Monday 6 August 2012

इंग्रजीत बोला बे..


''गुड मॉर्निग सर..''
'सीट डाऊन.. आज बुधवार आहे.. आज सगळ्या पोरांनी इंग्रजीत बोलायचं आहे''

''काहून सर?''

''आपल्या हेडमास्तरनं नियम काढला की बुधवारी इंग्रजीत बोलत जा.. सगळ्यांना इंग्रजीत बोलता आलं पाह्यजे.. कारण की इंग्रजी जागतिक भाषा आहे''

''एस सर''

'उभा राह्य.. सचिन.. काल शाळेत का आला नाहीस?''

''माह्या बाबाच्या पायाले कुरुप..''

''सेमी इंग्रजीत सांग''

''माय डॅडी हॅज कुरुप ऑन हीज लेग.. सो आय वाज गॉन ऑन दी बकर्‍या चाराले''

''हासू नका बे.. तुमचाही नंबर आहे.. बाबू अभिषेक.''

स्टॅंडअप.. शंकरचं स्पेलिंग सांग?''

''एस एच ए शंकर..''

''अहमदाबाद''

''ए एम डी ए बाद''

''चूक! आठवीत गेला ना घोडय़ा''

'सर, हा रुतीक्या मले चकोन्या दाखोते''

''इंग्रजीत सांग''

''रुतिक्या इज दाखोइंग चकोन्या टू मी''

''उभा राह्य बाबू रुतिक.. कालचं होमवर्क केलं काय?''

''नो सर.. काल मी शाळेत आलो नोतो''

''काहून?''

''बिकॉज माय ड्रेस वाज कयकला''

''सर, हे पुनी मले झिपरी म्हनते''

''काहून बाई पूनम?''

''या सुमीनं आगुदर मले लिचोंडा घेतला सर''

''इंग्रजीत..''

''सुमी गीव्ह मी लिचोंडा''

''जास्त शानपना करू नका.. इंग्रजीचा पिरेड आहे.. सीट डाऊन.. तू उभा राह्य..''

''मी काय सर?''

''तू नाही.. तो बाजूचा.. पोरीकडे पाहून हासून राह्यला.. उभा राह्य बाबू अमोल्या.. निबंध सांग.. माय फेवराइट हिरो..''

''सलमान खान इज माय फेवराइट हिरो.. आय हेवसीन हीज पिच्चर वीर एस्टरड.े. इन वीर ही जंप ऑन घोडा अँन्ड पिटालिंग''

''अबे गाढवा.. फेवराइट हिरो म्हनजे सिनिमातला हिरो नाही''

''मग कोनता सर?''

''थोर पुरुष! उदारनार्थ महात्मा गांधी!''

''गांधीजी इज माय फेवराइट हिरो.. गांधीजी नेसिंग धोतर.. बिकॉज ही फील सिंपल लिव्हिंग अँंड हाय थिंकिंग.. ही ड्रिंक मीस्क ऑफ बकरी.. ही टोष्ट इंग्रज.. चले जाव.. इंग्रज आर गोइंग अँंड इंडिया इज शायनिंग''

''बस्स झालं.. तू उभी राह्य शिल्पा.. गाईचा निबंध सांग''

''काऊ हॅज फॉर लेग.. टू शिंग.. वन शेपूट''

''शेपटाले इंग्रजीत काय म्हंतात सर?''

''टेल''

''अन् ते बांडं असलं तर?''

''बांडं असलं तर बांडं टेल.. पुढे सांग''

''काऊ इट कडबाकुटार.. शी गिव्ह अस मिल्क.. शी गिव्ह अस कारोळ''

''कारोळले इंग्रजीत काय म्हंतात सर?''

''लिटील काऊ''

''सर, धोतराले इंग्रजीत काय म्हंतात?''

''धोताड''

''अन् लुगडय़ाले?''

''लुगाड''

''अन् लुगडय़ाच्या घोयाले?''

''अबे इंग्रजी विदेशातली भाषा आहे.. तिकडे लुगडे नेसत नाहीत''

''सांगाना सर.. लुगडय़ाच्या घोयाले काय म्हंता?''

''घोया ऑफ लुगाड''

''सर, हा बंडय़ा माह्याकडे पाहून डोये वासते''

''बंडय़ा, स्टॅंडअप.. तुह्या डोयाले काय झालं?''

''मांजोई झाली''

''सेमी इंग्रजीत सांग''

''आय हॅव मांजोई ऑन माय आय''

''व्हाय यू आर मांजोई?''

''आय हॅव डसिंग तेलमुंगी''

''आता सांग बाबू संत्या.. फाइव्ह इनटू सेवन किती?''

''फिप्टीसेवन''

''मॅट झाला काय? हुशार आहेस ना बाबू तू?''

''सर, हा संत्या हुशार आहे म्हनून फिप्टीसेवन सांगून राह्यला.. बाकीचे पोट्टे शंभर-दीडशे सांगतात''

''घरी पाढे पाठ करत जा''

''हा दिवसभर टीव्ही पाह्यते सर''

''इंग्रजीत सांग''

''ही लुक्स दिवसभर टीव्ही.. ही लुक्स उलाला उलाला..''

''उलाला पाहून काय भेटते बाबू? जनरल नॉलेज वाढते का? टीव्ही इज इडिएट बॉक्स''

''सर..''

''आता काय झालं बोंबलाले?''

''ह्या पक्यानं माही शेंडी..''

''इंग्रजीत''

''पक्या इज पुलिंग माय शेंडी..''

''पक्या.. लय मज्जावला काय? चाल पुढे ये.. घोडीकर''

''मे आय गो आऊट सर?''

''कायले?''

''लगवी आली''

''इंग्रजीत..'

''आय हॅव कमिंग लगवी''

''थोडा वेळ थांब.. पिरेड होऊ दे''

''नाईना सर. देअर इज सो फोर्स..''

''बस खाली.. कायले आला बे शाळेत?''

''जमत नाई सर.. फोर्स इज ग्रोइंग.. इफ आय नॉट गो देअर वील बी धिंगाना..''

''गेट आऊट.. तुमाले इंग्रजी शिकोनं म्हनजे डोकं मॅट करनं आहे लेकहो.. त्याच्यापेक्षा आपला मराठीचाच धडा काढा''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9561226572

No comments:

Post a Comment