Tuesday 7 August 2012

मीच माहा गुरू झालो


मी आर्केस्टात असतानी आमच्या असं ध्यानात आलं का आपल्या ग्रुपमंदी मिमिक्रीवाला नसल्याच्यानं सिनिमाच्या गान्याच्या मंधामंधात लोकायले चेंज म्हणून काईतरी देल्लं पायजे. मंग मले आठोलं का कालेजमंदी नाईतं 'एनसीसी'च्या कॅम्पमंदी मी उमरावतीचे संगीतकार मा. मनोहर कवीश्वर आन् वध्रेचे प्रा. देवीदासजी सोटे यायच्या कविता म्हनो आन् पोरायले ते आवडे तं इथ त्याचा प्रयोग कराले काय हरकते हाय. आमच्या भाग्योदय कला मंडयाच्या मीटिंगमंदी मी हा इसय मंडला आन् सगयाले तो पटला. मंग दुसर्‍या साली गनपतीच्या कार्यकरमात त्यायची 'जव्वाईबुवा' हे कविता म्हनली. लोकायले आवडली. मंग सोटे सराच्या खूप कविता होत्या, पन त्यातली मले आवडनारी 'ए भाऊ सायेब जरा वाले व्हाना । कापसाचा गाडा माहा जाऊ दयाना' ही कवितातं लोकायनं डोस्क्यावर घेतली. तिची फरमाईस याले लागली. मी कालेजात सायकलनं जातानी 'ओड कापसाचा गाडा' असा आवाज द्याले लागले. टवायी म्हून नाई आपुलकीनं. हे दोनतीन साल पुरलं. मंग सुधाकर कदम, दीपक देशपांडे हे मंडय़ातले दोस्त माह्या मांग लागले का हे उसनवारी कुठ पावतर? आत तू कविता लिह. म्या म्हनलं राजा असी स्टेजवरून टाया घेनारी कविता लेयनं सोप काम हाय का? माह्यात तो गुन होताच, पन असी आग्रवाची कुदय त्या झर्‍याच्या जागी कानी मारली नोती. मंग झरा वाहनं कसा?

माह्या मनात ते बी पडलं ते कवा ना कवा उगवनारतं होतचं ना! तवा पावसायात बंम पाऊस राहे. पाच-पाच, सात-सात दिसाची झड. मंग अखीन बंबाट, धुवाधार पाऊस त्याच्याच्यान आमच्या गावापासी असलेल्या अडान नदीले वरच्यावर पूर ये. इकडच्या एसटय़ा इकडं आन् तिकडच्या तिकडं. हटेलवाल्यायची चांदी आन् पह्यल्या पुरात वाहून जानारे खोडं, एखांदा कडब्याचा गुड, कोनाच्या थडीकाठच्या वावरातलं इरलं नाईतं लहानसी झोपडी, कवा कवा एखांदा मुडदायी. हे पाहासाठी आमी थडीशेजी पाहले गर्दी करो. झडीच्या नं घरात बसू बसू लोक आंबून जायेत आन् बोलता बोलता बुढा-बुढी भांडनावर येत. हे सारं मनात झिरपता, झिरपता कागदावर्त कविता झिरपली.

पावसानं इचिन कहरचं केला

नागो बुढा काल वाहूनचं गेला

बुढीसंग त्याचं भांडन झालं जमून

सकायीचं रागानं वावरत गेला निंघून

झाकं पली तरी घरी नाई आला.

लोक म्हने बुढा वाहूनचं गेला

गनपतीच्या पह्यल्या कार्यकरमात हे कविता म्हनतानी माह्यावर लय टेंशन. काऊन का सामोर नजरीच्या पलीकडं पावतर आयकाले आलेले लोकं त्यायच्या सामोर आता पावतर दुसर्‍यायच्या कविता म्हनो ते निल्ख आन् आता आपली कविता म्हणाची तं टेंशन तं येनारचं. तेयी आयुक्शातली पह्यली कविता? कविता सुरू केली आन् जस्या पह्यल्या दोन ओयी झाल्याबराबर टाया पडल्या. टेन्शन गायब. कविता सरल्यावरतं ज्या बंबाट टाया पडल्यात तं माह्या डोयातं आसूचं आले, पन खुसीचे आर्केस्ट्रात वर्‍हाडी कविता म्हनून लोकायपावतर कविता पोचवनारा मले वाट्टे वर्‍हाडातला मी पह्यलाचं असीनं. हेच कविता पुढे नागपूर आकाशवानीवर कसी गेली तोयी किस्सा सांगन्यासारकाचं हाय, पन पुढे कवातरी जरूर सांगीन.

लोकायच्या टायायनं इतका हुरूप आला आन् खात्री पटली का आपल्याले कविता जमते. तवा मी बोरीसारक्या खेडय़ात राहत होतो. तितच्या लहान-लहान गोठीवर कविता सुचाले लागल्या आन् मी लेयाले लागलो. हे चायीस वर्सा पह्यलची गोठ हाय. तवाचं सलून कसं होतं ते सांगनारी कविता..

झाडाखाली डोस्की

खुर्चीवर बसून तुमी डोस्की केली असनं

पन झाडाखाली बसून त्याची मजा पाह्यली नसनं।

एक फाटकं पोतं आन्

एक वाकडी धोपटी

वस्तर्‍याची धार राह्यते

नुसतीचं चोपडी

त्यावक्ती खेडय़ातून शयरात येनार्‍या मानसाले कायचं अप्रूप राह्ये ते सिनेमा पाहाचं. एक शेतकरी शयरात येते अन् काम अटपून टाकीजवर जाते..

गंमत झाली कसी रामा खेडुताची

आयकून घ्याना तुमी गोठ गमतीची ।

त्या कवितेचा शेवट असा हाय. थे टिकीटवाला बाबू म्हंते..

बाबू म्हने त्याले बालकनी नाई

हाऊसफुल हाय

रामा आला जोयात

म्हने किती पयसे घ्या

पन एक हाऊसफुल द्या!

असं कवितांच पीक येत गेलं आन् योगायोगानं त्याचवक्ती एका पेपरात वर्‍हाडी कविताचं सदर प्रा. देवीदास सोटेच्या निवडीखाली सुरू झालं. त्यातनी या कविता छापून याले लागल्यानं माहा हुरूप वाढीले लागला. नाईतं कविता लेयली का माहे दोस्त राम तिवारी, रामचंद्रा काकडे, शिव तिवारी यायले वाचून दाखवो आन् त्याबास्ता (नंतर) मी माहीचं कविता सात-आठ खेपा वाचून पाहो. काई दिसानं माहा मलेचं ध्यानात आलं का आपन तं सोटे सराचं अनुकरनं करून राह्यलो. याच्यावर त्यायाचीचं छाप हाय. मंग एकल्याव्यावानी मीच माहा गुरू झालो आन् ठरोलंका आपन याच्यातून भाहेर पडलो पायजे. आपन याच्यात अडकून राह्यलो का आपली कविता असूनयी सोटे सरची हाय असं लेबलं लागलं. याच्यातून निसटून आपली ओयख सांगनारी कविता लेयली पायजे आन् मंग कविता बदलाले लागली..

माया कोप (दुकायावर्त)

झाली नाक दिवायी आता धरतरी दिसे

नाई आली न्यायाले कसी सांज व सकाय

बइन मेली का जीती जसं इधवा बाईचं

नाई आला पाहाले वाटे पांढर कपाय

मंग त्यावक्ती खूप गाजलेली सासरी जानार्‍या लेकीवरची लेक कविता, 'लाडा कौतुकाची लेक आज सासरी घालली। जसी किसन देवाची कोनं बासरी चोरली.' खेडय़ातल्या जवान पोराले पह्यल्यांदा बायकोले दिवस गेल्याचे समजते तवाच्या त्याच्या भावना. . . 'भारी झाला पाय. . .', 'खाली गवताची सेज तुहा मखमली पाय।', 'तुह्या कुसीत वाढते माह्या मनाची सकाय. आता आरामान चालं, जरा अरामान चालं' या कवितायवर कोनाची सावली नोती ते माही कविता होती. मंग हा परवास थांबला नाई चालतचं राह्यला आन् मंग 'सगुना पाहू काय बाईवं। तुले गमतं काऊन नाईवं', 'हिव्र्या पिकात डोलाले, डोई आभाय झेलाले। सांग सगुना आता बल्लावू कोनाले' अस्या नाजूकसाजूक कविता लेयत असतानी सोता शेती करतानी तिचे रट्टेघट्टे बसाले लागले आन् कविताच्या इसयाचा ट्रॅक बदलला. 'किती कर कर करा किती मर मर मरा पयसाले पानं तीनच, किती ढीग उपसा, किती नागर खुपसा आमच्या नसिबी कर्ज इनचं', 'म्हसी वांझोटय़ा निंघाल्या झाले गरभार हले! घाम गायनारे इथं दुख सवतीचं झेले.'

शेतकर्‍याच्या सोसन्याच्या, भोगन्याच्या कविता लेयत गेलो. शेतकर्‍याच्या तीन पिढय़ाची 'मुगुट' या कवितेने मले महाराष्ट्रभर फिरोलं. बनावट असंनं तं त्याचं पितय उघडं पडाले उसिर नाई लागतं आन् दुखान इमानदारी असंनं तंथे सामोरच्याच्या कायजात झिरपल्या सिवाय राहतं नाई.

(लेखक शंकर बडे    हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

पेशवे प्लॉट, यवतमाळ

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment