Tuesday 14 August 2012

दोस्तीसाठी नुकसान करणारे दोस्तं!

नागपंचमीच्या दिसी सकायीचं महा कालेजचा दोस्त जो आता जयगाव (खान्देश) लेचं राह्यते त्याचा फोन आला का,''तिकडे पाऊस आहे का बाबा?'' म्या म्हनलं, ''मस्त ! काल रातीपासून सुरू झाला तं आतायी चालूच हाय.'' तो म्हने, ''अरे, पावसाची आम्ही इतकी वाट पाहत होतो.'' ''चातकासारकी म्हन ना!'' त्याच्यावर्त तो म्हने, ''ते ओल्ड झालं आता. लावलेल्या मटक्याच्या आकडय़ासारखी किंवा तरुणपनात येतो म्हणून झुलवनार्‍या प्रेयसीसारखी.'' त्याचं बोलनं असचं राह्यते. तो सांगत होता, ''आज सकाळपासून इतका एकसारखा पाऊस बरसतो आहे की मन अगदी उल्हसित झालं आहे. अशा वेळी माणूस पार जुन्या आठवणीत रमायला लागतो. मला आठवायला लागलं, श्रवण सोमवारी मी आणि माझा एक दोस्त विन्या जगताप दोघं आपल्या शकुंतला रेल्वेच्या एका रुळावर तो आणि एका रुळावर मी एकमेकांचे हात पकडून एकमेकाला आधार देत धावायचो. मग रमतगमत चौसाळा टेकडीवर शंकराच्या दर्शनाला पैदल जायचं. जाताना कुणाच्या खिशात आणे, दोन आणे, असले तर किराणा दुकानातून शेंगदाणे घेऊन ते खात खात टेकडी चढायची. त्यावेळी त्या दाण्याला खूप चव असायची.''

त्याचा फोन ठेवत नाई का अखीन फोनची घंटी वाजली. उचलला तं नागपूरचा दोस्त सुभाष शर्माचा आवाज. म्हनलं आजचा दिस दोस्तायचा दिसून राह्यला. काऊन का मले सकायपासून बोरीच्या दोस्तायची सय सतावून राह्यली होती. माहे बोरीचे लहानपनचे जे दोस्त त्यायची आठोन मरूस्तर इसरनं शक्य हाय का? हे महाचं नाई तुमी तुमचं लहानपन आठवून पाहा. थो दोस्ताना काई न्याराचं अस्ते कानी? माहे लहानपनचे दोस्त राम तिवारी, वसंत बांडे, अरविंद लाला, रमेश बाजोरिया, शिव तिवारी, भरत तिवारी आता यांच्यातले वसंता आन् लाला हे दोघं गेले आमाले सोडून, पन माह्यात लय जीव त्यायचा. निरागसपनात झालेल्या दोस्तीची गोडी निल्खी आन् अधिकारयी निल्खा. अरे, हो माह्या एक दोस्त सांगाचा राहून गेला. जसं आपण सांगतानी सांगतो का हा माहा पह्यलीपासूनचा दोस्त हाय. पन हा राहून गेलेला जो दोस्त सुगन्या थो माहा पह्यलीपासूनचा नाई पह्यलीतला दोस्त होता. तुमी म्हनानं हे कसं? ते असं का तो माह्या आंधीच्या साली पह्यलीत होता. मंग पुढच्या साली मी पह्यलीत गेलो तवा तो नापास झाल्याच्यान पह्यलीतच होता. मंग त्या साली मी पास झालो तरी तो मातर पह्यलीतचं होता. गुर्जीले वाटलं याचा काई पुढं जाचा इचार दिसत नाई आन् झालयी तसचं का त्यानं अनखीन एक साल मुक्काम पह्यलीतच ठोकून आखरी शायेले रामराम ठोकला. म्हून म्या म्हनलं का तो माहा पह्यलीतला दोस्त आता सुगन्यायी राह्यला नाई आन् राम तिवारी इंदौरले चाल्ला गेला. म्हंजे बोरीच्या दोस्तायची वजाबाकी जादा आन् बेरीज कमी पडाले लागल्यानं गावले जाची वढ कमी व्हाले लागली.

मी बोरीत असतानी कपडय़ाच्या दुकानात माह्या संग असलेला रामचंद्रा काकडे माही कविता छापून आली नाई तं कोनच्या कार्यकरमाची बातमी छापून आली का त्याचं कायन कापून ते एका मोठय़ा रजिस्टरात चिपकवून ठुवे. रमेशबाबू बाजोरिया त्याले पुस्तकं वाचाचा शौक. तवा यवतमायच्या दोन वाचनालयातून त्यायच्याकड पुस्तकं येत. त्यातून गुरुदत्त, गुलशन नंदा या लेखकायच्या हिंदी कादंबर्‍या मले आवड हाय म्हून वाचाले दे. शिव तिवारी सोता कवी तो हिंदीतून चांगल्या कविता लेये आन् हिंदीच्या मोठय़ा कवींच्या कविता त्याले पाट. त्याचा असा अभ्यास असल्यानं कवितेवर चर्चा कराले त्याचा आधार होता. माही एक असी अडचन होती का माहा संगीताचा काईचं अभ्यास नोता आन् चालीच्या ज्या कविता सुचायच्या त्या चालीसहितचं यायच्या. पन मंग चाली ध्यानात कस्या ठुवाच्या. तं कवा तवाचं जवयच्या सुतारी नावाच्या वावरात जाऊन तिथं मोकया मनानं वरच्यावर गाऊन चाल ध्यानात ठुवाची. नाईतं मंग राम तिवारी म्हून माहा दोस्त त्याले निरूप देऊन बलावून घेवो आन् तो आला का दुकानातलं पॅड घेऊन मी कविता गायले लागलो का पॅड वाजवून 'ठिंग टी डिटींगत ढिंग ढिंग ढिंग' असी साथ दे इतक्या लवकर त्याले सब्द पाट होने नोतं आन् त्याले त्याची गरजयी नोती. त्याले खल पकडून ठुवाची राहे. तो भजनवाला असल्याच्यानं त्याले ते आंग होत. हे हरहमेशा जमेचं असं नाई. काऊन का त्याचयी दुकान होत मंग गिर्‍हाईक असल्यावर त्याले थेडीचं येता ये मंग अस्या वक्ती दुकानाच्या बाजूले जे खोली होती त्याले आमी जवारीची खोली म्हनो तिथं जाऊन ते चाल पक्की गठे पावतर कविता म्हनत राहो.

ज्यायचे मायबाप नवकरीवर असतेत त्यायच्या बदलीच्यान शाया बदलत राह्यते म्हून मंग दोस्तयी. माहे बावाजी शेतकरी होते म्हून त्यायची जरी बदली नोती पन होतं असं का त्यावक्ती माह्या गावाले आठवी पावतरचं शाया होती म्हून दारव्याच्या शिवाजी शायेत जा लागलं आन् तिथं दहावीच्या पुढची सोय नसल्यानं यवतमायले जा लागलं. दारव्याच्या शायेत जा साठी रोज चवदा मैल सायकलनं जानं आन् शाया सुटली का गावाले पयाची घाई त्याच्याच्यानं तिथं दोस्तायचा जमघट नाई जमला, पन यवतमायले दाते कालेजमंदी नाव टाकलं तवा पह्यल्या वर्साले 'प्रियुनिर्व्हरसिटी' म्हनत. माह्या संग दारव्याच्या शायेचा कोनी इथं नसल्यानं मले वर्गातले सारे नईन आन् त्यायच्यासाठी मी नवाडा. पह्यले हप्ताभर काईच गमे नाई. मंधातल्या सुट्टीतयी मी वर्गातच बसून राहो. आपणहून ओयख करून घ्याची आदतयी नोती आन् हिंमतयी. माही पह्यली ओयख झाली ते के.आर. देशमुख याच्याशी. तो घाटंजीवून आला होता. मंग अराअरामानं ओयखी होत गेल्या आन् त्याच्यातून दोस्त हाती लागत गेले. दिलीप सराफ, सुरेश कैपिल्यवार, भाजपचे माजी आमदार अरुण असरड, श्याम शर्मा, बाळू जयवंत असी कंपनी जमत गेली. कालेजच्या दोस्तान्याचं कसं होते, चार सालात कायी मांग राहून जाते तं कायी पुढं. पन आमच्या कंपनीचं तसं झालं नाई. कालेज सरलं तरी तवापासून आता पावतर तसाचं दोस्ताना कायम हाय.

मी बी.कॉम. फायनलले असतानी दुसर्‍या कालेजचा 'फीवाढविरोधी' मोर्चा निंघनार हाय हे मले समजलं होतं. आमच्या प्राचार्याचा त्याले इरोध हाय हे माईत असल्यानं मी त्या दिसी कालेजात न जाता मोच्र्यात सामील झालो. काऊन का मी फी भरत होतो. आमच्या कालेजचे माह्या सारके दहा-बाराजन होते. त्यातनी माहा दोस्त श्याम शर्मायी होता. आमी सारे त्यातनी सामील झालो. रस्त्यानं घोषना देत सारा मोर्चा आझाद मैदानात आल्यावर्त तिथं सभा झाली. आमच्या कालेजच्या पोरायनं आग्रव करून मले भासन द्याले लावलं. त्यातनी श्याम शर्मायी होता. म्यायी जोसात येऊन भासन ठोकलं. खूप टाया पडल्या, भासन गाजलं पन त्याचा परिनाम असा झाला का प्राचार्यानी नियम तोडला म्हून मले रस्टिकेट कराचं जाहीर केलं. दिलीप सराफ म्हून माहा जो दोस्त होता तो मले उपप्राचार्य करंदीकर सरांक डं घेऊन गेला. माहं सिकन्याचं नुकसान झालं पन मी वाकलो नाई याचा मले तवायी पस्तावा नोता अन् आतायी नाई. पन पस्तावा या गोष्टीचा झाला का आपल्या आग्रवानं याचं नुकसान झालं असं समजून श्याम शर्मानं कालेज सोडलं ते पुढं ना सिकन्यासाठी याचा! ना आईकता दोस्तीसाठी आपलं नुकसान करून घेणार्‍या दोस्ताले काय म्हनावं!

(लेखक शंकर बडे    हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

पेशवे प्लॉट, यवतमाळ
     

No comments:

Post a Comment