Friday 17 August 2012

त्यांचे जग वेगळे !


सकाळी निघून झेंडावंदनाच्या वेळेपर्यंत सास्तूरला पोहोचता येणार नाही म्हणून आदल्या दिवशी मुक्कामाला जायचे ठरले. 14 ऑगस्ट रोजी दुपारी लातूरहून निघालो. तेव्हाच समजले, की विलासराव देशमुखांचे निधन झाले आहे. उद्या म्हणजे 15 ऑगस्टच्या सुटीच्या दिवशी सकाळचे कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी अंत्यसंस्कार आहे. संध्याकाळ होताहोता आम्ही सास्तूरला पोहोचलो तेव्हा शहाजिंदे सरांच्या घरासमोर असलेल्या संत कबीर वाचनालयात झेंडावंदनाची तयारी सुरू होती. शाहजिंदे सरांच्या नातवांचा उत्साह दुथळी भरून वाहत होता. त्यांना फरारे लावायचे होते.

सास्तूर हे लोहारा तालुक्यातील भूकंपग्रस्त गाव. दहाबारा हजार लोकवस्तीचे हे मोठे गाव आहे. पुनर्वसन झालेले असल्यामुळे मोकाळ्या चाकळ्या जागेत बांधलेली सिमेंट काँक्रीटची टापटीप घरे. घरांच्या परिसरात झाड.े इतर गावांत अभावानेच दिसतात अशा अनेक गोष्टी. पण माणसे? माणसे मात्र तशीच. सकाळी कडेवर लेकरू घेऊन, डोक्यावर टोपले सांभाळीत खुरपणीसाठी निघालेल्या बाया. दुकानाच्या कट्टय़ावर बसून गप्पा मारीत बसलेली माणसे. बाजारासाठी गच्च भरून येणारे ऑटोरिक्षे. इतर गावांत असते तसेच. 15 ऑगस्ट असल्याने सरकारी इमारतींवर झेंडावंदन झालेले आणि शाळकरी मुलामुलींनी गणवेश घातलेला.. बाकी सगळे रोजच्या सारखेच. 1947चा 15 ऑगस्ट 2012 लाही येथे उगवला नाही असे वातावरण.

विलासरावांचा आज अंत्यसंस्कार. वर्तमानपत्रात भरभरून छापून आलेले. 'सारा महाराष्ट्र शोकाकुल' असे मथळे. टीव्ही चॅनल्सवर अखंड लाईव्ह चित्रण. धायमोकलून रडणार्‍या बाया.. आल्याचिंब आठवणी.. असे वाटायचे, की जणू सगळीकडे सन्नाटा छागया. वर्तमानपत्रांच्या चौकोनी कागदांच्या बाहेर पाहिले वा टीव्हीच्या चौकोनी डब्यावरची नजर बाजूला केली, की वेगळेच वास्तव समोर दिसायचे. या गावातील दैनंदिन व्यवहार काल जसे झाले तसे आज सुरू होते. ग्रामीण जीवनात जसा 15 ऑगस्टचा उत्साह नव्हता तसा विलासराव गेल्याचा शोकही नव्हता. त्यांचे जग वेगळे आणि आपले जग वेगळे एवढी तफावत दिसत होती.

शहाजिंदे सरांना या दोन्ही जगांचा पुरता अनुभव. निवृत्तीनंतर ते शेती करू लागले. मराठीचा एक नामवंत कवी आता गावाकडे राहतो. शेती करतो. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच वाक्यात त्यांनी आम्हांला गार करून टाकले. ते म्हणाले, ''मी शेतीकडे फिरकत नाही आणि लिहिणेही बंद करून टाकले आहे.'' आम्ही विचारले, ''का?'' दोन्ही बाबींचे त्यांचे एकच उत्तर त्यांच्या प्रश्नाने दिले, ''काय उपयोग आहे?'' शहाजिंदे सरांचे शेतात घर आहे. सोयाबीन, ज्वारीची रोपे उगवलेली. खुरपणी सुरू आहे. अांबा, चिकू, पेरूची बाग आहे. दोन एकर केळीचे बन आहे. शहाजिंदे सर मात्र पार वैतागलेले. काय उपयोग आहे? या प्रश्नाचे आम्ही काय उत्तर देणार. पुढे तेच म्हणाले, ''मी गरिबीतून वर आलो. आमच्याकडे वडिलोपार्जित जमीन थोडी होती. मी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. प्राध्यापकाची नोकरी केली. नोकरी करताना पै-पै गोळा करून जमीन घेतली. त्या काळी लोकांनी मला चेंगट म्हणून नावे ठेवली. मी पर्वा केली नाही. आज एवढी जमीन आहे. पाणी आहे; पण करायला कोणी नाही. थोरला मुलगा नोकरीसाठी लातूरला राहतो. धाकटा लक्ष देत नाही. माझं वय आता सत्तरीच्या घरात आहे. एकटा माणूस काय काय करणार? कुठं कुठं लक्ष देणार?'' महारुद्र मंगनाळेंनी विचारले, ''बटईने करायला का देत नाहीत?'' शहाजिंदे सर उसळून म्हणाले, ''मी एका पायावर तयार आहे. बटाईदार मिळावाना.. करायलाच कोणी तयार नाही. मी भाडय़ाने करायला द्यायला तयार होतो. दीड लाख रुपयांनी बोलणी झाली; पण तो आला नाही.'' केळीला घडं लागलेली होती. मी म्हणालो, ''ही विकली तर लाख-दोन लाख रुपये मिळतील.'' केळीच्या विक्रीचा सौदा गेल्या पंधरवडय़ात केला होता. घेणारा पाचशे रुपये इसार देऊन गेला तो आलाच नाही. दुसराच व्यापारी आला. त्याच भावात त्याने मागितले. मागच्या व्यापार्‍याने या व्यापार्‍याकडून एक हजार रुपये कमिशन घेतले. दुसर्‍या व्यापार्‍याने माल उचलावा ना! आठ दिवस झाले, अजून तोही आला नाही. झाडाला लटकलेली केळी खराब झाली तर त्याला

मातीमोलानेही कोणी विचारणार नाही. मधेच त्यांनी गेल्या वर्षी तुरीच्या बियाण्यात कशी फसवणूक झाली ते सांगितले. कुटुंबातला माणूस सोबत नाही. बटाईने, भाडय़ाने करायला कोणी तयार नाही. त्यात बियाणेविक्रेते असो की मालाचे खरेदीदार व्यापारी, यांच्याकडून फसवणुकीचा धोका कायम लटकता.असा हा शेतकरी. त्यात मजुरांमुळे जास्त त्रस्त झालेला.

आम्ही शेतात पाऊल टाकले तसे सर खाली वाकले. त्यांनी पातीतील गवत उपटून फेकले. पुन्हा वाकले काँग्रेस गवताचे झाड उपटून टाकले. पुन्हा वाकले.. खुरपणी झालेल्या शेतातून आम्ही जात होतो आणि तेथे पातीत त्यांना हा प्रकार दिसत होता. सर पार वैतागले. ''झाडाच्या बुंध्याला सुटलं तर मी नजरचुकीने राहिलं असं म्हणेन; पण पातीच्या मध्यभागी राहिलंय.. वरवर खुरपं मारून पुढे गेल्यात बाया.'' तीन एकर खुरपायला त्यांनी सहा हजार सहाशे रुपये मोजले होते. शहाजिंदे सर म्हणाले, ''ते मजुरी जास्त घेतात याची मी तक्रार करणार नाही; पण जे काम अंगावर घेतले ते नीट करायला पाहिजे.'' साडेदहाला बाया आल्या होत्या. एक वाजता जेवल्या. तीन वाजता निघाल्या. शेवटी सरांनी त्यांना विनंती केली, ''चार तरी वाजू द्या.'' शेतीत मजूर मिळत नाहीत. शेतमजुरीचे दर जास्त मागतात, ही शेतकर्‍याची कोंडी समजून घेता येईल. त्याबद्दल मजुरांना कोणी दोष देणार नाही. परंतु आलेले मजूर आपले काम चोखपणे करीत नाहीत म्हणून शेतकरी जास्त वैतागले आहेत. अशीच तक्रार याच गावच्या वसंतराव पवार या अनुभवी शेतकर्‍याची होती.

मुलं शेतीतून बाहेर पडत आहेत. शेतीचा भार जुन्या लोकांच्या अशक्त खांद्यावर पडतो आहे. जुनी माणसं शेती सोडून नवा व्यवसाय करू शकत नाहीत. अशा काळात मजुरांची अनुपलब्धता निर्माण झाल्यामुळे काहीसा कामचुकारपणा आलेला. आकाशाने डोळे वटारलेले. बाजारात शेतीमालाच्या भावाची दुर्दशा झालेली. अशा लोकांचे एक जग आहे. या जगात तुमच्या राष्ट्रीय सणांचा उत्साह आहे ना कोण्या मंत्र्यांच्या मृत्यूचा शोक आहे.. त्यांचे जगच जणू वेगळे आहे. आपले रुतलेले चाक बाहेर काढण्यात ते सगळे कसे गढून गेले आहेत.

(लेखक हे नामवंत विचारवंत व

सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी : 9422931986

No comments:

Post a Comment