Wednesday 8 August 2012

सण आनंदाचा की मरणाचा?


रक्षाबंधन होऊन गेले. पुढच्या आठवडय़ात पोळा. खरंतर सण म्हणजे आनंदाचा क्षण. पण आता शेतकर्‍यांची आर्थिक दुरवस्था इतकी विकोपाला गेली आहे की हे सणच त्याला संकटं वाटतात. हेच सण त्याच्या दु:खाचे व दहशतीचे कारण ठरतात. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पाहिली तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. ती म्हणजे रक्षाबंधन व पोळा हा सण येण्यापूर्वी शेतकरी आत्महत्येच्या संख्येत वाढ होते. 2009 मध्ये तर पोळ्य़ाच्या दिवशीच विदर्भात 14 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. तशी शेतकर्‍यांची आत्महत्या ही नित्याचीच बाब झाली आहे. या विषयावर 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी कोडगी व निर्लज्ज अवस्थाही समाजाने धारण केली आहे. तरीदेखील पोळ्य़ाच्या आधी आत्महत्येची संख्या का वाढते? हे समजून घेतले तर कदाचित शेतकर्‍यांच्या आजच्या भयावह विदारक आर्थिक दुरवस्थेची कल्पना येऊ शकेल.

कोणताही सण साजरा करायचा म्हटला की, त्याच्या काही अतिरिक्त मागण्या असतात. सामाजिक दबाव असतो. सण साजराच केला नाही तर समाज काय म्हणेल? याचेही दडपण असते. काही कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदार्‍या असतात. घरी काही असो नसो. घरी गोडधोड करणे, सणानिमित्त काही कापडचोपड आणणे. रक्षाबंधनासाठी बहीण येणार असेल तर तिला ओवाळणीत काय टाकावे? पाहुणचारात काय करावे? असे प्रश्न आर्थिक दुरवस्थेमुळे शेतकर्‍यांना भेडसावणे सुरू होतात. पोळ्य़ाचा सण हा विशेषत: बैलांचा सण. आपण 21 व्या शतकात पदार्पण केले आहे अशी कितीही शेखी मिरविली, तंत्रज्ञानाने अवकाशात झेप घेतली याची वाखाणणी केली तरीही भारतीय शेती प्रामुख्याने निसर्गावर, मानवीय श्रमावर आणि बैलांच्या कष्टावर अवलंबून आहे. अजूनही ट्रॅक्टरसारखे यंत्र बैलाचा पर्याय बनू शकलेला नाही. शेतीमध्ये आजही बैलाला पर्याय नाही. त्यामुळे जो बैल शेतकरी, शेतमजुरांसोबतच शेतीमध्ये राबराब राबतो त्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचा सण म्हणजे पोळा. बैल हा शेतकर्‍याच्या जीवनातील अविभाज्य घटक.

या दिवशी बैलाला कष्टापासून मुक्ती व विश्रंती असते. त्याची नदीवर आंघोळ घातली जाते. पोळ्य़ाच्या आदल्या दिवशी त्याचे जू ठेवून ठेवून थकलेले, दुखलेले, सुजलेले खांदे तुपाने चोळून शेकले जातात. त्यालाच ग्रामीण भाषेत 'खांद शेकणी' म्हणतात. या 'खांद शेकणी'सोबतच गडी माणसांना पोळ्य़ाच्या दिवशी जेवणाचे 'आवतन' दिले जाते. बैल जसा शेतीचा अविभाज्य घटक तसाच शेतमजूरही. पोळ्य़ाच्या दिवशी मालकाने आपल्या बैलाला व गडी माणसांना पुरणपोळीचे जेवण द्यावे हे अभिप्रेत असते. बैलाची थोडी 'हौस-मौज' करावी. त्याचे शेतीत राबराब राबून दुखलेले खांदे तुपाने चोळावे. ते थोडे शेकावे. त्याला न्हाऊ-धुऊ घालावे. त्याच्या शिंगांना रंग द्यावा. बैलांच्या अंगावर झूल चढवावी. त्यांच्या शिंगांना बाशिंग बांधावे. त्याला हौसेने सजवावे. त्याला त्या दिवशी गोडधोड खाऊ घालावे. वाजतगाजत मिरवत बैलांना पोळ्य़ात न्यावे. तसेच शेतकर्‍यांसोबत राबणार्‍या गडी माणसांनाही त्या दिवशी पुरणपोळीचे जेवण द्यावे व त्यांच्या ऋणातून थोडेबहूत का होईना उतराई व्हावे असा हा सण.

शेतकर्‍यांसाठी भावोत्कट प्रसंग. पण जेव्हा आपण या साध्यासाध्या गोष्टीही करू शकत नाही याची दु:खद जाणीव शेतकर्‍याला होते. त्याची अगतिकता, असाहाय्यता त्याला तीव्रपणे टोचते, बोचते तेव्हा त्याची निराशा टोकाला जाऊन पोहोचते. जगाला पोसणारा शेतकरी, स्वत: अन्न उत्पादक असलेला अन्नदाता शेतकरी. त्याचीच अवस्था अन्नाला मौताद अशी या व्यवस्थेने केली आहे. अशा अवस्थेत त्याला पोळ्य़ासारखा सण संकट वाटत असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अन्नदात्याची ही अवस्था पोळ्य़ासारखा सण नसेल तर किमान झाकली तरी जाते. पण जेव्हा पोळ्य़ासारखा सण येतो तेव्हा त्याची अब्रू चव्हाटय़ावर पडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शेतकर्‍यांच्या आत्महत्येची बातमी मोठय़ा प्रमाणात येते आणि जसजसा पोळा जवळ येतो तसतशी शेतकरी आत्महत्येच्या संख्येत वाढ होताना दिसते.

बैलांची साधी 'हौस-मौज' आपण करू शकत नाही. गडी माणसांना सणाच्या दिवशी साधे गोडधोडही खाऊ घालू शकत नाही ही कल्पनाच जमीन मालकाला असह्य होते. आपण एवढी शेती करतो. रात्रंदिवस राबराब राबतो. अन्नधान्याचे उत्पादन करतो. सार्‍या जगाला पोसतो. पण आपल्या शेतीवर राबणार्‍या आपल्या बैलांसाठी, रक्षाबंधनासाठी येणार्‍या बहिणीसाठी, आपल्या शेतात राबणार्‍या गडी माणसांसाठी, आपल्या शेतमजुरांसाठी, आपल्या कुटुंबीयांसाठी आपण काहीही करू शकत नाही ही भावनाच त्याला जगण्यातील निर्थकता तीव्रपणे जाणवून देते. एवढे निर्थक आयुष्य असेल तर जगण्यात अर्थच काय? हा प्रश्न त्याला निराशेच्या टोकाला नेतो व त्यातूनच तो आत्महत्येसाठी प्रवृत्त होतो. तो आत्महत्या करतो. तो मरण पत्करतो. तो मरतो. त्याचे मरण झालेच तर दोन ओळीच्या बातमीचा विषय बनतो आणि नंतर सारे शांत होते. संपून जाते. खरोखरच हा विषय इतका सहज घेण्यासारखा आहे? एकूणच शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा गंभीर चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे. पण तो तसा होत नाही. शेती, शेतकर्‍यांची दुरवस्था, त्यातून होत असलेल्या आत्महत्या, सणासारखा आनंदाचा क्षणही त्याला संकटासारखा वाटणे हे सर्वच विषय गंभीर आहेत. कृषिप्रधान म्हणविल्या जाणार्‍या देशात तरी ते गंभीर मानले जायला हवे होते. पण तसे अजिबात होताना दिसत नाही.

सध्या सर्व वृत्तपत्रांमध्ये, माध्यमांमध्ये चर्चा आहे ती कोण्यातरी हवाईसुंदरीच्या आत्महत्येची. चर्चा आहे ती कोण्यातरी अनुराधा बाली ऊर्फ फिजा हिच्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची. हत्या की आत्महत्या या चर्चेची गुर्‍हाळं माध्यमांमध्ये 24 तास आहेत. पण शेतकर्‍यांच्या आत्महत्येला मात्र ना प्रिंट मीडियामध्ये कव्हरेज ना इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जागा.विकासासोबतच वाढती विषमता हा खरा चिंतेचा विषय आहे. एका बाजूला वाढती श्रीमंती तर दुसर्‍या बाजूला वाढती गरिबी. शहरी भागाचे दरडोई वाढणारे उत्पन्न तर ग्रामीण भागातील कमीकमी होत असलेले दरडोई उत्पन्न. त्यामुळेच शहरी भागांमध्ये आज नवनवीन सण उदयास येताना दिसताहेत. आहे ते सण त्यांच्या श्रीमंतीला कमी पडताहेत म्हणून ते 'व्हॅलेंटाईन डे', 'इयर एण्ड', 'मदर्स डे', 'फादर्स डे', फ्रेंडशिप डे', 'बर्थ डे' असे नवनवीन उत्सवांचे फंडे शोधताहेत. तर दुसर्‍या बाजूला ग्रामीण भागामध्ये आहे तेच सण आता जड जात आहेत आणि या सणांपासून तोंड लपविण्यासाठी शेतकरी आत्महत्या करीत आहे. ही विदारक अवस्था निश्चितच दुर्दैवी म्हणावी लागेल. विकासाचा बडेजाव मिरवताना, महासत्तेचे ढोल वाजत असताना या विषमतेकडे लक्ष जात नाही हे खरे असले तरीही या वाढत्या विषमतेकडे दुर्लक्ष करणे परवडणारे निश्चितच नाही.

सुजेसारखी वाढणारी महानगरे एका बाजूला तर सुकत चाललेला ग्रामीण भाग दुसर्‍या बाजूला. ग्रामीण भागात आहे तेच सण संकटासारखे वाटावे तर शहरात हौस-मौज करायला आहे ते सण कमी पडावे. त्यासाठी नवनवीन सणांची त्यात भर पडावी हे चित्र भयावह आहे. एका बाजूला रोजचीच दिवाळी तर दुसर्‍या बाजूला कायमचाच गरिबी व उपासमारीचा शिमगा. हे असंच किती दिवस चालणार? पोळ्य़ाचा सण आनंदाचा की मरणाचा इतपत प्रश्न पडावा अशी सध्याची अवस्था आहे.

(लेखक
चंद्रकांत वानखडे शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment