Thursday 2 August 2012

दारूचे योगदान


दचकलात ना? सदरहू लेख हा सोमरसाविषयी काही संशोधनपर लेखन असावे असा गैरसमज शीर्षक वाचल्यावर होऊ शकतो मात्र तसे काही नाही. आणि सदरहू लेखकही पूर्णपणे शुद्धीवर राहून हा लेख लिहीत आहे याबाबत किमान लेखकाचे तरी दुमत नाही.

प्रिय वाचकहो (असं सातत्याने लिहिलं की लेखक काही दिवसांनी आपोआप वाचकप्रिय होतो असा एक रूढ गैरसमज आहे.) आपली संस्कृती म्हणजे काय तर नातेसंबंध, मोठय़ांचा आदर, दयाभाव, भूतदया इत्यादी, इत्यादी.

आता या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की दारू नामक पेयाने ही संस्कृती रुजविण्यासाठी किती मोठे योगदान दिले आहे ते.

काही वर्षांपूर्वी मी एका संस्थेत नोकरी करत होतो. आम्ही सगळ्या कर्मचार्‍यांनी गणपतीची स्थापना केली. दहा दिवसानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रथेप्रमाणे बहुतांश कर्मचार्‍यांनी एनर्जी ड्रिंक घेतले. अध्र्या-पाऊण तासाने त्यातला एक माझ्यापेक्षा वयाने 15-20 वर्षे वडील असलेला माझा एक सहकारी माझ्याजवळ आला. मला मिठी मारली व माझी पाठ थोपटत मला म्हणाला, 'गजाननराव तुम अपने छोटे भाई, कुछ गलती हुई तो मेरेकू माफ करदो' अन् असं म्हणून तो माझ्या पाया पडला. थोडय़ा-थोडय़ा वेळाने तो माझ्या जवळ यायचा अन् 'गजाननराव तुम अपने छोटे भाई, कुछ गलती हुई तो मेरेकू माफ करदो', अन् माझ्या पाया पडायचा. मलाही गंमत वाटत होती. थोडय़ा वेळाने मावळ्याच्या सोंगाजवळची तलवार घेऊन तो आला अन् आवेशात मला म्हणाला, 'गजाननराव तुम बोलो, तुमको किसने तकलीफ दिया? सालेकू काट डालता, मेरे छोटे भाई के लिए आज मै खुन से नहाऊंगा !' अन् मग आठदहा जणांनाही तो आवरेना. मला सांगा कुठल्याही नॉर्मल माणसाने तुमच्यावर इतकं प्रेम कधी केलं का? ही जी भ्रातृप्रेमाची उकळी फुटली ती पावशेर पोटात गेल्यावरच ना? शुद्धीवर असताना सख्ख्या भावाशीही धड न बोलणारे, विमानाने टेक ऑफ केल्यानंतर कुणाचेही होतात ही किमया कशाची?

माझ्या एका मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. रात्री 10-11 वाजल्यानंतर काही लोकांचे जेवण बाकी असताना कॅटरिंगवाल्या पोरांनी जेवणाची आवरासावर केली. त्या दरम्यान कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टर एनर्जी ड्रिंक घ्यायला गेला होता. त्याला फोन केल्यावर तो आला तो 'ओ.के. टेश्टेड' हूनच आला होता. पोट्टय़ांना शिव्या देऊन त्याने पुन्हा सगळं जेवण लावायला लावलं अन् माझ्या मित्राच्या गळ्यात पडून रडायला लागला, 'भाऊ मेरेसे गलती हो गई, मेरेकू माफ करदेव!' (टिंग झाल्यानंतर सगळे हिंदीत का बोलतात किंवा तसा जी.आर. आहे का हा संशोधनाचा विषय आहे.) असं चार-पाचदा झाल्यावर तो सर्वासमोर म्हणाला, 'तुमारेकू मैं अंदर की बात बोल्ता ये आदमी मेरा ज्यवाई है अन् मै इसका साला हँू !' माझा मित्र चपापला, चार-चौघात आपल्या साळ्याचे दर्शन व्हावे अन् तेही या स्वरूपात अशी त्याची इच्छा, अपेक्षा, कल्पना नव्हती. या प्रसंगानुसार पुन्हा एकदा नातेसंबंध दृढ करण्यासाठीच नव्हे तर नवीन नाते निर्माण करण्यातही दारूचे योगदान स्पष्ट होते. ('दारू की धार अन् प्यार की बहार' असा एक प्रबंध लिहिण्याचेही प्रस्तुत लेखकाच्या मनात आहे.) काही मंडळींच्या बाबतीत तर हा प्रकार इतक्यांदा घडलाय की माझी चूक झाली मला माफ करा असं सहजही कुणी म्हटलं तरी ते त्याच्या तोंडाचा वास घेतात. सिनेमावाल्यांनीही बहुतेकदा खलनायकाला दारू पिताना दाखवून दारूचं अवमूल्यन केलंय. परंतु मद्य प्राशनानंतर फुटणार्‍या बंधुप्रेमाच्या किंवा एकूणच प्रेमाच्या उमाळ्याचं एकही दृष्य न दाखवून या तमाम प्रेमदूतांवर अन्यायच केला नाही का?

नुकतेच एका ह.भ.प. मंत्रिमहोदयांनी आदिवासींमधला भ्रातृभाव बळकट करण्यासाठी मोहाच्या फुलांपासून हर्बल लिकर निर्मितीचा संकल्प सोडला. शहरवासी अन् आदिवासी यांच्यातलं अंतर क्षणात मिटवणारी ही क्रांतिकारी कल्पना मांडणार्‍या माणसाचे खरेतर समाजाच्या सर्व थरातून कौतुक व्हायला हवे. मात्र काही नतद्रष्ट बुद्धिजीवी आदरणीय मंत्रिमहोदयांच्या विरोधात वृत्तपत्रातून पानेच्या पाने खरडत आहेत यापेक्षा दुर्दैव ते कोणते.

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जमंत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

No comments:

Post a Comment