Monday 20 August 2012

चकव्याची गोष्ट

आपण केलेल्या चुका ह्या वैयक्तिक नव्हे, तर कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणाम करणार्‍या आहेत. त्या चुकांमुळे आपल्याला घरचे-दारचे दोष देतील. पर्यायाने आपली छी:थू होईल. अशी चूक आपल्याकडून घडत आहे याची जाणीव जेव्हा चूक करणार्‍याला होते तेव्हा त्या चुकांवर पांघरूण घालण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो. जे काही विपरीत वर्तन आपल्या हातून घडले आहे त्याला आपण जबाबदार नाही किंवा नव्हतो. कोणत्या तरी अमानुष अमानवी शक्तीने आपल्याला तसे वागायला भाग पाडले. आपण तर खूप सत्शील आहोत. चार्त्यिवान आहोत हे इतरांना दाखवून देण्यासाठी किंवा कधी कधी दुसर्‍याची सहानुभूती मिळविण्यासाठी कुण्यातरी प्रतिभावान कल्पक माणसाने 'चकवा' हा प्रकार शोधून काढला असावा, असे वाटते.

काही संकल्पना समाजमनात रूढ झाल्या की, त्या संकल्पनांचे उदात्तीकरण करण्याची समाजाला सवयच असते. कारण ह्या संकल्पना बर्‍याच वेळा जास्तीतजास्त लोकांच्या सोयीच्या असतात. भविष्यात प्रसंग आला तरी कधी काळी आपल्यालाही बचावाच्या ह्या फांदीला लटकता येईल अशी सुप्त भावना कुठेतरी खोल खोल मनाच्या आतल्या भागात वसत असते. त्यामुळे त्याचा स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न तो जसा करतो, तसेच इतरही त्याला बचाव करण्याची संधी देत असतात. बर्‍याचशा संकल्पना किंवा समाज मनात रूढ असणार्‍या बाबी ह्या कालांतराने नष्ट होत असतात. कारण प्रत्येक दशकाच्या काळात काही नवनवीन बाबी, काही नवीन शब्द, नवे विषय काळच समाजव्यवस्थेच्या झोळीत टाकत असतो असे लक्षात येते. पंचवीस वर्षापूर्वी गावखेडय़ातून जसे भुताने झपाटलेले बायका-माणसं दिसत तसे आता कुठे दिसतात? वावरात गेला अन् चकवा लागून जंगलात भटकला! अशा गोष्टी आता घडलेल्या दिसून येतात ? अर्थात, समाजातली नवी मनोरंजनाची साधने, नव्या समस्या, समाजातील आदर्शभूत असणारी नवी आकर्षणाची केंद्रे ह्या सर्व बाबी नवीन सामाजिक मूल्यांची रुजवण करीत असतात.

बर्‍याच वेळा स्वत:च्या स्वार्थासाठी समाजातली काही चतुर माणसं अशा लोकभ्रमित गोष्टींचा आपल्यासाठी उपयोग करून घेत असतात. कधी अशा भ्रमातून अवमान, धमक्या, नको त्या गोष्टीही घडत असतात. रूपराव इंगळेच्या संयुक्त कुटुंबातसुद्धा चकव्यानेच विघटन आणलं. खरं म्हणजे तीन भावांच्या शेतीकरी वर्गात मोडणार्‍या शेतकरी कुटुंबातला रूपराव हा मोठा भाऊ.घरचा कर्ताधर्ता कारभारी. पेरणी केव्हा करायची, कोणत्या शेतात काय पेरायचं, कोणती पिके घ्यायची, कापणी-मळणी कधी करायची. माल केव्हा विकायला न्यायचा, असे सगळे निर्णय तो घेत असे. सगळ्यांना ते मान्य असतं. कारण काटकसरीने व्यवहार कसे करावे, घराच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या योजना आणाव्यात, कोणत्या टाळाव्यात, या सर्व बाबींचं त्याला दीर्घकालीन ज्ञान होतं. त्यामुळं सगळे भाऊ त्याला मानायचे.

पण एक दिवस त्याला लागलेल्या चकव्याने त्याच्या ह्या कुटुंब संस्थेलाच सुरुंग लावला. त्या दिवशी शेतमाल विकून मोठी रक्कम घेऊन गावी परतत असताना त्याला चकवा लागला. चकव्याने त्याला गावाकडे जाणार्‍या एसटीत न बसवता भलत्याच शहरात जाणार्‍या एसटीत बसवून नेले. चक्कर येत राहिले आणि ती सगळी रक्कम त्याच्याकडून गहाळ झाली.

गावात आल्यावर घरी बैठकीत बसून रूपराव इंगळे चकव्याने आपल्याला कुठे कुठे नेले, पैशाची बॅग कशी गहाळ झाली, हे सर्व घडत असताना आपल्या डोळय़ावर कशी झ्याक आली, आपल्याला कसं काहीच कळलं नाही. मनासारखं वागताच येत नव्हतं. कारण चकवा त्याच्या मनासारखंच वागवून घेत होता. आताही काही सुचून नाही राहिलं. मांत्रिकाकडे गेलं पाहिजे. आपल्यावर इलाज केले पाहिजे. किमान गावदेवीला, आपल्या कुलदैवतेला नवस कबूल केला पाहिजे असं बोलून दाखवत होता. गावातले ओळखीचेही त्याची कीव करून त्याला पुष्टी देत होते. इलाजाचे मार्ग सुचवीत होते.

हे सगळे घडत असताना त्या एकत्र कुटुंबातील एक भाऊ मात्र घराच्या बाहेर ओटय़ावर बसलेला होता. वर्षभर राबराबून कमाई केलेल्या शेतमालाची रक्कम अशी एका झटक्यात गेली. शेतकरी कुटुंबाचं तर असं असते की, एका पिकाला बसलेली ठोंग पाच वर्षे झांज आणते. अर्थकारणाचं सगळं बजेट विस्कळीत करते. पण ती अस्मानी आपत्ती असते. इथं तर हाती आलेला पैसा कारभार्‍याने गमावला होता. म्हणताना तो बाहेर बसून मोठय़ाला शिव्या देत होता.

घरातून मोठय़ा भावाजवळ बसून त्याच्याजवळ आलेल्या लोकांना तो पोटतिडकीने सांगत होता.

''आमचा कारभारी बंग्या मारून राह्यला. आम्हाला सगळय़ायले च्युत्या बनवून राह्यला. हा पैसा त्यानं त्याच्या सासर्‍याच्या घरी नेवून ठेवला आसंल. नाईतं आपल्या नावानं खात्यावर बचत टाकला आसंल. भावाच्या बार्‍यात आता याची नियत चांगली राह्यली नाई. यानं याच्या समद्या पोरीयचे लगनं करून घेतले. आता आमच्या पोरीयचे लगनं आले तं हा आशे मतलबी धंदे कराय लागला. याले नाई चकवा-गिकवा लागला. यानंच आमच्या समद्यायले चकवा लावला.''

थोडय़ा वेळापूर्वी घरात बसून मोठय़ा भावाचं सांत्वन करणारे आता लहान्याची बाजू घेऊन त्याला भडकावून देण्याचं काम करत होते.

''हाव गडय़ा ! बरोबर आहे तुहं! त्याच्या मनात दोन सालापासून वाटण्या करायचं घाटून राह्यलं नं तं ही मोठी रक्कम त्यानं बरोबर पचवली. कशाचा चकवा न बिकवा लागला. असं कुठी होत असतं कां ? बाता मारते तुमचा कारभारी !''

दुसर्‍या दिवशी त्या घरात भावाभावांत, बायकाबायकांत घनघोर भांडण झाले आणि दोन वर्षापासून ज्या वाटण्या करण्याचं खांडूक त्या एकत्र कुटुंबात ठसठसत होतं ते फुटून मोकळं झालं. एक चकवा लागला आणि त्याने वर्षानुवर्षापासून सुखाने नांदणार्‍या त्या संयुक्त कुटुंबाचे विघटन केले.

दुसरा असाच एक सधन शेतकरी. खरं म्हणजे दारूचं दुकान चालवणारा सावकारच. त्याला शेजारी असणारी पाच एकर शेती अल्पभूधारक शेतकर्‍याकडून विकत घ्यायची होती. पण शेतीवर प्रेम असणारा तो कष्टकरी शेतकरी ती शेती विकायला तयार नव्हता. त्यावेळीही त्याने चकव्याचा आधार घेतला. अमावस्या किंवा पुनव असली की तो बरोबर त्या शेजारच्या शेतात जाऊन अर्धवट खोदून बुजवलेल्या विहिरीत म्हणजे भामटात जाऊन पडायचा अन् ''चकव्यानं आपल्याले त्या वावरात नेलं. चकवा आपल्याशी बोलला. त्यो वावराच्या मालकाचा भग मांगते अन् मले पुन्हा माह्या वावरात नेऊन आदळते,'' अशी बोंब केली.

त्या शेताचा मालक आपल्या मायचा एकुलता एक लेक.शेजारपाजारच्या पेटवलेल्या बायका मायच्या मनात भय निर्माण करायच्या. मग माय म्हणायची-''काय करायचं बाळू आपल्याले असं चकव्याचं वावर ! एखादं दिवशी त्यो चकवा तुहा भग घेईल. मंग आम्ही कोणाच्या भरवशावर जगावं बाळ्या? तुह्या लहान लेकरायचं कसं होईल बाप्पा !''

त्या शेताचा मालक असणारा तो शेतकरी आता धाकी पडला आहे. सध्यातरी आमावस्या आणि पुनवेच्या दिवशी तो आपल्या शेतात जात नाही. धाकीच पाडलं लोकांनी त्याला तसं ! येणार्‍या काळात त्याच्या मस्तकात उजागर होणारा चकवा मरून जाणार आहे, की आणखी उग्र रूप धारण करणार आहे. हे मात्र त्या अल्पभूधारक शेतकर्‍याचं मनच ठरवणार आहे.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास','तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

No comments:

Post a Comment