Friday 17 August 2012

भगतसिंगांची माय परवा भीक मागत होती!


आज आपला स्वातंर्त्यदिवस.. 65 वर्षांपूर्वीच इंग्रज या देशातून निघून गेलेत.. आपला देश आपल्या ताब्यात आला. अनेकांनी बलिदान केलं स्वातंर्त्यासाठी. किती जण हसत हसत फासावर गेलेत? काय स्वप्नं पाहिली असतील त्यांनी!

आज भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांना काय वाटत असेल? काय विचार करत असतील तेव्हाचे आमचे असंख्य देशभक्त आता स्वर्गातून.? खूश असतील का?

लोक काही म्हणो चित्र नाही बरे

पेटलेली मने अन् उपाशी घरे!

का सुपारी तुही घेतली आरशा

खाटकांचे दिसे सोवळे चेहरे!

खरंतर आज खूपकाही लिहायचं होतं. परिस्थिती काहीही असली तरी आजही काही सैनिक घरदार, बायकोपोरं विसरून सीमेवरती देशाच्या रक्षणासाठी सज्ज असतील. पोलीस अंतर्गत सुरक्षेसाठी, तुमच्या आमच्या आनंदासाठी जीवाचं रान करत असतील! आजतरी आमचे नेते खरं बोलतील का?

मेघांचे फसवे वादे.. हा फसवा फसवा वारा

हा पाऊस खोटा खोटा.. ह्या फसव्या फसव्या धारा

ही बंजर बंजर राने.. ही पंजर पंजर पाने

मातीच्या गर्भामध्ये.. पाण्याविण कुजले दाणे

सुकली धरणे, ठणठण विहिरी

अजून फोडती टाहो..

पालींच्या मुतण्याला मी

पाऊस म्हणावा काहो?

ही संदूक संदूक सत्ता

हे बंदूक बंदूक नेते

द्यूत नाही खेळलो तरीही

शकुनीच अजूनही जेते!

मग अवतीभवती भिंती

ह्या सवती सवती भिंती

एखादी तुटता तुटता

डझनांनी उगवती भिंती

घरात भिंती, उरात भिंती, अंगण शाबूत राहो

पालींच्या मुतण्याला मी, पाऊस म्हणावा काहो?

देशात घडणार्‍या एक एक घटना पाहिल्या की मन सुन्न होतं, बधिर होऊन जातं. काय बोलावं हेही कळत नाही. कुणाला बोलावं हेही कळत नाही.

इस गुल शनके आजादी की कैसे कहू कहानी

पंछी पंछी दाना मांगे.. पौधा पानी पानी!

क्या कहने सावन आने के

वांधे है हसने गाने के

गाए भी तो गाए कैसे?

होठ जले है दिवाने के?

बादल भी कैसे तरसाये

बरसे तो ओले बरसाये

छप्पर छप्पर टुटा हुआ है

अंदर बाहर लुटा हुआ है

बर्तन ही चावल खा जाये,

यह कैसी बेमानी।

अशी काही विदारक परिस्थिती पाहिली की आपलं स्वातंर्त्य खरंच कुणी पळवलं, असा प्रश्न पडतो! सर्वसामान्य माणसाला या स्वातंर्त्याची फळं चाखायला मिळालीच का? कुणी पळवलीत?

हे माझ्या प्राणप्रिय स्वातंर्त्या,

पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसलाच तू आमच्या देशात आलास

पण आल्या आल्या कळलं नाही, कुठं गायब झालास?

वाटलं होतं, लगेच तू आमच्याही वस्तीत येशील

थोडा थोडा प्रकाश तुझा, प्रत्येकाला देशील

प्रकाशाची आरास मांडू, तिरंगा उंचावर टांगू

तू आमच्याही वस्तीत आलास, हे ओरडून ओरडून सांगू

पण कुठे काय गडबड झाली,

काहीच कळले नाही

अजूनही आमच्या वस्तीतले

दिवेच जळले नाहीत!

दोस्ता! अरे, तुझी वाट पाहून थकलीत आमची जीर्ण, मोडकी दारे..

अन् स्वातंर्त्या, निदान या वर्षीतरी तू येणार आहेस कारे?

ठीक आहे,

आमच्याकडे नाही आलास आम्ही समजून घेऊ

सवयीप्रमाणे पुन्हा आणखी अर्धपोटी राहू

पण स्वातंर्त्या,

तुझ्यासाठी संसाराची माती केली ज्यांनी

तोफेच्या तोंडासमोर छाती ज्यांनी

तुझाच जयजयकार होता, मनी तुझा ध्यास होता

अंगामध्ये मस्ती होती, गळ्य़ामध्ये फास होता

मानेभोवती फासाची दोरी घट्ट पडत होती

बायकापोरं केविलवाणी टाहो फोडून रडत होती

पण तरीसुद्धा तुझ्याचसाठी

जे शहीद झाले सारे,

स्वातंर्त्या,

निदान त्यांच्या घरी तू जाऊन आलास कारे?

स्वातंर्त्या,

माहीत नाही तुझी नक्की कोण लागत होती

पण भगतसिंगांची माय परवा भीक मागत होती

तिचाही पोरगा वेडा होता, तुझ्याचसाठी मेला

मरता मरता आईला अनाथ करून गेला

त्याच्याही कानात भरले होते,

तुझ्याच प्रेमाचे वारे..

अन् स्वातंर्त्या,

निदान त्याच्या घरी तू जायला नकोस कारे?

स्वातंर्त्य सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोचलं नाही. नेत्यांनीही पोचू दिलं नाही. आपणही मुकाटय़ानं सहन करतो आहोत.

ह्या भिजल्या भिजल्या मुंग्या

ह्या विझल्या विझल्या मुंग्या

पल्रयाच्या असल्या वेळी

ह्या घोरत निजल्या मुंग्या

ह्या टपल्या टपल्या पाली..

ह्या लपल्या लपल्या पाली

भिंतीवर फोटोमधुनी

ह्या आम्हीच जपल्या पाली

मुंगी मुंगी चला जागवू, सोबत माझ्या याहो

पालींच्या मुतण्याला मी पाऊस म्हणावा काहो?

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपट निर्माते

आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्याचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988
     

No comments:

Post a Comment