Monday 13 August 2012

गाडीचा हरिक!

''हैलो, कोन?''

'' तू कोन?''

''इतक्या लवकर वयख भुलला काय बे ससरीच्या ? मी तुहा जवाई आहोना''

''बाप्पू हायेत का?''

''तुले कोन वाटलं?''

''कुठून बोलून राह्यले?''

''चुलीपासून! कालच म्या बाराशाचा मोबाईल घेतला, चुलीपाशी बिळी ओढून राह्यलो अन् तुले फोन लावला''

''माहा नंबर सेव्ह करून ठेवा''

''मले इंग्रजी समजत नाही.. म्या म्हटलं आपल्याले रातीबेराती वावरात जा लागते.. पाह्यजे मानसाजोळ मोबाईल''

''बरा घेतला''

''त्यारोजी पिकाच्या विम्याचे पैसे भेटले.. बाराशात हा मोबाईल घेतला अन् चार हजारात जुनी गाडी घेतली''

''कोन्या कंपनीची?''

''काय मालूम कोन्या कंपनीची हाय.. पन लय जुनी आहे. म्या म्हटलं लेकराची हौस फिटते अन् तुह्या बईनले मांगून बसून नेता येते''

''जुन्यापेक्षा नवी घ्या लागत होती''

''आपल्याजोळ एवढे पैसे नाहीत.. हौस फिटली बस्स झालं''

''कितीचा अँव्हरेज देते?''

''एव्हरेज इचारू नको.. त्या गाडीनं पुरी थंडी केली माही''

''कशी काय?''

''फक्त तीसचा अँव्हरेज देऊन राह्यली.. पेट्रोल सत्याहत्तर रुपये झालं.. पेट्रोल टाकूटाकू माही चाटी लाल झाली''

''इकून टाका पटकन''

''आता तिले कोनी हजार रुपयात घेत नाही''

''मंग तुम्ही कशी घेतली?''

''मी फसलो.. पन सांगता कोनालं? या गाडीनं लळकोंडी आनलं मले''

''भंगारात द्या''

''भंगारात इकाले पुरते काय लेका? दारी उभी असली म्हनजे बस्स आहे.. लोकं हे म्हनतीन की नाजूकरावच्या घरी गाडी हाय एक!''

''बाईले नेत जा गाडीवर बसून''

''तुह्या बईनचं वजन जास्त आहे.. हमीदा बानूच दिसते''

''तोलत नाही काय तुमाले?''

''मले तोलते पन गाडीले तोलत नाही.. ते बसली की गाडीचं टायरच दबते''

''बाई बसली होती काय?''

''घरापाशी तिले घेऊन एक चक्कर मारला''

''मंग?''

''मागच्या चक्क्यातली हवाच निंगून गेली, तुही बईन बसली की गाडी जाग्याहून उचलत नाही, पुलावर चढत नाही''

''गाडीच बस्तर आहे तुमची''

''गाडी तशी चांगली हाय.. एकटय़ाले सपाटून ओढते पण तुही बईन सत्तर किलोची आहे ना.. तिले पाहूनच गाडी दम सोडते''

''त्यासाठी म्हनतो की नवी गाडी घ्या.. अशा बस्तर गाडीवर एक दिवस तिले पाडून टाकसान''

''नाई नाई.. मी तिले डबलसीट बसून नेतच नाही.. ते बसली की हॅंडल थरथर कापते.. मी लटलट कापतो.. काय करता वार्‍यावर वरात काढून? तिचा हातपाय मोडला तं माह्याच भोवती येइनं''

''बाई कुठं गेली?''

''इथंच हाय चुलीपाशी.. घेवं.. तुहा भाऊ बोलते..धर.. बह्याळे.. तोंडापाशी धरतं काय? कानापाशी धर''

''हॅलो.. पक्या हाय काय रे?''

''मीच हाव बाई.. काय करून राह्यली?''

''मी भाकरी टाकून राह्यली.. उळदाचं वरन केलं.. ये जेवाले''

''पिंटय़ा कुठं गेला?''

''इथंच हाय.. थयथय नाचून राह्यला.. मी मामासोबत बोलतो म्हनते.. थांबरे उसल्यावानाच्या.. हातचा मोबाईल हिसकून घेते.. बोलू दे मामासंगं.. ओ पक्या.. आता तिसर्‍या रोजी फोन करत जाय.. मोबाईल घेतल्यापासून तुह्या बाप्पूच्या खिशातच असते.. अन् फोन कोनाचाच येत नाही.. हे रोज फोनची वाट पाह्यतात.. रेंज नसली की न्हानीच्या खांडावर उभे राह्यतात.. काल खांडावर चढता चढता पाय घसरून न्हानीत आपटले''

''आता मजा आहे तुही.. गाडी घेतली म्हंतात बाप्पूनं''

''गाडीची तं नवाईच झाली तुह्या बाप्पूले.. चार खेप गाडीऊन आपटले.. पुढचे दोन दात पडले.. आता डबल दात येतात काय?''

''हे गोष्ट मले सांगतलीच नाही''

''काय सांगतीन भोबळे झाल्यावर? अदीक दोनचार दात पडले की दाताची कवळीच बसवा लागते, आता हिंडतात भोबळे..''

''बाप्पूले गाडी पाह्यजेच होती''

''फारच हरीक झाला त्याहिले जुन्या टपराचा.. दिवस निंगाला की गाडी धुतात.. घंटाभर पुसपास करतात.. सायकलच्या पंपानं त्याच्यात हवा भरतात''

''हरीक असते मानसाले गाडीचा''

''असा हरीक काय कामाचा? हरीक करता करता दोन दात गेले.. बरं झालं हातपाय मोडला नाही''

''कुठी आपटले बाप्पू गाडीहून?''

''घरापाशीच आपटले.. त्याहिले रोडवर चालवाचा भेव लागते, घरापाशी बेपटीत चालोतात, काल हे बेपटीत गाडी घेऊन घुसले अन् तिकून म्हैस आली..''

''मंग?''

''तुह्या जवायानं हातातली गाडी सोडून देली अन् सरके घरी पयत आले''

''शिकता शिकता चालोता येइन''

''पन मी म्हनते गाडीचं काही काम आहे काय? आफिसात जा लागते काय? पीक आलं की चार दिवस मजा मारतात अन् उन्हायात जांभोया देतात.. काय कामाचा असा फुकटचा मोठेपणा? तीन पैशाची गाडी ज्याले त्याले दाखोतात.. घरात एकापरी पावसायात कौलं गयतात.. काय म्हनाव या मनसाले? हिडग्याले देली गाय अन् धाऊ धाऊ गोठानावर जाय!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9561226572

No comments:

Post a Comment