Friday 3 August 2012

गांधी,जेपी आणि अण्णा

म.गांधींचा काळ आम्ही पाहिला नाही. आमच्या जन्मा आधीच त्यांचे निधन झाले होते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या प्रभातफेरीत लहानपणापासून महात्मा गांधी की जय म्हणत आलो. सामाजिक कामात पडल्यापासून गांधींचे अध्ययन सुरू केले. जसजसे वाचत गेलो, ऐकत गेलो, तसतसा हा माणूस भिडत गेला, मुरत गेला. अजूनही काही वाचले की नवे आकलन होत जाते. जयप्रकाश नारायण यांचा उत्तरकाळ मात्र पाहिला, अनुभवला. 1942 च्या चलेजाव आंदोलनातील हिरो म्हणून पहिल्यांदा जयप्रकाश नारायण यांचे नाव कानावर आले. त्यानंतर ते भूदान आंदोलनात समर्पित झाल्याचे कळले.

मला विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनाचे कधीच आकर्षण वाटले नाही. जे.पीं.नी त्यासाठी जीवदान दिले असे कळल्यावर त्यांच्याबद्दलचे आकर्षण काहीसे कमी झाले होते. चंबळच्या खोर्‍यातील दस्यूंचे समर्पण घडले तेव्हा या माणसाबद्दल पुन्हा आकर्षण वाटू लागले. पुस्तकात वाचावी अशी ती नाटय़पूर्ण घटना वाटली. जे.पीं.चा उत्तरकाळ मात्र पाहता आला. ऐंशीच्या दशकात आम्ही विद्यार्थी होतो. या काळात देशात विद्यार्थ्यांची तीन मोठी आंदोलने झाली. सर्वात आधी गुजरातच्या विद्यार्थ्यांनी मेसच्या जेवणाचे दर वाढविले म्हणून आंदोलन सुरू केले. ते वाढत जाऊन महागाई, बेकारी आणि भ्रष्टाचार या प्रश्नांपर्यंत पोहोचले. या आंदोलनामुळे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला. तिकडे ते आंदोलन सुरू असतानाच मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांनी उठाव केला. वसमतला नोकरीच्या मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांवर गोळीबार झाला. त्यात दोघे दगावले. परभणीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला. बघता बघता मराठवाडाभर हा वणवा पसरला. पहिले तेरा दिवस कोणतीही समिती नव्हती. तरुणांचा आक्रोश महागाई, बेकारी, भ्रष्टाचार या मुद्यांवरच होता. नंतर समिती झाली. विकास आंदोलनाच्या नेत्यांनी हे आंदोलन हायजॅक केले. मराठवाडा विकासाच्या काही मागण्या पदरात पडल्या व हे आंदोलनही विरले. त्याच्या आगेमागे बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते. त्यावर तेथील गफूर सरकारने गोळीबार केल्यानंतर विद्यार्थी जयप्रकाश नारायण यांच्याकडे गेले. जे.पी. त्यावेळी बिहारमधील मुसहरी या नक्षलग्रस्त जिल्ह्यात रचनात्मक काम करीत होते. जे.पीं.नी या विद्यार्थ्यांना काही अटी टाकल्या व आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले. जे.पीं.चा स्पर्श झाल्यामुळे काही मागण्यांच्या या आंदोलनाचे रूपांतर जनतेच्या चळवळीत झाले. संपूर्ण क्रांती या शब्दाने त्यांनी व्यवस्था परिवर्तनाचा संदेश दिला. पुढे हे आंदोलन देशाच्या विविध भागांत पसरले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. जे.पीं.च्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. निवडणुका झाल्या. त्यात पहिल्यांदा काँग्रेस विरोधकांचे सरकार केंद्रात आले. जे.पी. वयस्क झालेले. त्यात त्यांच्या किडनींवर परिणाम. जनता पक्षाकडून घोर निराशा झालेली. अण्णा हजारे यांची तुलना महात्मा गांधींशी व त्यांच्या आंदोलनाची तुलना 1974-75 च्या आंदोलनाशी केली जाते. ही तुलना अवास्तव आणि अनावश्यक आहे. अनावश्यक यासाठी की जो तो नेता त्या त्या परिस्थितीत जन्माला येत असतो. गांधी, जे.पीं.च्या काळातील परिस्थिती आज राहिलेली नाही. म्हणून त्यांची एकमेकांशी तुलना करणे अनावश्यक आहे. ती अवास्तव कशी हे मात्र समजून घेतले पाहिजे. म. गांधी आणि जयप्रकाश यांना जगातील अनेक देशांचा अनुभव होता. गांधी ब्रिटनमध्ये शिकले. आफ्रिकेत कामासाठी गेले. तेथे त्यांनी अनेक आंदोलने केली. जे.पी. अमेरिकेत शिकले. त्यांचाही जगभरातील नेत्यांशी संपर्क होता. असा जागतिक अनुभव अण्णांकडे नाही. गांधी आणि जयप्रकाश यांना समाजाचे आकलन होते. त्यांना विचारांची दृष्टी होती. गांधीजींकडे तर जीवनविषयक तत्त्वज्ञान होते. जे.पीं.कडे समाज परिवर्तनाचे आडाखे होते. अण्णांकडे असे काही असल्याचे दिसत नाही. अण्णा हे सिस्टेमॅटिक ट्रिटमेंट करणारे डॉक्टर आहेत. उदाहरणार्थ एखाद्या माणसाच्या पायाला फोड आले. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी फोड पाहिले की लगेच त्यावर मलम लावून पट्टी बांधली. निष्णात डॉक्टर पायावरचे फोड पाहतो. मलम लावून पट्टी बांधतोच, परंतु त्याचबरोबर रक्तही तपासतो. रक्त शुद्धीचेही औषध देतो. म. गांधी आणि जे.पी.त्या निष्णात डॉक्टरसारखी उपाययोजना करणारे होते. अण्णा मात्र दुखणे पाहून औषध देताना दिसतात. सरकारी नोकर माहिती लपवितात. चला माहितीचा अधिकार द्या. भ्रष्टाचार वाढतो आहे. घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत. चला लोकपाल बिल मंजूर करा. भ्रष्टाचार का होतो? घोटाळे का होतात? याचा कारणांचा काही शोध घेतला का? ती कारणे तशीच ठेवून जर केवळ मलमपट्टी केली तर त्याचीही गत माहितीच्या अधिकारासारखी होऊन जाते. आज त्या कायद्याचा वापर कमी व गैरवापर जास्त होताना दिसतो. गावोगावी चोरावर मोर निर्माण झालेले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करतो म्हणून भिडवून पैसे उकळले जातात. या चोरांवरच्या मोरांची भीती गैरव्यवहार करणार्‍या भ्रष्टांना अजिबात वाटत नाही. ते तुकडा टाकून त्यांची तोंडे बंद करतात. भीती वाटते चांगल्या कर्मचार्‍यांना. आपण काही केले नाही तरी ससेमिरा लागू शकतो, ही दहशत कायम असते. माहितीच्या अधिकारासोबत ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या न केल्यामुळे एक चांगला कायदा वाईटांच्या हातातील कोलीत बनला आहे.आपल्या समाजातील अनेक रोगांच्या मुळाशी सरकारीकरण हे एक प्रमुख कारण आहे. पण सरकारचा काळा पदर दूर सारण्याची कोणाची हिंमत नाही. पुष्कळदा इच्छा नाही. सरकारीकरण कायम ठेवून आपण भष्टाचार निर्मूलनाची इच्छा धरणे हे दिवास्वप्न पाहण्यासारखे आहे, हे ना अण्णांच्या गावी आहे, ना त्यांच्या समर्थकांच्या. गांधी व जे.पी. प्रश्नाच्या तळाशी जाऊन उपाययोजना सुचवायचे. अण्णा आणि गांधी-जे.पीं.मधला हा मूलभूत फरक आहे. कायद्याचे जंजाळ आणि जटिल प्रशासकीय पद्धत ही भ्रष्टाचाराची मूळ कारणे मानली जातात. कायदे कमी करा व प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करा असे म्हणणे तर्कसंगत ठरते. नोकरशाही वाढली तर भ्रष्टाचार वाढतो असाच आजवरचा आपला अनुभव आहे. लोकपालाची नवी नोकरशाही नेमल्याने भ्रष्टाचार कमी कसा होईल? गांधी आणि जे.पी. यांच्या विचार व कार्यपद्धतीत सरकारी हस्तक्षेप कमी असावा असा आग्रह असायचा. अण्णा मात्र नवी नोकरशाही, नवे कायदे मागून सरकारी हस्तक्षेप वाढवून मागतात. त्यामुळे गांधी-जे.पी. यांची अण्णांशी तुलना अवास्तव ठरते.

(लेखक हे नामवंत विचारवंत व

सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी-9422931986

No comments:

Post a Comment