Thursday 23 August 2012

शब्दांचीच रत्ने


प्रिय वाचकहो, ज्याप्रमाणे वाचक हे प्रिय असतात (नाईलाजाने का होईना! बरेचदा तर हेच प्रिय वाचक तुमच्यासमोर तुमच्या लेखनाची तारीफ न करता दुसर्‍याची करतात). त्याचप्रमाणे लेखक हा तरुण असला तर तो ताज्या दमाचा असतो आणि कवी हा विद्रोही असतो (मुळात तो कवी असतो. त्यामुळे त्याला बाकी काही विशेषणं लावण्याची गरज पडत नाही आणि शहाणे ती गरज न पाडून घेता सुखात राहतात.) विचार हा नेहमी मांडला वा दिला जातो. (हे विचार घेऊन मी एकदा दुकानदाराला छटाकभर तेल मागितलं, भाजीवाल्याला भाजी मागितली पण नाही, कोणी काहीच द्यायला तयार नाही. पानठेलेवाला म्हणाला गजूभाऊ, तुम्ही शिग्रेट माझ्याकडून प्या, पण विचार मात्र तुमच्याजवळच ठेवा.) पुरोगामी महाराष्ट्रात केवढा हा विचारांचा अनादर? तोच, तोच पुरोगामी महाराष्ट्र ज्याच्या मुख्यमंर्त्याच्या घरी सत्य साईबाबा दोन दिवस राहतात, बरोब्बर! तोच महाराष्ट्र जिथे 'विचार' देणारे साहित्यिक अध्यक्षपदाची निवडणूक 'लढवतात', जात, साहित्याचा दर्जा यावरून एकमेकांचे कपडे फाडतात अर्थात हे फाडणेही विचारातूनच) याच महाराष्ट्रात न्याय हा सामाजिक असतो. (म्हणजे ज्या समाजाची, (जातीची) शाळा त्याच समाजाच्या शिक्षकांना त्या शाळेत नोकरी मिळणार व त्याच समाजाचे विद्यार्थी त्या शाळेत प्रवेश घेणार) दृष्टिकोन आधुनिक असतो. (पाय खड्डय़ात असला तरी हातात मोबाईल असला पाहिजे). लढाई तत्त्वांची असते. (सुज्ञ वाचकांना हे तत्त्व कुठे मिळाले, दिसले तर प्रस्तुत लेखकालाही दाखवावेत) अस्मिता ही राष्ट्राची असते. (अमेरिकेमागे फरफटत जाते तीच ती अस्मिता काहो?) विजय हा नैतिकतेचा असतो. (हर्षद मेहता, अब्दुल करीम तेलगी झिंदाबाद) दाद जनतेच्या न्यायालयात मागायची असते. (मधू कोडा ऐकताय ना?) कार्यक्रम संपन्न होतो. (आयोजन कितीही विपन्न असले तरी) फलश्रुती ही संमेलनाची असते. (ज्यात सहभागी असणार्‍यांना चांगले मानधन रूपी 'फल' मिळते तेच हे संमेलन) संचालन बहारदार असते. (काय झोप लागली होती आ हा हा हा) गाणं सुरेल असतं. (अगदी हिमेश रेशमियाचंही? मग अन्नू मलिकचं काय?) स्वभाव मनमिळाऊ असतो, मंत्रिमहोदय किंवा आमदार महोदयाच्या पत्नी 'सुविद्य' असतात, गृहिणी ही कुशल असते, तरुणी ही चवळीच्या शेंगेसारखी कवळी असते. (म्हणजे कॅटरिना कैफ का हो?) गाल लाजून आरक्त होतात. (वर्ण सदाशिव अमरापूरकरसारखा असल्यास डार्क कथीया रंगाचे होतात का?) व्यक्तिमत्त्व हे रुबाबदार असते, बांधा शेलाटा असतो, कंबर ही लवलवती असते, तंत्रज्ञान हे आधुनिक असते, संताप हा सात्त्विक असतो (तुम्हा-आम्हाला येतो तो. दुसरा येऊनही आपली काही बोंब पडू शकत नाही) मान्यता ही तात्त्विक असते, भ्रष्टाचार हा समूळ उखडून काढायचा असतो. (आतंकवाद्यांना सन्मानपूर्वक विमानात बसवून सोडून दिल्यानंतर! असा कुजलेला विचार काही लोकांच्या मनात आला असेल.) पंतप्रधानांचा विदेश दौरा यशस्वी होतो. परिणाम हे दूरगामी असतात, नेता हा द्रष्टा असतो (म्हणजे कसा बघा, खूप कांदा झाला की कांदा निर्यातीवर बंदी आणायची म्हणजे शेतकरी मेले अन् कांद्याचं पीक कमी झालं की ग्राहक मरेपर्यंत निर्यात चालू ठेवायची) खोटं हे धादांत असतं तर खरं हे देवाशपथ बोलायचं असतं. उपाययोजना या तातडीच्या असतात. (26/11 हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग 'फोर्स वन'ची उभारणी करणे वगैरे) चौकशी ही रीतसर असते. तर गाशा हा गुंडाळण्यासाठी असतो. सूत्र हे सरकारी असतात अन् माहिती ही आतल्या गोटातली असते, लढत ही चित्तथरारक असते रपव ङरीं र्लीीं पेीं ींहश श्रशरीं, रकोणी मोठा कलावंत, नेता, विचारवंत, शास्त्रज्ञ, समाजसेवक गेला की निर्माण होत असते ती पोकळी!

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमतजंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

No comments:

Post a Comment