Tuesday 14 August 2012

'प्राण' हा प्राकृतिक पण अ-भौतिक घटक


रॉडनी ब्रुक्स नावाचे एक वैज्ञानिक कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करणार्‍या संशोधकांपैकी एक आहेत. त्यांचा एक लेख इंटरनेटवर उपलब्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व कृत्रिम जीव निर्माण करण्याच्या वैज्ञानिक प्रयोगांद्वारे आजवर एकही जीव निर्माण करता आलेला नाही हे ते कबूल करतात. मंगळावर जे स्वयंचलित 'रोव्हर यान' पाठविण्यात आले ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट उदाहरण होते. खरेतर संगणक जी कृत्रिम बुद्धिमत्ता व्यक्त करतो ती विज्ञानाची थक्क करणारी भरारीच आहे. बुद्धिबळात निष्णात खेळाडूला हरविण्याचे सामर्थ्य वैज्ञानिकांनी यंत्रमानवांना प्राप्त करून दिले आहे. तथापि, अतिप्रगत तंत्रज्ञानाने घडविलेला यंत्रमानव व खरा मानव यांच्यातील फरक क्षणार्धात लहान मुलेदेखील ओळखू शकतात. या अपयशाची अनेक कारणे असू शकतात, असेही ब्रुक्स मानतात. त्यापैकी एक कारण म्हणजे सजीवांमध्ये त्यांना निर्जिवांपासून वेगळे करणारा एक असा घटक असावा जो आजतरी विज्ञानासाठी अदृश्य आहे. अर्थात, ब्रुक्स हे अत्यंत आशावादी वैज्ञानिक असल्यामुळे विज्ञान त्या घटकाचा शोध लावेलच, असा त्यांना विश्वासही आहे. परंतु कदाचित तो शोध जीवशास्त्राच्या आजवरच्या धारणा मोडून टाकणाराही असू शकेल, अशीही शक्यता ब्रुक्स वर्तवितात. सापेक्षतेच्या (रिलेटिव्हिटी) सिद्धांताने जशी न्युटनप्रणीत पारंपरिक पदार्थविज्ञान शास्त्रात खळबळ माजवून दिली तसाच प्रकार जीवशास्त्राबाबत घडू शकतो, अशी प्रांजळ कबुली ते देतात.

ते कोणते तत्त्व आहे जे सजीवांना निर्जिवांपासून वेगळे करते? सामान्य भाषेत ते तत्त्व 'प्राण' या नावाने ओळखले जाते. परंतु प्राण हे एक स्वायत्त तत्त्व आहे की ती केवळ भौतिक देहात चालणारी 'प्रक्रिया' आहे, याबाबत विज्ञान निश्चित काही सांगत नाही. भौतिक देहात विशिष्ट प्रक्रिया (पोषण, धारणा व पुनरुत्पादन) सुरू होणे म्हणजे जीवन आणि ती प्रक्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू, अशी सध्यातरी विज्ञानाची बहुमान्य धारणा आहे. भौतिक देहात 'प्राण' नावाचा कोणी अभौतिक घटक प्रवेश करतो वा देहातून निघून जातो ही बाब विज्ञानमान्य नाही. परंतु जीवसृष्टी निर्माण करण्यात येत असलेल्या अपयशामुळे ब्रुक्ससारखे वैज्ञानिक त्या शक्यतेला एकदम नाकारतही नाहीत. आपण सामान्य माणसं मात्र हजारो वर्षापासून 'प्राण निघून गेला', 'निष्प्राण शरीर', ' प्राण कंठाशी आले' असे शब्दप्रयोग अनुभवांच्या आधारे करीत असतो. 'प्राणी' हा शब्दच प्राणाचा अस्तित्व-वाचक आहे.

प्राण आणि मन वा बुद्धी यातील फरकही सामान्य माणसांना समजतो. मनाचा संबंध कल्पना व विचारांशी आहे, तर प्राणाचा संबंध देहाला जिवंत राखण्यासाठी करावयाच्या घडामोडींशी आहे. श्वासोच्छवास, तहान-भूक, निद्रा, भय, चापल्य, कामवासना इ. प्राणांशी निगडित बाबी आहेत. मनाशी अथवा बुद्धीशी नव्हेत. मानवी पातळीवर भय व कामवासनेसारख्या प्राणिक प्रेरणांमध्ये मनही मिसळते ही बाब वेगळी.

निर्जीवातून उगवला असो वा निर्जीवांत अवतीर्ण झालेला असो. परंतु प्राण हा एक वेगळाच प्राकृतिक पण अ-भौतिक घटक असावा असे वाटते. सर्व सृष्टी ही केवळ भौतिक पदार्थाचीच बनलेली असून अ-भौतिक असे कोणतेही तत्त्व सृष्टीत नाही, अशी धारणा बाळगणार्‍यांना 'भौतिकवादी'(मटेरियालिस्ट) म्हणतात. 'भौतिकवाद म्हणजेच विज्ञानवाद' असा एक गैरसमज आहे. आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जे गम्य व आकलनीय असेल तेच सत्य मानू अशी धारणा बाळगणे म्हणजे वैज्ञानिक मनोवृत्ती होय.

आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जर स्थिरचित शांत अवस्थेत एखादे अ-भौतिक तत्त्व सातत्याने अनुभवास आले तर तेही सत्यच मानले पाहिजे. सृष्टीत जे काही आहे त्या सर्वास 'प्राकृतिक' अथवा 'नैसर्गिक' अशी संज्ञा आहे. परंतु जे जे प्राकृतिक किंवा नैसर्गिक आहे ते सर्व भौतिकच असणे आवश्यक नाही. विज्ञान प्रकृतीचा शोध घेते; केवळ भौतिक पदार्थाचा नव्हे! भौतिक पदार्थाशी प्राणाचा संयोग झाल्यावर पृथ्वीवर लक्षावधी जीवजातींची निर्मिती झाली. भोवतालच्या वातावरणातून प्राणवायू(ऑक्सिजन), कर्बाम्ल (कार्बनिक अँसिड), पाणी, नत्रवायू (नायट्रोजन) व अमोनियम ऑक्साईड हे विपुल प्रमाणात व त्यांच्या प्राथमिक स्वरूपात उपलब्ध असलेले निर्जीव घटक शोषून वनस्पती त्यांचे विविध सेंद्रिय पदार्थात रूपांतर करतात. वनस्पतींना खाणारे प्राणी पुन्हा त्या क्लिष्ट रचना असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर कर्बाम्ल, पाणी, नत्र व अमोनियम ऑक्साईड या मूळ घटकांत करून वातावरणास ते मूळ घटक परत करतात. दुसर्‍या शब्दांत असे म्हणता येईल की काही सुटे-सुटे निर्जीव पदार्थ हवेतून शोषून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती त्या निर्जीव पदार्थाना संघटित करून एक क्लिष्ट सेंद्रिय रचना तयार करतात, प्राण्यांना मात्र ही पदार्थाची सेंद्रिय रचना वनस्पतींना खाऊन आयती प्राप्त होते. प्राण्यांमध्ये या सेंद्रिय घटकांना पचविण्याचे अथवा जाळण्याचे कार्य चालते, ज्यातून ऊर्जा निर्माण होते. उष्णता व हालचालींची शक्ती 'प्राणी'जगतास अशा प्रकारे प्राप्त करून देणारे 'वनस्पती'जगत हे खरे पाहता ज्वलनशील सेंद्रिय पदार्थाचे महाभंडारच आहे. वनस्पतींचा मुख्य उपयोग हवेच्या शुद्धीकरणासाठी नसून प्राण्यांना पोषक द्रव्य पुरविण्यासाठी होतो, जेणेकरून प्राणी अधिक शक्तिशाली हालचाली करू शकतील. आणखी वेगळ्या परिभाषेत असेही म्हणता येईल की, 'वनस्पती'जगतात बाल्यावस्थेत उगवलेला 'प्राण' प्राणीजगतात अधिकाधिक विकसित व सामर्थ्यशाली होत जातो. प्राणाची ऊर्जा ही भौतिक ऊर्जेपेक्षा वेगळी आहे. परंतु भौतिक ऊर्जा ही प्राणास बलवान करण्यात साहाय्यभूत निश्चितच ठरते. मरतुकडय़ा शरीराचा परंतु अत्यंत साहसी अथवा अत्यंत निर्भय अथवा अत्यंत कोपिष्ट मनुष्य असू शकतो. धाडस, साहस, निर्भयता, चपळपणा ही बलवान व विकसित प्राणाची लक्षणे आहेत. हे गुण बलवान देहाशी अथवा उच्च वैचारिक बुद्धीशी निगडित असतीलच असे नाही. लक्षावधी प्रकारांच्या प्राणी-देहांमध्ये प्राणांचा जो विविधांगी विकास उत्क्रांतीक्रमांत साधल्या गेला त्याचे चित्तथरारक व मनोहारी दर्शन नॅशनल जिऑग्राफिक अथवा डिस्कव्हरी चॅनेल्सच्या माध्यमांतून टीव्हीवर नित्य होत राहते. मुख्य म्हणजे या सर्व प्राणिक हालचाली देहाचे पोषण, रक्षण व प्रजनन या मूलभूत गरजांतून उद्भवतात व देहाच्या रचनेनुसार आणि भोवतालच्या पर्यावरणानुसार प्राणामध्ये भय, चपळपणा, चलाखी, साहस इ. गुणावगुण उमलतात व वाढतात. निर्जीव पदार्थाना वनस्पती खातात, वनस्पतींना शाकाहारी प्राणी तर शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खाऊन पुन्हा मूळचे निर्जीव पदार्थ निसर्गास परत करतात. या अद्भुत सृष्टिचक्रात सूक्ष्मजीवाणूंची कामगिरीसुद्धा अतिशय मोलाची असते. ते सर्व काडीकचरा व निष्प्राण देहांना फस्त करून पृथ्वीची स्वच्छता कायम राखतात.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
     

No comments:

Post a Comment