Wednesday 29 August 2012

जगणे आणि जगविणे ही आदिम प्रेरणा

जड पदार्थातून व जडाचे आधारे उगवलेले जीवन क्षणभंगुर असते. पदार्थमय देहात दीर्घकाळ प्राण टिकू शकत नाही. त्यामुळे प्राणाचा अथवा जीवनाचा विकास होण्यासाठी जगण्याची व प्रजातीच्या पुनरुत्पादनाची मूलभूत प्रेरणा (इन्स्टिंक्ट) सर्व सजीवांच्या अंतरंगात दृढ होणे गरजेचे होते. जीवनाचा विकास म्हणजे अधिकाधिक वाढत्या प्रमाणात सृष्टीचा बोध होण्याची, सृष्टीवर नियंत्रण मिळविण्याची व अनेक प्रकारे उपभोग घेण्याची प्रक्रिया. वैज्ञानिक असे सांगतात की, जर एखाद्या जिवाणूवर संकट आले-म्हणजे तो नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली - तर तो जिवाणू स्वत:मधले डीएनए रेणु भोवतालच्या वातावरणात विखरून टाकतो आणि आजुबाजूचे जिवाणु लगेच त्या विखुरलेल्या डीएनए रेणुंना स्वत:मध्ये शोषून घेतात. डीएनएची ही देवाणघेवाण कल्पनातील वेगाने होत राहते व काही महिन्यांतच संपूर्ण पृथ्वीवरील जिवाणूंच्या डीएनए रचनेत काही बदल घडून येतात, जे त्यांना संकटांचा मुकाबला करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सक्षम बनवितात. त्यामुळेच कालपर्यंत प्रभावी ठरलेले अँंटीबायोटिक औषध अथवा किटकनाशक आज निष्प्रभ ठरल्याचा अनुभव येतो.

म्हणजेच जगणे, व स्वत:ची प्रजाती वाढविणे या सर्व सजीवांच्या मूलभूत प्रेरणा आहेत. त्या प्रेरणा नसत्या तर पृथ्वीवर जीवनाचा विकासच झाला नसता. शिवाय आपल्या देहाच्या पोषणासाठी, रक्षणासाठी व देहाच्या पुनर्निर्मितीसाठी देहाबाहेरील पर्यावरणातून पोषक घटक (पदार्थ व ऊर्जा) देहाच्या आत ओढून घेणे, त्या घटकांवर देहान्तंर्गत प्रक्रिया करून जीवपेशी बनविणे व नको असलेले घटक पुन्हा विष्ठेच्या रुपात बाह्य पर्यावरणात टाकून देणे (जी विष्ठा इतर कोणत्या तरी सजीवाचे अन्न असते) हे कार्य प्रत्येक सजीव अखंड करत राहतो. भोवतालच्या पर्यावरणातील संभाव्य बदलांचा अंदाज घेऊन अनुकूल काळातच अन्नाचे साठे जमवून ठेवण्याची अथवा पाऊस - वार्‍यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी भक्कम निवार्‍याची तजवीज करण्याची कल्पक बुद्धीही मुंगी सारख्या क्षुद्र सजीवांमध्ये देखील आढळून येते. अर्थात 'पावसाळ्यापूर्वी आपण अन्न साठवून वारुळाची डागडुजी केली पाहिजे' असा माणसारखा विचार कोणतीही एक मुंगी करू शकत नसेल. परंतु 'मुंगी' या प्रजाती (स्पेसीज) मध्ये ते शहाणपण उत्क्रांतीक्रमात जगण्याच्या व वृध्दींगत होण्याच्या मूलभूत प्रेरणेतून पर्यावरणीय संकटांना तोंड देता-देता विकसीत झाले असणार. आमच्या घराच्या मागील भिंतीच्या आश्रयाने एक वेल वर चढत गेली. खोलीच्या खिडकीइतकी उंची होताच त्या वेलीने खिडकीच्या आतून गजाला वळसा घातला व पुन्हा उंची वाढल्यावर दुसर्‍याही वरच्या गजाला वळसा घातला. स्वत:चा आधार भक्कम करण्याचे हे 'शहाणपण' वेलीत प्रगटले. माझ्या घराच्या मागील बाजूचे तारेचे कंपाऊड तुटले होते. मागच्या सर्व्हिस गल्लीतून डुकराची एक गर्भार मादी आमच्या परसदारी असलेल्या झुडपामध्ये मोठा खड्डा स्वत:च्या पायांनी करू लागली. सुरूवातीला हाकलले तर ती पळून जायची. परंतु जसजसे तिचे दिसत भरत आले, तसतशी ती धीट व आक्रमक होत गेली. खड्डा करून तिने त्यात पाचोळा अंथरला व पिलांना जन्मही दिला. पिले जन्मल्यावर ती अधिकच आक्रमक होऊन त्यांचे संरक्षण करत होती. पुढे पिले चालू लागून स्वतंत्र झाल्याबरोबर या डुकरीणीची सर्व आक्रमकता लोप पावली व ती हाकलल्यावर घाबरुन पळू लागली. स्वत:च्या प्रजातीची वृद्धी व्हावी यासाठी प्राण्यांची नित्याची प्रकृती देखील प्रसंगविशेषी कशी बदलते व असहाय अवस्थेतील पिलांचे रक्षण करण्यासाठी एरवी भित्रा स्वभाव असलेली मादी-माता कसा चंडिकेचा अवतार धारण करते, याची असंख्य उदाहरणे प्राण्यांमध्ये आढळून येतात.

उत्क्रांतीच्या खालच्या टप्प्यांतील सजीवांच्या प्रजातीतील प्रत्येक जीवाचे स्वत:चे वेगळेपण (त्या प्रजातीतील इतर जीवांपेक्षा) प्रगटताना दिसत नाही. त्या त्या प्रजातीची एकूण सामुदायिक प्रकृती जगण्याच्या ओघात अधिक शहाणी होत गेली, व्यक्तिगत जीवांची नव्हे, असे म्हणता येईल. मात्र उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यात म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये मात्र प्रजातीतील वैयक्तिक जीवांमध्ये देखील स्वत:चे वेगळेपण व वैशिष्टय़च उमलू लागले. सर्व गायी साधारणपणे सारख्याच दिसत-वागत असल्या तरी प्रत्येक गायीच्या रुपात व स्वभावात इतर गायींपेक्षा वेगळेपण कसे असते, हे आपण जाणतोच. असे डास अथवा मुंग्यांच्या बाबतीत म्हणता येत नाही. निर्जीव व सजीवांमधला एक महत्त्वाचा फरक वैज्ञानिक असाही सांगतात की आपण एखाद्या दगडाला लाथ मारली तर त्याची प्रतिक्रिया काय होईल, याचा अचूक अंदाज करता येतो. परंतु एखाद्या कुर्त्याला लाथ मारली तर त्याच्या प्रतिक्रियेचा अचूक अंदाज करणे अशक्य असते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर लाथ मारल्यावर दगड किती दूर जाऊन पडेल हे न्यूटनच्या भौतिकीय सिध्दांताच्या आधारे लाथेतील जोर व दगडाचे वजन माहीत करून अचूक वर्तविता येते, कारण त्या लाथेमुळे दगडाच्या आतील संरचने (स्ट्रक्चर) मध्ये बदल होत नसतो. परंतु सजीव प्राण्याला लाथ बसल्यावर त्याच्या अंतरंगातील एकूण संरचनेत काही बदल होऊ लागतात व त्या बदलांसह त्याची प्रतिक्रिया घडते. भोवतालच्या जगाकडून घडणारी क्रिया ही सजीवांच्या आतील संरचनांमध्ये बदल घडविण्यास कारणीभूत ठरू शकते; परंतु ते बदल नेमके कशा स्वरुपाचे असावे, हे त्या बाह्य जगाला ठरविता येत नाही. क्रियेला प्रतिसाद देणार्‍या सजीवाची एकूण प्रकृती ते ठरविते.

व्यक्तिस्वातंर्त्याची ही प्राथमिक सुरूवात आहे.

भोवतालच्या पर्यावरणाशी आपले जीवन सुसंगत करण्याकरिता सर्व सजीव प्रजातींच्या प्रकृतीमध्ये उत्क्रांतीच्या ओघात बदल होत गेले. हे बदल त्यांनी ठरवून जाणतेपणी केलेले नाहीत. परंतु ही यांत्रिकपणे अथवा अपघाताने घडलेली प्रक्रिया असावी, असेही म्हणता येत नाही. जगणे व आपली प्रजाती वृध्दिंगत करणे या आदिम प्रेरणा सजीवांमध्ये इतक्या बलवान आहेत की जगणे व प्रजा वाढविणे शक्य व सुसह्य होण्यासाठी प्रकृती परिवर्तन ही अपरिहार्य व क्रमप्राप्त बाब ठरत गेली. खरे पाहता जगणे व आपल्या प्रजातीची संख्या वाढविणे या दोन वेगळ्या प्रेरणा नसून 'आपली प्रजाती प्रदीर्घकाळ टिकून राहणे' ही एकच मूळ प्रेरणा त्या त्या सजीवाच्या प्रजातीच्या ठायी असते. एक व्यक्ती म्हणून सजीवाचे जगणे-मरणे ही गौण बाब असून निसर्गाला खरे मोल प्रजातीच्या टिकून राहण्याचे असते. पृथ्वीवर जीवनाचा सर्वागीण विकास पदार्थमय देहांच्या आधारे होण्यासाठी ही मूलभूत प्रेरणा अत्यावश्यक ठरते.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

No comments:

Post a Comment