Monday 20 August 2012

बाईचा नखरा

                                    ''दार उघड''
                                  ''कोन आहे?''
''मी आहो''

''मी कोन?''

''घरच्या मानसाचा आवाज वयखू येत नाही काय तुले?''

''थांबा पाच मिनिट.''

''अव पन तू दरवाजा लाऊन घरात काय करून राह्यली? उघड दरवाजा..''

''एवढय़ा मोठय़ानं दार ठोकू नका.''

''मंग दार उघड लवकर.''

''उघडलं दार.. काय म्हनता?''

''काय करून राह्यली अंदर एकटी?''

''हे दिसत नाही काय तुमाले?''

''हे काय लावलं तोंडाले भुतासारखं?''

''मुलतानी माती लावली.''

''तोंड धुई पटकन.. मले तुहा भेव लागून राह्यलं.''

''थांबा जराभर.. तोंड सोकू द्या.''

''आपल्याले वाढदिवसाले जा लागते...उशीर होते. म्या गाडीत पेट्रोल भरून आनलं.. अध्र्या घंटय़ापासून तयार झालो पन तुहा नखराच सुरू आहे मघापासून.''

''किती वाजता आहे वाढदिवस?''

''सहा वाजता. आता साडेसहा झाले.''

''वाढदिवस वक्तावर होते काय? जेवाच्या टाइमले गेलं म्हनजे झालं.''

''तुव्ह हे नेहमीचंच आहे... कुठं जायाचं असलं, की तुले चार घंटय़ाच्या आगुदर सांगा लागते.. तवा कुठं वक्तावर तयारी होते.. आटप लवकर..''

''तोंडाचं सोकू द्या.''

''राहू दे तसंच.. रस्त्यानं सोकते.''

''तुम्ही त काही बोलता.. तोंडाले माती लाऊन कोनी जात असते काय?''

''फॅशन हाय म्हना!''

''सोंग दिसते हे!''

''विशेष दिसते. तिथं गेल्यावर सारे लोकं तुलेच पाह्यतीन.''

''हासा करता काय? पोट्टे भेतीन मले!''

''धुई लवकर.. कधीही पाहावं त हेच गर्‍हानं असते. लगAाने चाल म्हटलं की, तिकडे लगन लागते, पंगत बसते; तरी तुहा नखरा सुरूच असते. बजारात जायाले मेकप करते.. चक्कीवर पावडर लाऊन जाते.. वारे वा बाई!''

''कल्ला नका करू.. धुतलं तोंड''

''मंग आटप लवकर''

''साडी नेसू की ड्रेस घालू?''

''ड्रेस कायले? जाडय़ा बाइले ड्रेस शोभते काय?''

''जाडय़ा बाया ड्रेस घालत नाहीत काय?''

''जाडी बाई ड्रेसवर अबूगबू दिसते.''

''मग साडी कोनती नेसू? हिरवी की गुलाबी?''

''एकावर एकदोन साडय़ा नेस.''

''एक सांगा कोनती नेसू?''

''कोनतीही नेस पन लवकर नेस.''

''या साडीवरचा मॅचिंग पेटीकोट पाहा आलमारीत.''

''तूच पाह्य''

''मले दिसला नाई म्हनून तुमाले सांगून राह्यली!''

''सारं मॅचिंगच पाह्यजे काय? दुसरा चालत नाही काय? एवढं बारीक कोन पाह्यते तुले?''

''पाहा लवकर.. पेटीकोट सापडल्याशिवाय गाडी पुढे सरकत नाही.''

''हा सापडला!''

''येनी घालू की केसं मोकये सोडू?''

''तशीच चाल झिपरी!''

''काताऊ नका.. बाईच्या जातीले टाइम लागतच असते.''

''अवं पन तुले सकाळपासून सांगून ठेवलं होतं, की संध्याकाळी सहा वाजता आपल्याले वाढदिवसाले जा लागते. काय केलं दिवसभर?''

''तुम्हीच त उशिरा आले आफिसातून!''

''टाइमपास करू नको.पावनेसात वाजले.''

''थांबा मेकप राह्यलं.''

''आता मेकपले किती घंटे लागतात? तिकडे त्या पोराचा वाढदिवस होईन.. तो पोरगा झोपून राहीन.. तो झोपल्यावर जाशीन काय?''

''कोनती क्रीम लाऊ?''

''लाव लवकर.. नाहीतर सोबत घेऊन चाल.. तिथं गेल्यावर लावजो.''

''तुमाले भलकशी घाई असते कोन्या गोष्टीची.. तिथं सार्‍या बाया मेकप करून येतीन अन् मी खरकटय़ा तोंडाची जाऊ काय?''

''हारला मानूस तुले.. आता काय पाहून राह्यली आलमारीत?''

''या साडीवरची मॅचिंग टिकली पाहून राह्यली!''

''लाल टिकली चालत नाही काय?''

'नाही.. मॅचिंगच पाह्यजे.''

''अवं त्या धामधुमीत कोन पाह्यते तुव्ह मॅचिंग?''

''तुम्ही जराशीक पावडर लावा तोंडाले.. असेच जाता काय खापर्‍या तोंडाचे?''

''मले काही गरज नाही.''

''नाकात नथ घालू काय?''

''नथ कायले पाह्यजे? नथीचा वाढदिवस आहे काय?''

''उलट नथ घातल्यावर नाक मोठं दिसते.''

''गजरा आनला काय?''

''नाही''

''तुमाले मघाच म्हटलं होतं, की गजरा आनजा.. जा लवकर.''

''राहू दे आता.. रस्त्यानं घेऊ.. मी म्हनतो, एवढा नखराच कायले करा लागते? बाईले बुद्धी पाह्यजे.. शिल्लकचा शिनगार करून काय फायदा?''

''म्हनजे मले बुद्धी नाही काय?''

''बुद्धी असती त एवढा उशीर लागलाच नसता!''

''नेकलेस कोनता घालू?''

''तुव्ह एकएक शेपूट लांबूनच राह्यलं.. निम्मेराती चालशीन काय?''

''झालं ना.. मागचे दारं लाऊन घ्या.''

''ते आगुदरच लाऊन बसलो.. तू आटप लवकर.''

''आजून लय राह्यलं''

''काय राह्यलं?''

''नेलपालीस राह्यलं.. स्प्रे राह्यला.. गजरा..''

''मंग तू असं कर.. तू उद्या ये.. मी चाललो आज.''

''अवं थांबा ना!''

''तू एकटीच थांब.. पुढच्या वाढदिवसापर्यंत नखराच करत राह्य..''

''झालं ना.. लावा कुलूप.. झाली मी रेडी!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9561226572

No comments:

Post a Comment