Friday 31 August 2012

'अरे भाई, इतना सन्नाटा क्यू हैं?'


नुकतेच ए. के. हंगल या सिनेनटाचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी काम केलेल्या सिनेमांची, त्यातील संवादांची आवर्जून चर्चा झाली. 'इतना सन्नाटा क्यू हैं, भाई' हा त्यांचा गाजलेला संवाद 'शोले' सिनेमातील. त्यामुळे अपरिहार्यपणे 'शोले' सिनेमाचीही चर्चा झाली. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी शोले सिनेमा त्यातील संवादासह तुफान गाजला. त्यातील 'जय-वीरू'ची जोडी, सतत बडबड करणारी टांगेवाली बसंती, ठाकूर, ठाकूरच्या घरातील विधवा जया भादुरी, गब्बर सिंग, ए. के. हंगलचा रहिमचाचा. सर्वच आजही सिनेरसिकांच्या जसेच्या तसे स्मरणात आहे. त्यातील संवाद तर त्यावेळेस गल्लीबोळातून, लहानमोठय़ांच्या तोंडपाठ असायचे. ते लोकांच्या तोंडून ऐकू यायचे. वीरूने 'बसंती तुम्हारा नाम क्या है?सारखा विचारलेला प्रश्न असो किंवा ठाकूरने गब्बरसिंगच्या मानेभोवती विळखा टाकून म्हटलेला, 'ये हाथ नहीं गब्बर, फाशी का फंदा है'सारखा संवाद असो किंवा बाजी पलटता गब्बरने ठाकूरला 'ये हाथ मुझे दे दे ठाकूर' म्हणत ठाकूरचे दोन्ही हाथ छाटल्याचा प्रसंग असो. आजही तीनचार दशक उलटून गेल्यानंतरही जसाच्या तसा प्रेक्षकांना आठवतो. त्यातही, 'अरे! ओùù सांबा, कितने आदमी थे'सारखा संवाद गल्लीबोळातून कानावर पडत नाही तोच प्रत्युत्तरादाखल, 'सरदार मैने आपका नमक खाया है,' असा संवाद कानी यायचा तातडीने लगेचच. 'अब गोली खा,' असा गब्बरचा सिनेमातील संवाद कानावर आदळायचा.

'अब गोली खा' म्हणणारा गब्बरसिंग व त्याची टोळी बंदुकीच्या 'गोळ्य़ा' खाऊन तर जगत नसतील. त्यांनासुद्धा जगण्यासाठी अन्नच खावे लागत असणार. गब्बरसिंगच्या टोळीने कितीही तिजोर्‍या फोडल्या. रुपये, पैसे, सोनेनाणे, चांदीचे दागिने साठवले असतील तरीही 'गोळ्य़ा' खाऊन जसा गब्बरसिंग व त्याची टोळी जगू शकत नव्हती तसेच रुपये, पैसे, सोने, चांदीसुद्धा खाऊन जगू शकणार नव्हती. आज कितीही विकास झाला असला तरी खायला 'अन्नच' लागते. तसेच ते 'अन्न' गब्बरसिंग व त्याच्या टोळीला लागत असणार. आता गब्बरसिंग त्याच्या टोळीसह दरोडे टाकेल की पोट भरण्यासाठी 'अन्न' पिकवेल? संपूर्ण 'शोले' सिनेमात गब्बरसिंग त्याच्या दरोडेखोर साथीदारांसह शेती पिकविताना दिसत नाही. तरीदेखील तो व त्याचे साथीदार जिवंत दिसतात. अन्नधान्यावाचून उपाशी मरताना दिसत नाही. याचाच अर्थ शेती न करताही त्याला व त्याच्या साथीदारांना नियमितपणे अन्नधान्य मिळत असले पाहिजे. हे अन्न त्यांना कसे मिळत असेल? 'शोले' सिनेमातीलच एका प्रसंगातून त्याचा खुलासा होतो.

खळ्य़ावरून अन्नधान्य शेतकर्‍यांच्या घरी येते. तेव्हा गब्बरसिंगची तीन माणसं शेतकर्‍यांच्या दारात घोडय़ावर बसून खांद्याला बंदुका टांगून उभी होतात. शेतकरी त्यांच्या घरातील अन्नधान्य त्यांच्या पुढय़ात टाकतात. त्यातील एक हाडाचा सापळा झालेला शेतकरी कंबरेत वाकून पाठीवर अन्नधान्याचं अर्धच पोतं गब्बरसिंगच्या माणसाच्या समोर टाकतो. तर गब्बरसिंगची माणसं म्हणतात, 'मुठ्ठीभर अनाज? बाकी अनाज क्या अपने बेटी के शादी में बारातीयोंको खिलाने के लिये रख्खा है?'

तेवढय़ात ठाकूर गरजतो, 'गब्बरसिंगसे कह दो कि, अब रामगढवासीयोंने पागल कुत्ताेके सामने रोटी डालना बंद किया है.' वगैरे वगैरे.

प्रसंगातील तात्पर्य असे की, शेतकर्‍यांच्या घरात असलेले धान्य कोणताही मोबदला न देता गब्बरसिंगची माणसं लुटून नेतात. एरवी तेच धान्य शेतकर्‍यांच्या घरात राहिलं असतं किंवा योग्य त्या भावात त्याला ते विकता आलं असतं. तर त्यांची ती वर्षभराची 'बेगमी' झाली असती. अर्थशास्त्रीय भाषेत याच बेगमीला 'बचत' म्हटले गेले असते. ही 'बचत' गब्बरसिंगची माणसं वर्षानुवर्षे लुटून नेत असतात. आता वर्षभराची 'बेगमी' किं वा 'बचत' लुटल्या गेली. वर्षभर जगायचे तर आहे. पण बचत लुटल्या गेली. मुलीचे लग्न करायचे आहे. मुलीच्या लग्नासाठी वेगळे काढून ठेवलेले अन्नधान्य, लग्नासाठी करून ठेवलेली 'बेगमी' अर्थशास्त्रीय भाषेत 'बचत' गब्बरसिंग घेऊन गेला. त्याला आता मुलीचे लग्न करायचे असेल तर एकतर सावकाराकडे 'कर्ज' तरी काढावे लागेल किंवा जमिनीचा तुकडा विकून मुलीच्या लग्नाची 'बेगमी' करावी लागेल.

शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचं खरं कारण वर्षानुवर्षे त्याच्याकडे तयार होणारी 'बचत' कोणी ना कोणी लुटतो आहे. काळ बदलला तशी लुटीची पद्धत बदलली. पण शेतकर्‍यांची 'लूट' या नाही त्या रूपात सुरूच राहिली. 'शोले' सिनेमातील गब्बरसिंग दरोडेखोराचं उदाहरण बरचसं 'फिल्मी' व तेवढेच बटबटीत असेलही, पण शेतकर्‍यांची 'बचत' कशी लुटल्या गेली हे समजायला उपयोगी ठरते.

खळ्य़ातून शेतकर्‍यांच्या घरी धान्य येताच आता गब्बरसिंगच्या माणसांना शेतकर्‍यांच्या दारी जाण्याचे कामच उरले नाही. ते आता फक्त एवढंच करतात. शेतकर्‍यांचा माल घरी येताच ते अन्नधान्याचे 'भाव' पाडतात आणि त्याची बेगमी व बचत लुटून नेतात. ही लूट फक्त दिसत नाही एवढेच.

बैलाने शेती करण्यापेक्षा घोडय़ावर बसून, खांद्यावर बंदूक लटकून शेती करणे फायद्याचे होऊ लागले. नांगराने शेती करण्यापेक्षा तलवारीने शेती करणे किफायतशीर होऊ लागले. करायचं काहीच नाही. तयार शेतीमाल तलवारीच्या बळावर लुटून न्यायचा. बस्स एवढंच. कोणी तलवारीने लुटले, कोणी दीडदांडीच्या तराजूने लुटले. कोणी 'व्याजाच्या' हत्याराने लुटले. कोणी मध्यस्थ, दलाल होऊन लुटले. कोणी 'धर्मग्रंथ' दाखवून लुटले. शेतीत पाऊस पडतो म्हणून शेती पिकते. पाऊस का पडतो तर आम्ही 'यज्ञ' करतो म्हणून पडतो. तेव्हा दे 'दक्षिणा' म्हणत कोणी लुटले. ग्राहकांचे कसे होणार? अन्नधान्याचे भाव वाढले तर गोरगरिबांचे कसे होणार म्हणत अन्नधान्याचे भाव पाडत किंवा स्थिर ठेवत शेतकर्‍यांना लुटले. तर कधी, 'कांद्याने आणले डोळ्य़ात पाणी' असा आरडाओरडा करीत लुटले. आता शेतकर्‍यांची बचत लुटायला गब्बरसिंग किंवा त्यांच्या माणसांना घोडय़ावर बसून यावे लागत नाही. गब्बरसिंग आता चंबळच्या घाटीतही राहत नाही. तो आता दिल्ली, मुंबईत राहतो. त्याला आता कोणी दरोडेखोरही म्हणत नाही. म्हणायचे झाल्यास त्याला 'सत्ताधारी' म्हणतात. प्रत्यक्ष घोडय़ावर बसण्याऐवजी खांद्यावर बंदूक लटकवून फिरण्याऐवजी केवळ सत्तेत बसून 'कागदी घोडे' नाचवत, शेतकरीविरोधी धोरण राबवीत तो शेतकर्‍यांची बचत सहज लुटू शकतो. दुष्काळ असेल तर शेतकर्‍यांवर सक्तीची 'लेव्ही' लावा. अन्नधान्याचे भाव वाढताच परदेशातून का होईना महाग अन्नधान्याची आयात करून भाव पाडा. अन्नधान्याला निर्यातबंदी करा. आयात खुली करा, असे अनेक हातखंडे आता गब्बरसिंग वापरू शकतो.

कारखान्यात एक किलो लोखंड टाकलं तर त्याचे दोन किलो काय साधे एक किलो एक ग्रॅमदेखील होत नाही. कारखान्यात वस्तूचं फक्त रूप बदलतं. लोखंडाचे खिळे, टाचण्या, दाभन, नटबोल्ट होतील. पण त्याचे वजन एका किलोपेक्षा वाढणार नाही. उलट ते कमी होईल. कारखान्यात केवळ वस्तूचं रूप बदलतं. 'रूपांतरण' होतं तरीही तेथे बदाबदा पैसा आहे. 'भांडवल' आहे. व्यापारात तर या हाताने वस्तू घ्यायची व त्या हातात सोपवायची. फक्त एवढंच करायचं आहे. व्यापारात वस्तूचं केवळ 'हस्तांतरण' होतं. तरीदेखील तेथेही श्रीमंती आहे. भरभराट आहे. तेथेही बदाबदा भांडवलचं भांडवल आहे. पण शेतीत एका दाण्याचे हजार दाणे होतात. चिमूटभर दाण्याचे मणभर होतात. एका किलोचे क्विंटलभर दाणे होतात. पसाभर दाण्याचे टनभर दाणे होतात. शेतीतच फक्त गुणाकार होतो. तो कारखान्यात होत नाही. व्यापारात तर नाहीच नाही. झालेच तर 'रूपांतरण' व हस्तांतरण होते. पण शेतीत गुणाकार होतो आणि जेथे गुणाकार होतो तेथेच भांडवल निर्मिती होते. त्याच शेतीत भांडवलाचा अभाव का? जेथे निर्मिती होते तेथेच तुटवडा का? जेथे संपत्ती तयार होते तेथेच विपन्नता का? जेथे धान्याच्या राशी उभ्या राहतात तेथेच शेतकर्‍यांच्या उरावर कर्जाचे डोंगर का? असे प्रश्न विद्वानांना कधी पडले नसतील? जिथे गुणाकार होतो तेथेच भांडवलाचा अभाव हा चमत्कार कसा व कोण करीत असेल, असे प्रश्न बुवाबाजीचा भंडाफोड करणार्‍यांना, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नेत्यांना कधी पडला नाही. पण का? का?? आणि का???

कारण ही सर्व मंडळी शेतकर्‍यांची बचत लुटून नेणार्‍या दरोडेखोर गब्बरसिंगनीतीचे 'लाभार्थी' राहिलेले आहेत. या देशातील विद्वान, विचारवंत, पर्यावरणवादी, अर्थतज्ज्ञ, समाजकारणी, राजकारणी हे शेतकरीविरोधी धोरणाचे लाभार्थी होते. म्हणून कधी या विषयावर बोलले नाही. तुकडोजी महाराजांसारख्या राष्ट्रसंताला जे कळले,

'कच्च माल मातीच्याच भावे

तो पक्का होता चौपटीने घ्यावे

मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे

पिकवोनही उपाशी'

स्वातंर्त्याच्या सेनापतीला, महात्मा गांधींनाही हे कळले होते. म्हणून ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी शोषणाच्या विरोधात 'चले जाव' म्हणत मँचेस्टरच्या कापडांच्या कारखान्यांना शह देण्यासाठी स्वातंर्त्याच्या लढाईचे 'चरखा' हे प्रतीक निवडले होते.

विचार येतो समजा 'शोले' नवीन पद्धतीने काढायचा ठरल्यास त्यात गब्बरसिंगला घोडय़ावर बसण्याची गरज नसेल. तो केवळ कागदी घोडे नाचवील. गब्बरसिंगला ए. के. हंगल व सिनेमातील रहिमचाचाच्या मुलाला गोळी घालून मारण्याचीही गरज पडणार नाही. गब्बरसिंगनीतीने तो एवढा त्रस्त होईल की, तो स्वत:च शेतकरी जसे जहर घेऊन आत्महत्या करतात तसाच तो जहर घेऊन आत्महत्या करेल. तेव्हा गब्बरसिंग विचारेल, 'अरे ओ ù ù सांबा, कितने, किसान मरे?' तर आंधळा रहिमचाचा (ए. के. हंगल) मुलाच्या आत्महत्येनंतर पसरलेली स्मशानशांतता अनुभवल्यानंतर व्यथित होऊन गदगदल्या स्वरात विचारेल, 'अरे भाई, इतना सन्नाटा क्यू हैं?' आणि सिनेमाचा 'दी एण्ड' होईल.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

1 comment:

  1. The Most Successful Sites for Crypto, Casino & Poker - Goyang
    Goyang Casino & septcasino.com Poker is one of the gri-go.com most famous poormansguidetocasinogambling.com and well goyangfc known crypto gambling sites, founded in 2012. They 출장샵 are popular because of their great

    ReplyDelete