Wednesday 29 August 2012

'मोरां'च्या नावाने 'कोंबडय़ां'ची विदेशवारी!


काही लोकांचं वागणं पाहिलं की, हसावं की रडावं हेच कळत नाही.

खरंतर साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत ह्यातला प्रत्येक शब्द ऐकताना किती भारी वाटतो. एकेकाचा केवढा रुतबा, केवढा दबदबा! सर्वसामान्य लोकांच्या मनात यांच्याबद्दल एकप्रकारचं कुतूहल असतं. आदराचीही भावना असते. विविध सामाजिक कार्यक्रमात यांना मोठा मानही मिळतो, हेच लोक समाजाला दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन करतात. हेच लोक मनोरंजनसृष्टीचे प्राण असतात, आधारस्तंभ असतात.

पण बाजारपेठेत जसा एके काळी 'दिल्ली मॉडेल'ने किंवा अलीकडे 'चायना मार्केट'ने धुमाकूळ घातला तशीच अवस्था साहित्य क्षेत्रातही पाहायला मिळते. विविध भागात असे तक लादू किंवा डुप्लिकेट मालाचे ठेकेदार असतात. विदर्भातही आहेतच. 'विदर्भ साहित्य संघ' नावाची एके काळची गौरवशाली संस्था हल्ली 'चायना मार्केट'चे मोठे केंद्र होऊन बसली आहे. सर्व प्रकारचा डुप्लिकेट माल इथे मिळतो. इकडच्या तिकडच्या चिंध्या गोळा करून कादंबर्‍या 'असेम्बल्ड' करणारे आणि स्वत:च्या नावाच्या पट्टय़ा चिकटवणारे लोक इथे 'कॉलर टाईट' करून वावरतात. गालिच्याचे व्यापारी असल्याचा पुरस्कारही मिळवितात आणि चोरीचा माल दिला म्हणून लोकांच्या लाथाही खातात. साराच अफलातून कारभार! वरून हे 'चिंधीचोर' इतरांना साहित्याची प्रमाणपत्रंही वाटत फिरतात.

जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या नावानेही असाच धिंगाणा सुरू आहे. मोरांच्या नावानं अनुदान लाटायचं आणि कोंबडय़ांनी विदेशात 'फडफडून' यायचं, असा सारा प्रकार. त्यातले किती लोक खरंच साहित्यिक असतात? साहित्यिक संस्थेवर कब्जा करून बसलेल्या ह्या लोकांचं साहित्य क्षेत्रातलं योगदान नेमकं काय? आपण लायब्ररीमध्ये झाडपूस करतो, या आधारावर एखाद्या पोरानं स्वत:ला विद्वान म्हणवून घ्यावं किंवा सिनेमा थिएटरच्या गेटकिपरला 'सिनेस्टार' म्हणवून घेण्याची दुबरुद्धी सुचावी तसा हा केविलवाणा प्रकार!

कुणाला काय बोलणार? बोलून तरी काय फायदा?

'अरे' बोललो चुकले माझे

'बरे' बोललो चुकले माझे

तुझ्या सोवळ्य़ा मैफलीमध्ये

'खरे' बोललो चुकले माझे!

यंदा होऊ घातलेल्या जागतिक साहित्य संमेलनाचा याच कारणामुळे बोर्‍या वाजण्याची वेळ आलेली आहे. तिकडची आयोजक संस्था फक्त साहित्यिक असलेल्या लोकांची तिकिटं द्यायला तयार आहे. पण या संस्थांमधील लोकांना त्यात समाधान नाही. त्यांना मोरांच्या तिकिटावर आपल्या कोंबडय़ांना विदेशात पाठवायची खाज आहे. आतापर्यंत हे चालत आलं. त्या अनुभवातूनच यांची चालबाजी उघड झाली आणि पुढचे आयोजक शहाणे झालेत. पण ह्या साहित्य संस्था काही शहाण्या व्हायच्या विचारात दिसत नाहीत.

हे कसे साहित्ययात्री, हा कसा आजार झाला

संपल्या साहित्य संस्था, 'चायना' बाजार झाला!

ज्या क्षणाला 'कोंबडी'ला 'मोर' व्हावे वाटले

पाखरांनो, हाय चालू त्या क्षणी व्यभिचार झाला!

खरंतर हे जागतिक साहित्य संमेलन हाच मुळात एक हौशा-गौशा लोकांचा उत्सव आहे. त्यात कसलं साहित्य अन् कसली साहित्यसेवा, पण सरकारलाही अक्कल नाही. उगीच या संस्थांना अनुदान देत असते. त्यांच्याही हाडावर चोट नाही. यांच्याही हड्डीवर थोडं मांस येऊन जाते, विदेशात उंडारून आल्यामुळे सया साहित्यिकांची तिथे काय गोची होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

पण एकंदरीत सर्वत्र असाच गोंधळ सुरू आहे. केवळ साहित्यिकांना किंवा या संस्थावाल्यांना दोष देऊन काय फायदा? पण यामुळे साहित्याचं महत्त्व कमी व्हायला हातभार लागतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्येही आपल्या आपल्या जवळच्या लोकांना घुसविण्याचा प्रयत्न असतो. थोडंफार प्रमाण तसं स्वीकारायलाही हरकत नाही. पण इथे दुधामध्ये थोडं पाणी मिसळण्याऐवजी सरळ सरळ पाण्यामध्येच दुधाचे काही थेंब मिसळण्याचा आणि त्यालाच 'ब्रॅण्डेड दूध' म्हणून खपविण्याचा निर्लज्जपणा कुणी करीत असेल तर ते कसं खपवून घ्यायचं? म्हणूनच मग रसिक असल्या आयोजनाकडे पाठ फिरवितो.

जी गोष्ट साहित्य संमेलनाबद्दल तशीच परिस्थिती पाठय़पुस्तकातील साहित्याबद्दलही. त्यातील दर्जा पाहिला तर अक्षरश: संताप येतो. अभ्यासक्रमामधल्या किती कविता विद्यार्थ्यांना पाठ असतात? आवडतच नाहीत तर पाठ तरी कशा होणार? विद्यार्थी सोडा, वर्षानुवर्षे शिकविणार्‍या प्राध्यापकांना तरी किती कविता पाठ असतात? आणि नसतील तर का होत नाहीत याचा आपण विचार करणार आहोत की नाही? तुकाराम, बहिणाबाई, तुकडोजी महाराज, कबीर, मीराबाई, गालीब हे कसे लोकांना पाठ आहेत?

मी कुणाला काय बोलू

या उन्हाला काय बोलू

बाग जर बैमान झाली

कुंपणाला काय बोलू?

या अंध:पतनाला तुम्ही-आम्ही सारे जबाबदार आहोत. हा गुन्हा जसे साहित्यिक करतात तसे रसिकही करतात. त्यांनीच 'असली'ला असली म्हणून डोक्यावर घेतानाच 'चायना' मालाला चायनाच्याच एवढी किंमत द्यायला हवी. केवळ दिखाऊपणावर किंवा 'चमकेगिरी'वर भाळून नकली मालाचा उदोउदो करणं बंद करायला हवं.

जाऊ द्या. उगीच आपलं डोकं खर्च करण्यापेक्षा खरा पाऊस अंगावर झेलू या.. जागतिक साहित्य संमेलनाला शुभेच्छा देऊ या आणि संस्थाचालकांनाही आतातरी सद्बुद्धी येईल अशी आशा करू या.

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment