवू? मग म्हणाल कशाला भरलं?''

अधूनमधून जनतेचे सेवक (?) म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकप्रतिनिधींनाही जनतेशी संवाद साधण्याचा झटका येतो. ''त्यांनी जनतेत शिरून जनतेशी संवाद साधला.'' अशा बातम्याही येतात. 'संवाद' साधला म्हणजे नेमकं काय केलं याचं उत्तर ना करणार्‍याला देता ये, ना ज्यांच्याशी संवाद साधला त्यांना देता ये. पण 'संवाद' या शब्दाने धारण केली आहेत. आज हा संवाद आठवण्याचं मुख्य कारण म्हणजे मला आठवलेला 'माझी मराठी आजी अन् एका मुसलमान आजीत होणारा संवाद.' माझी आजी, (आम्ही तिला 'माय' म्हणायचो) मधूनमधून आमच्याकडे यायची तेव्हा वडील गांधीग्रामला डॉक्टर होते. विरंगुळा म्हणून माय दुपारी मोठेकाळी जायची. तिथे तिची ती मुसलमान मैत्रीण भेटायची अन् त्यांच्यात संवाद होई..

हो या बाई खाना?

हो नावं बाई लावला एकदाचा पायना. आमच्या डाक्टरले भल्ला षौक आहे पायन्याचा. जिथं बदली होते तिथं काटरसमोर ठुन्या गाडून मायना बांधते. येल लावून त्याच्यावर येलाचा मंडप करते. लय वठ्ठम आहे त्याले. तुले काहून इतका उशीर झाला? शीर खुरमा? अब्बी थोडी रह्यता वं, वो तो रमजान मह्यने में रह्यता, अबी ईद कू टाईम हयना!

काय पायना-पायना घिवून बसली वं, लयच तुयं मन अशीन तं ये एखांद्या रोजी बसाले..

नई वं बई मय नही पिसती मसाले! अब उमर हो गई ना, मेरी बहूच करती सब, अब मेरे कहाँ हाथपैर चलते? खेलते? उधम करतेत उधम! डाक्टरचे लेकरं, त्याईचे दोस्त, कम्पाऊंडरचे लेकर ईभ्भर उधम करतेत पायन्यावर! अशा प्रकारे वाक्याचं शेंडा-बुडूख धरून त्याचा संवाद चाले. हे ऐकल्यानंतर मला जाणवलं की, माणसाला संवादासाठी ना भाषेची गरज लागते, ना विषयांची ना शब्दांची; गरज असते ती संवाद साधण्याच्या असोशीची, एकमेकांचे सुखदु:ख जाणून घेण्याच्या कळकळीची अन् मग कठीण प्रसंगी मित्राने पाठीवर ठेवलेला हात काही न बोलता खूपकाही बोलून जातो तर कधी एक नजर तुमच्या प्रियतमेला काही न सांगता खूपकाही सांगून जाते आणि या सगळ्य़ांसाठी ना संयुक्त निवेदनाची गरज भासते ना तिसर्‍या पक्षाची!

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत.

'गंमत जंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650
     

     << Back to Headlines          Next >>

No comments:

Post a Comment