Thursday 2 August 2012

वन्यप्राणी 'प्रेमाचा' हैदोस


2000 साली अपघाताने पत्रकारितेत आलो. त्यावेळेचा प्रसंग आजही आठवतो. ज्या वृत्रपत्तात काम करीत होतो त्या वृत्रपत्राच्या पहिल्या पानावर एका हरणाच्या मृत्यूची हरणाच्या रंगीत छायाचित्रासह हेडलाईन होती. तर त्याच दिवशीच्या पेपरमध्ये कोपर्‍यात कोठेतरी चार ओळीची शेतकर्‍याच्या आत्महत्येची बातमी होती. योगायोगाचा भाग म्हणजे हरणाच्या एका कळपाने त्या शेतकर्‍याच्या पिकाचे अतोनात नुकसान केले. त्या धक्क्यातून तो सावरलाच नाही. आत्यंतिक निराशेपोटी त्याने आत्महत्या केली.

ज्या हरणाच्या कळपाने शेतकर्‍याला आत्महत्या करण्यास भाग पाडले तो आत्महत्येनंतरही वृत्रपत्राच्या कुठल्यातरी कोपर्‍यात चार ओळीतच पेपरने गुंडाळला होता.

तर हरणाच्या मृत्यूला मात्र त्याच्या रंगीत छायाचित्रासह वृत्तपत्राच्या प्रथम पानावर मथळा होता. शेतकर्‍याच्या मृत्यूपेक्षाही हरणाचा मृत्यू मौल्यवान ठरला होता. शेतकरी हा खरं तर नायक ठरायला हवा होता. पण जो वन्यप्राणी शेतकर्‍याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता तोच खलनायक वन्यप्राणी वन्यप्रेमींसाठी 'नायक' ठरला होता. म्हणून तर नायकाच्या मृत्यूला 'मथळा' तर शेतकर्‍याच्या मृत्यूला वृत्तपत्रात 'कोपरा' नशिबी आला होता.

वन्यप्राण्यांविषयीचा हा उमाळा दिवसेंदिवस जोरात फसफसून वाहतो आहे. वन्यप्राणीच नव्हे तर सर्वच प्राण्यांविषयीचे प्रेम सध्या उतू जात आहे. मनेका गांधींचे प्राणी प्रेम तर सर्वश्रुतच आहे. पण अनेक 'विश्वामित्र' प्राणी प्रेमाच्या तप साधनेत मग्न आहेत. झिनत अमान ह्या नटीला नुकतेच घोडे प्रेमाचं भरतं आल्याची बातमी वाचली, तर 'गाढव' प्रेमापोटी करण्यात आलेला 'गाढव कायदा'ही आपल्या वाचनात येतोच.

साधारणत: दोन आठवडय़ांपूर्वी नागपंचमीचा सण होऊन गेला. या दिवशी सापांचे पूजन व स्मरण केल्या जाते. पूर्वी गारुडी टोपलीत नागबाबा घेऊन पुंगी वाजवून आपले पोट भरायचे. पण 1998 मध्ये महाराष्ट्रात गारुडय़ांवर बंदी घालून त्यांच्या पोटावर पाय देत सर्पमित्र नावाचे नवे गारुडी तयार झाले आहेत. सापांची संख्या वाढते आहे किंवा कमी होत आहे हे सर्पमित्रच जाणोत, पण सर्पमित्रांची पिलावळ मात्र गेल्या काही वर्षात बेसुमार वाढते आहे, हे मात्र तेवढेच खरे.

आजकाल नागपंचमीचा दिवस सापांपेक्षा सर्पमित्रांचाच अधिक असतो.

नागपंचमीच्या दिवशी बहुतांश सर्व वृत्रपत्रांमध्ये सर्पमित्रांच्या मुलाखती साप हातात धरून वा गळ्यात टाकून त्यांचे फोटो सर्वत्र झळकतात. प्रामुख्याने त्या मुलाखतीचा सारांश असतो, 'साप हा शेतकर्‍यांचा मित्र आहे.' (शेतकर्‍यांना आपला मित्र व शत्रू ओळखण्याची अक्कल नसल्यामुळे ती शिकविण्याची जबाबदारी 'सर्पमित्रा'वर असते.) उंदीर शेतातील अन्नधान्याची नासाडी करतात. अशा उंदरांना साप खातो व पर्यायाने अन्नधान्याची नासाडी थांबविण्याचे काम साप करतो. (अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये मोठय़ा प्रमाणावर अन्न धान्याची नासाडी होते. ती नासाडी थांबविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर साप पोसण्याची कल्पना अजून कोणाला कशी काय सुचली नाही? कदाचित रोगापेक्षा साप पोसण्याची उपाययोजना त्यांना भयंकर वाटत असावी. अशा भयंकर योजना शेतकर्‍यांसाठीच योग्य, असे सर्पमित्रांना वाटत असावे.) सर्वच साप काही विषारी नसतात. साप काही आपण होऊन डसत नाही. त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला हात लागला तरच तो डसतो. (माणसांचा हात किंवा पाय सापावर पडतो तो जणू काही मुद्दामच सापाने येऊन त्यांना डसावे म्हणूनच.) साप कोणाचाही डुख धरत नाही. कारण त्याचा मेंदूच इतका लहान असतो की त्यात 'दुश्मनी'ची नोंद ठेवणेच शक्य नाही. (परंतु सापांशी मैत्री मात्र शक्य आहे. तेव्हा सर्पमित्रांच्या मते त्याचा मेंदू वाढत असावा.)

एखाद वेळेस प्रेम एकतर्फी केल्या जाऊ शकते. परंतु मैत्री ही उभयपक्षी गोष्ट आहे. साप डुख धरू शकत नसेल तर तो मैत्रीही करू शकत नाही. म्हणजे मग सापाशी मैत्री ही एकतर्फी गोष्ट होऊन बसते. त्यासारखी तद्दन मूर्खपणाची दुसरी गोष्ट नाही. पण हा मूर्खपणा मात्र सर्रास सुरू आहे.

देशभरात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त घटना घडतात. यात साधारणत: 15 हजारांपेक्षा जास्त व्यक्ती उपचाराअभावी मरतात. ही मरणार्‍यांची संख्या प्रामुख्याने खेडय़ापाडय़ातील लोकांची असते. आता खेडय़ापाडय़ातीलच लोक सर्पदंशाने अधिक मरत असतील तर त्यांच्या मरण्याची चिंता करण्याचे कारण नाही. सापाच्या मरण्याची मात्र चिंता करा, असा बेशरमपणाचा संदेश देणारे हे सध्याचे फसफसून उतू जाणारे वन्यप्राणी प्रेम आहे. सापांशी मैत्री करताना, सापांचे संरक्षण करताना साप डसून जी माणसं मरतात त्यांच्या उपचाराची सोय व्हावी. या देशातील कोणताही माणूस साप डसून मरू नये यासाठी गावोगावी 'अँंटी स्नेक व्हेनम' ही लस उपलब्ध असावी, असे मात्र सर्पमित्रांना वाटत नाही. त्यासाठी ते आग्रही असत नाही. माणूस मेला तरी चालेल, पण साप मरता कामा नये, अशी यांची भूमिका. बहुतांशी साप जे केवळ चित्रांमध्ये पाहतात त्यांचा 'सर्पमित्र' या संकल्पनेला जोरदार पाठिंबा असतो. कारण त्यांचे सर्पप्रेम 'आयजीच्या जीवावर बायजी उदार'च्या धर्तीवर असते. नागपंचमीच्या निमित्ताने 'सर्पमित्रां'च्या मुलाखतीमध्ये जखमी सापांवर उपचारांची व्यवस्था व्हावी. 'स्नेक रेस्क्यू सेंटर' गावोगावी असावे, अशा मागण्या त्यांनी केल्या पण साप डसल्यानंतर सर्पदंशाने बाधित माणसांवर उपचार व्हावा, त्यावर मात्र कोणी बोलत नाही.

साप डसून आजही ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर प्राणहानी होते त्या विषयावर न बोलता सापांच्या मरण्याची चिंता केली जाते. याच्या इतका निर्लज्जपणा दुसरा कोणता असू शकतो?

वन्यप्राण्यांचे 'कोडकौतुक' कोणाला करायचे ते करू द्या. पण हे कोडकौतुक शेतकर्‍यांच्या जीवावर, खेडय़ापाडय़ातील माणसांच्या जीवावर कशापायी? वन्यप्राण्यांनी पिकाची नासाडी करावी त्यापायी शेतकर्‍यांना जीव नकोसा व्हावा.

हरिण, रोही, रानडुक्कर, माकडं यांच्या त्रासापायी शेतकरी हैराण आहेत. उभ्या पिकातील त्यांचा धुमाकूळ शेतकर्‍यांचा जीव नकोसा करताहेत. त्या विषयावर कोणी सहानुभूतीने बोलत नाही. शेतकर्‍याचे ढोर इतर पिकात गेले किंवा जंगलात चुकून शिरले तरीही त्यासाठी कोंडवाडा आहे. शेतकर्‍यांना त्याची शिक्षा आहे. पण सरकारी ढोर त्याच्या पिकाची नासधूस करतात त्याबाबत मात्र नुकसान भरपाई नाही, ना कोणाला शिक्षा. वन्यप्राण्यांना काय जगवायचे ते खुशाल जगवा, पण शेतकर्‍यांच्या जीवावरच त्यांचे जगणे किती दिवस?

'शेतीच्या रक्षणासाठी शेतकर्‍यांना बंदुका द्याव्यात.. जर शेताची डुकरे आदी प्राण्यांनी नासधूस केली तर पोलीस अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्या पगारातून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. असे घडले तरच शेतकर्‍यांना रात्री भरपूर विश्रंती व झोप मिळेल.' 134 वर्षापूर्वी 'शेतकर्‍यांचा आसुड'मध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेली ही वाक्ये आहेत. त्यावेळेस जंगल खाते नसल्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान पोलीस अधिकार्‍यांच्या पगारातून द्यावे असे ते सुचवितात. पण त्याही पेक्षा वन्यप्राण्यांच्या त्रासाने हैराण शेतकरी हा त्यांच्या आस्थेचा व जिव्हाळ्याचा विषय बनतो. आता तर एकदमच त्याच्या उलट होत आहे. सापाचे जगणे हे खेडय़ापाडय़ातील माणसांच्या जगण्यापेक्षाही मौल्यवान ठरत आहे.

महात्मा गांधी तर अहिंसेचे पुजारी. परंतु त्यांच्या अहिंसेतही प्राणिहत्येचा भाबडा निषेध नव्हता. 1926 साली अंबालाल साराभाई या त्यांच्या मित्राने त्याच्या मालकीच्या औद्योगिक परिसरात हिंडणारी 60 मोकाट कुत्री पकडून नष्ट केली. याबाबत बराच गदारोळ उडाला. पण 'यंग इंडिया'मध्ये महात्मा गांधींनी या कृत्याचे उघडपणे समर्थन केले. 1928 साली साबरमती आश्रमातील फळझाडांना व शेतातील पिकांना माकडांचा उपद्रव वाढला तेव्हा त्यांना मारून टाकण्याचा प्रस्ताव खुद्द महात्मा गांधींनी मांडला होता. पण आश्रमाच्या सहकार्‍यांनी तो फेटाळला. साप चावून मूल मरण्यापेक्षा सापाला मारले तर मला वाईट वाटणार नाही, असेही ते म्हणत. सापांना पळवून लावण्याचे इतर सर्व उपाय थकल्यानंतर सापांना मारण्याची परवानगी महात्मा गांधींनी दिली होती.

निश्चितपणे माणसांविषयी कणव आणि प्रेम असणाराच माणूस असं म्हणू शकतो. शेतकर्‍यांविषयी शेती पिकाची होणारी नासाडी याविषयी महात्मा फुल्यांना व महात्मा गांधींना कणव होती. म्हणून वेळप्रसंगी माकडं मेली तरी चालेल, पण पिकांची नासाडी होता कामा नये, असे गांधी म्हणाले. आणि लहान मूल मरण्यापेक्षा सापांना मारणे अधिक उचित असे त्यांना वाटल्यास नवल नाही.

पण सध्या आपल्या देशाचा वन्यप्राण्यांच्या बाबतचा प्रवास महात्मा गांधी ते मनेका गांधी असा होतोय.

तिथे माणसांपेक्षा सापालाच महत्त्व अधिक येणार हे ही स्वाभाविकच म्हटले पाहिजे.

माणूस मरो पण साप जगला पाहिजे. पिसाळलेला कुत्रा डसून माणूस मेला तरी चालेल कुत्रा जगला पाहिजे. शेतकर्‍यांच्या पिकाची नासाडी करून शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागली तरी हरकत नाही. पण हरणाची हत्या मात्र होता कामा नये. घोडागाडी चालविणारा उपाशी मेला तरी चालेल पण गाडीला घोडा जुंपता कामा नये.

उद्या बैलांच्या बाबतीतही असाच कळवळा झिनत अमनला आला तर? मग शेतकर्‍या तुझं काही खरं नाही.

(लेखक  चंद्रकांत वानखडे   शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842
     

No comments:

Post a Comment