Monday 27 August 2012

भाषा शुद्ध, अशुद्ध की प्रमाण आणि बोली?

     A A << Back to Headlines     
मी ज्या महाविद्यालयात नोकरीस लागलो त्या महाविद्यालयात स्पष्ट अशा दोन वर्गात विद्यार्थ्यांची वर्गवारी करता येईल असे विद्यार्थी असत. एक वर्ग शहरातल्या अथवा खेडेगावांतल्या दलित, मजूर, कष्टकर्‍यांचा तर दुसरा वर्ग शहरांतला, मध्यमवर्गीय वस्तीतला. सुमारे 30-40 वर्षापूर्वी कुठलेच जातीय अभिसरण नव्हते. त्यामुळे मध्यमवर्गीय वस्तीतही मुलं ही प्रामुख्याने ब्राह्मण अथवा श्रीमंत मराठा, वाणी कुटुंबातली असत. तर श्रमिकांची मुले प्रामुख्याने मागासवर्गीय असत. त्यांच्या भाषिक उच्चारामुळेसुद्धा या दोन वर्गातल्या विद्यार्थ्यांना ओळखता येत असे. आपली बोलीभाषा हीच आपली इतरांना आपण कोण हे ओळखण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं साधन असतं. आपण मागासवर्गीय आहोत, मागास जातीचे आहोत हे वर्गातल्या इतर

मुलामुलींच्या लक्षात येऊ नये म्हणून मग हे विद्यार्थी वर्गात बोलायचंच टाळत असत. त्यांचा हा न्यूनगंड शिक्षक या नात्याने कसा दूर करता येईल, याचा मी विचार करीत असे.

भाषेच्या उच्चारणाबाबत ब्राह्मण जेवढा जागरूक असतो तेवढा अन्य जातीचा पालक मुळीच जागरूक नसतो. त्याचे कारण सांस्कृतिक आहे. भाषा हेच ब्राह्मण जातीचे महत्त्वाचे उपजीविकेचं साधन होतं. त्यात संस्कृत ही देववाणी. त्यामुळे तिथे उच्चारात चूक केली तर आपणाला पाप लागेल. ही भीती आणि उच्चारभेदामुळे किती वेळा अनर्थ घडू शकतो त्याचीही उदाहरणे ब्राह्मण कुटुंबांत वंशपरंपरेने मुलांच्या अंगवळणी पडलेली असत. पूजाअर्चा आणि मंत्रोच्चारण हेच ज्यांच्या उपजीविकेचे साधन असेल त्या वर्गाला भाषिक उच्चारणाची काळजी घेणे अतिशय गरजेचे होते. त्याउलट सर्व ब्राह्मणेतरांचे जन्म, व्यवसाय, भाषेशिवाय अन्य होते. ब्राह्मणेतरसुद्धा भाषा हे

फुकटचं साधन प्रयत्नपूर्वक मिळवू शकतात, हे लक्षात आल्याबरोबर आमच्या स्मृतिकारांनी संस्कृत भाषेला देववाणी ठरवून अन्य कुणी उच्चारण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षेची तरतूद करून ठेवली. त्यामुळे एका बाजूस 'देववाणी' अन्य कुणी उच्चारू नये यासाठीही दंड ठोठावण्यात येई आणि मुलगा उच्चार करण्यात चुकला तर ब्राह्मण आईबाप त्याला अतिशय कठोर शिक्षा करीत असत. यामुळे भाषेच्या उच्चारशुद्धीची जी जागरूकता ब्राह्मण कुटुंबात असे ती अन्य कुटुंबांत कधीच नसे. त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांचे उच्चारदोष दूर करावेत, असे वातावरण घरात नसे आणि घराबाहेरही अशी कोणतीच तरतूद नसे. माझ्या महाविद्यालयात दलित वस्तीतली मुलं मराठी विषय शक्यतो टाळत असत. ज्यांनी घेतला ते वर्गात शक्यतो बोलणं वज्र्य करीत असत. आज ही परिस्थिती फारशी आढळून येत नाही. त्याचं एक कारण ब्राह्मण पालक इंग्रजीकडे वळला असून ब्राह्मणेतर त्यांचंच अनुकरण करताना दिसतो, पण भाषिक उच्चाराच्या किती अहंता होत्या या अनुभवातून माझी पिढी गेली आहे. एकदा स्व. शंकरराव चव्हाण पाहुणे म्हणून महाविद्यालयात आले होते. त्या वेळी त्यांच्या भाषणात किती उच्चारदोष होतात हे मोजण्याचा प्रयत्न माझ्या महाविद्यालयातील काही प्राध्यापक करीत होते, हे मला पूर्ण आठवते.

हा न्यूनगंड अगदी सुरुवातीला माझ्याही मनात होता; पण शालेय पातळीवर मी नाटकात काम करू लागलो. नाटकाचे दिग्दर्शन करू लागलो. त्यातून तो नाहीसा झाला. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत कुठलीही भाषा शुद्ध नसते अथवा अशुद्ध नसते, ती बोली असते किंवा प्रमाण असते. या विवेचनाने माझा धीर वाढला. गुरुवर्य कुरुंदकर सर जाहीर व्याख्यानातच खास मराठवाडी लकबीचे काही शब्द उच्चारून अशा गैरसमजुतीवर हल्ला करायचे. त्यामुळे माझा तर आत्मविश्वास वाढलाच, पण प्रत्येक वर्षी फर्स्ट इअरच्या विद्यार्थ्यांसमोर कोणतीही भाषा शुद्ध नसते वा अशुद्ध नसते या विषयावर मी किमान तासभर बोलत असे.

व्हतो अशुद्ध पण न'व्हतो' शुद्ध हे कसे काय? मी काही टिळक नव्हतो, पण बोर्डावर 'येकनाथ' आणि 'एकनाथ' हे दोन शब्द लिहून वेगळा उच्चार करून दाखवा हे आव्हान देत असे. 'चहा' आणि 'चाहा', 'चमचा' आणि 'च्यमचा' असे लिहून कोणता उच्चार रूढ आहे आणि कोणता उच्चार शुद्ध आहे असा प्रश्न विचारत असे आणि 'न'मधला उच्चारभेद तर ब्राह्मण कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही कळून येत नसे. ते सर्वच 'पाणी' म्हणण्याऐवजी 'पानी' म्हणत असत. मला वाटतं बहुजन समाजाच्या सर्वच शिक्षकांना मुलांमधल्या या न्यूनगंडाला दूर करण्यासाठी काही ना काही करावेच लागले असावे. उच्चार नीट व्हावेत यासाठी संस्कृत भाषेत काही अंगभूत एक्सरसाईज आहेत. तसे बोली अथवा देशी भाषेत नाहीत. त्यामुळे 'संस्कृत' ही सर्व भाषांची जननी आहे. हा चुकीचा सिद्धांत आपणा सर्वाच्या अंगवळणी पडला. इंग्रजीपेक्षाही आमची देशी भाषा जुनी आहे. कारण मुळात ती संस्कृत भाषेतून उद्भवलेली आहे. अहंतेपोटी सैद्धांतिक विमोचन आहे. मूळ शब्द 'कर्ण' त्याचे स्थित्यंतर 'कण्ण', 'कान' असे झाले. मूळ शब्द 'यज्ञोपवीत' त्याचे 'यजोअवीअम आणि 'जानवे' असे झाले. हे शिकविताना मुळात 'कर्ण' अथवा 'यज्ञोपवीतम' हे शब्द तरी कुठून आले हा प्रश्न मनात थैमान घालायचा. संस्कृत ही 'बोलीभाषा' म्हणून केव्हा प्रचलित होती हे विद्वान आजही सांगू शकत नाहीत. (क्रमश:)

(लेखक हे नामवंत विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

No comments:

Post a Comment